शोध सत्याचा – करणीची कर्मकहाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रसेन टिळेकर

करणी, भूतबाधा या मनाच्या समजुती आहेत. परिस्थितीनुसार उद्भवणाऱ्या त्रासाचे खापर अशा मार्गाने दुसऱ्यावर फोडणे सोपे असते. अंधश्रद्धा वाढण्यामागे ही मानसिकता कारणीभूत असते.

काही दिवसांपूर्वी याच सदरात सोमटणे फाटय़ाजवळील एक गावात NSS च्या मुलांसमोर बोलताना ‘करणी’ हा विषय मांडला होता, त्याची कथा सांगितली होती. आपल्या सासूने आपल्यावर करणी केली आहे, या भयात एक लेक्चरर मॅडम कशा वावरत होत्या आणि त्यासंबंधात मला त्या अंधश्रद्धेची चिरफाड करून त्यांना कसा दिलासा द्यावा लागला होता, हे मी लिहिले होते. आजची कथा त्याचा उत्तरार्ध आहे असेच म्हणावे लागेल. कारण लेक्चरर मॅडमच्या भीतीचे निराकरण करून वर्गाबाहेर येतो तोच पाहिलं की, त्या गावातील आठ-दहा गावकरी माझ्याशी बोलण्यासाठी तिष्ठत उभे होते. तेव्हा पुन्हा मी त्यांच्यासह वर्गात बसलो. मंडळी बहुतेक मध्यवयीन होती. त्यातील एकजण म्हणाला, ‘‘साहेब, आम्ही लोकांनी तुमचं सर्व भाषण ऐकलं, पण आपण निदान महिनाभर जरी आधी आला असता तरी आमच्या गावातील मारामारी टळली असती’’. ‘‘ती कशी काय?’’ मी न समजून विचारले. असे विचारल्यावर त्यांनी जे ‘महाभारत’ मला ऐकवले ते ऐकून मी दिङ्मूढच झालो. महाभारत अशासाठी म्हटलं की, ती मारामारी भाऊबंदांतच झाली होती, ते गाव डोंगरावर वसलेले होते आणि उपजीविकेसाठी दुग्धव्यवसाय हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता.

त्यातील चंदू नामक एका गावकऱयाने व्यवसाय वाढवण्यासाठी जर्सी गाय खरेदी केली होती आणि त्याच्या नशिबाने ती गाय दोन्ही वेळेस भरपूर दूध द्यायला लागली होती.

चंदूला तर अस्मान ठेंगणे झाले होते, पण एके दिवशी अकस्मात तिच्या दुधात रक्त यायला लागले होते. दुर्गम अशा गावी व्हेटरनरी म्हणजे गुरांचा डॉक्टर कुठला असायला! पण सगळय़ा गावात असतो तसा मांत्रिक मात्र होता. त्याने चंदूला बिनदिक्कतपणे सांगितले की, त्याच्या घराच्या उजव्या बाजूला जो त्याचा भाऊबंद राहतो त्याने तुझ्यावर करणी केली आहे, ती उलटवावी लागेल. मात्र करणी करण्यासाठी जेवढा खर्च येतो, त्यापेक्षा दुप्पट खर्च करणी उलटविण्यासाठी येतो. असं केलं तर तुझ्या गाईचं दूध रक्त न येता पूर्वीसारखे तर होईलच, पण ज्याने तुझ्यावर करणी केली आहे, त्याच्या गोठय़ातील सर्व दुभत्या जनावरांचे दूध तुझ्या दुभत्या जनावरांत येईल आणि तू लालीलाल होशील. चंदूचा विश्वास लगेच बसला. कारण शेजारी किसन नावाचा शेतकरी राहत होता. त्याच्याशी बांधावरून आणि आणखी या ना त्या कारणांवरून चंदूचे भांडण ठरलेलेच असायचे. तेव्हा आपण नवीन विदेशी गाय आणल्याने आपली जी भरभराट झाली, ती किसनच्या डोळय़ावर आली असणार आणि ती सहन न होऊन त्याने आपल्यावर करणी केली असणार या मांत्रिकाच्या सांगण्यावर त्याचा चटकन विश्वास बसला आणि त्याने मांत्रिकाला ‘करणी’चे सामान आणण्यासाठी आणि विधीसाठी भलीमोठी रक्कम दिली.

दोन दिवसांनी मांत्रिकाने चंदूला बोलावले आणि त्याच्या समोर अंगात आल्याचे सोंग करून ‘छा छु’ केले आणि त्याला एक मंतरलेले लिंबू दिले. रात्री बारा वाजता ते त्याला त्या शेजारच्या गोठय़ात टाकायला सांगितले आणि असे केल्याने त्याच्या सर्व दुभत्या जनावरांचे दूध याच्या जनावरांत येईल आणि त्यायोगे त्याचे उखळ पांढरे होईल अशी पुन्हा ग्वाही दिली.

त्याच दिवशी रात्री बारा वाजता चंदूने हळूच बाहेर येऊन ते लिंबू शेजारच्या किसनच्या गोठय़ात मांत्रिकाच्या सांगण्याप्रमाणे भिरकावले, पण झाले भलतेच! ते लिंबू नेमके म्हशीच्या आड लघवीला बसलेल्या किसनच्या अंगावर पडले. हळदपुंकू आणि टाचण्या लावलेले ते लिंबू पाहून त्याची तर गाळणच उडाली आणि तो ‘‘मेलो मेलो’’ अशी बोंब मारू लागला. बहुधा चोर आले असावेत असे समजून त्याचे शेजारी, भाऊबंद काठय़ा घेऊन आले. त्यांचा आरडाओरडा ऐकून चंदूचे नातलगही काठय़ा घेऊन आले. किसनने ते लिंबू आपल्या लोकांना दाखवताच ते चंदूवर काठय़ा घालायला सरसावले तसे चंदूचेही भाऊबंद पुढे आले आणि त्यांची चांगलीच जुंपली. मोठय़ा मुश्किलीने गावातील जाणत्या लोकांनी मध्ये पडून ती मारामारी थांबवली, तरी पण थोडाफार रक्तपात झालाच! दुसऱ्या दिवशी त्या मांत्रिकाच्या शोधात गावकरी निघाले खरे, पण ही भानगड आपल्या नक्कीच अंगाशी येणार हे ओळखून त्याने रातोरात पोबारा केला होता.

सगळय़ा गावकऱयांनी मग लगेच सभा घेतली. खरं तर ‘करणी’ या अंधश्रद्धेवर काहींचा विश्वास होता, परंतु मांत्रिकच पळून गेल्यामुळे त्यांची बाजू लंगडी पडली होती. मात्र वाईटातून चांगले घडते तसे इथेही झाले होते आणि ते म्हणजे यापुढे कोणत्याही मांत्रिक-तांत्रिकाला गावात थारा द्यायचा नाही, असा गावाने ठराव केला.

घरी परतत असताना मला प्रश्न पडला होता की, आडवाटेला जी अशी गावं, वस्ती, वाडय़ा आहेत, तिथल्या लोकांचे अंधश्रद्धेच्या बाबतीत प्रबोधन कसे करायचे? तसे अलीकडे घराघरांत TV पोहोचले आहेत आणि अशा टेकडीवरील आडगावात प्रबोधनासाठी ते अत्यंत प्रभावीपणे वापरता येईल यात काही शंकाच नाही, पण दुर्दैवाने त्यावर अलीकडे गाजलेल्या आणि माजलेल्या तथाकथित संतांच्या, बाबांच्या, बापू महाराजांच्या चमत्काराच्या कहाण्याच वर्षानुवर्षे दाखवण्याचे पुण्यकर्म चाललेले असते. खरं तर अशा वेळी संत गाडगे महाराजांची प्रकर्षाने आठवण येते. ते जिथे जाता येत नाही, अशा गावात जाऊन कीर्तन करीत. अर्थात यासंदर्भात म्हणजे अंधश्रद्धेच्या उच्चाटनासाठी काही संस्था नक्कीच कार्यरत आहेत असे दिसते, पण त्यांचेही हात तोकडे पडत असावेत. कारण मुळातच प्रबोधन म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे आणि त्याला सहसा कोणी तयार होत नाही.

पिसाटणे गावापासून एक मात्र आदर्श जरूर घेता येईल तो म्हणजे लोकांच्या अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा फायदा घेऊन जे मांत्रिक-तांत्रिक, बुवा, स्वामी, महाराज भाबडय़ा जनांची फसवणूक करतात, दैवी शक्ती-दुष्ट शक्ती असल्या काल्पनिक गोष्टींच्या सामर्थ्याची थाप मारून नागवणूक करतात, त्यांच्या विरुद्ध गावाने ठराव करून त्यांना गावबंदी करावी.

[email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडीत आहेत)