ठसा – दिलीप नाईक

>> दिलीप ठाकूर

चित्रपटसृष्टीत नशीब ही खूपच महत्त्वाची गोष्ट मानली जाते. एखाद्या गोष्टीचे अतिशय उत्तम नियोजन करावे, पण अनपेक्षितपणे दुर्दैव आडवे यावे असे या मायानगरीत अनेकांच्या बाबतीत होत असते. दोन दिवसांपूर्वी निधन झालेल्या चित्रपट दिग्दर्शक दिलीप नाईक यांच्याबाबत अगदी असेच घडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या ‘नाखुदा’ (1981) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी सुरू करताना पोस्टरवर कुलभूषण खरबंदाला जास्त वाव दिला गेला. चित्रपटात राज किरण व स्वरुप संपत नायक-नायिका असूनही कुलभूषण खरंबदा पोस्टरवर लक्षवेधक ठरेल असे नियोजन होते. पण असे का, तर जी. पी. सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शान’ (1980) मधील कुलभूषण खरबंदाची खलनायक शाकालची भूमिका गाजलीं होती. त्याचा ‘नाखुदा’ला फायदा होईल असे व्यावसायिक गणित होते. दुर्दैवाने तसे झाले नाही. ‘शान’ची गाणी लोकप्रिय ठरली. पण कुलभूषण खरबंदा समीक्षक व प्रेक्षकांना प्रभावित करू शकला नाही आणि याचा जोरदार फटका ‘नाखुदा’ या चित्रपटाला बसला. कुलभूषण खरबंदाला ठळक स्थान असलेली पोस्टर्स नवीन तयार करण्यात आली. या गडबडीत ‘नाखुदा’ गल्लापेटीवर अपयशी ठरला. मुंबईत नाझ चित्रपटगृहातून अवघ्या तीन आठवडय़ांत चित्रपट उतरला. ही पोस्टर गोष्ट त्या काळात खूप चर्चेत होती. दिग्दर्शक दिलीप नाईक निराश झाले होते. आता 7 मे 2024 रोजी त्यांचे निधन झाल्याचे समजताच मला हे सगळे आठवले. ‘नाखुदा’मध्ये मदन पुरी, भरत कपूर यांच्याही भूमिका होत्या. अनेक वर्षांपासून माहीम येथे वास्तव्यास असलेले दिलीप नाईक चित्रपटसृष्टीतील अनेक गोष्टींवर मनापासून बोलत. चालण्याची भरपूर आवड असलेले नाईक कधी माटुंगा रेल्वे स्टेशनवर भेटायचे, तर कधी मेहबूब स्टुडिओ परिसरात. दिग्दर्शक यश चोप्रा यांनी आपली यशराज फिल्म ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन करून ‘दाग’ (1973)पासून स्वतंत्रपणे वाटचाल सुरू केली तेव्हा यशजींच्या सहाय्यक दिग्दर्शकांत रमेश तलवार, दिलीप नाईक, राजेश सेठी होते. यशजींच्या ‘जोशीला’, ‘दीवार’, ‘’कभी कभी’, ‘त्रिशूल’, ‘काला पत्थर’ अशा चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून वाटचाल करत असतानाच दिलीप नाईक यांनी ‘नाखुदा’पासून स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारली. पण ‘शान’चा फटका ’नाखुदा’ला बसला. विशेष उल्लेखनीय गोष्ट ही की, यश चोप्रा यांनीच आपल्या यशराज फिल्म बॅनरखाली दिलीप नाईक यांनी स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनाची ही पहिली संधी दिली होती. त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडलीही होती,. पण दुर्दैव! चित्रपटसृष्टीत यश हेच चलनी नाणे असल्यानेच दिलीप नाईक यांना पुन्हा संघर्ष करणे भाग होते. शशी कपूर, राज बब्बर, पूनम धिल्लॉन, माधवी अशा कलाकारांना घेऊन मेहबूब स्टुडिओत ‘जायदाद’ या चित्रपटाचा अतिशय जोरदार मुहूर्त केला. तेव्हा या चित्रपटाबाबत अतिशय उत्साहात बोलणारे दिलीप नाईक आजही आठवतात. दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण होण्यास बराच वेळ गेला. नाईकांनी मग अंधेरीतील नटराज स्टुडिओत ‘गाता रहे मेरा दिल’ या चित्रपटाचा मुहूर्त केला. रोहित रॉय, रोनित रॉय आणि नवतारका शिल्पा शेट्टी हे कलाकार. बरेच दिवस या मुहूर्ताची चर्चा रंगली. माटुंगा येथील एका महाविद्यालयातील शूटिंगच्या वेळेस दिलीप नाईक यांनी आवर्जून सेटवर बोलावले. शिल्पा शेट्टी त्या काळात चेंबूरला राहायची आणि अभिनेता सुरेश भागवतने तिला हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यास मदत केली. तेव्हा ती अवघी सतरा वर्षांची होती आणि या क्षेत्रात पाऊल टाकण्यात संकोचत होती. नाईक यांनी तिच्या घरी जाऊन वडिलांशी चर्चा केली, शिल्पालाही तिच्यात आत्मविश्वास आहे याची खात्री दिली. दुर्दैवाने दोन-तीन रिळांच्या शूटिंगनंतर हा चित्रपट बंद पडला. पुन्हा एकदा दिलीप नाईक दुर्दैवी ठरले. त्यानंतर ‘नारद विवाह’ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. या चित्रपटात विक्रम गोखले, बीना, असरानी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. कालांतराने दिलीप नाईक मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार अशा बातम्या होत्या इतकेच. गुणवत्ता असूनही काही जणांना म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही तसेच काहीसे दिग्दर्शक दिलीप नाईकचे यांचे झाले. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या स्मृती कायम राहतील.

[email protected]