
>> दिलीप वेंगसरकर
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे क्रिकेटप्रेम आपल्या सर्वांना ठाऊक आहेच. त्यांचा आशीर्वाद आम्हा क्रिकेटपटूंच्या डोक्यावर नेहमी राहिला. त्यांचे गाणे आमचं मनोबल उंचावण्याचे काम करायचं. आमचा देशविदेशातील दौऱयाचा प्रवास त्यांच्या सुमधुर गीतांच्या साथीने व्हायचा. दौऱयात त्यांच्या गाण्याच्या रेकॉर्ड्स आम्ही सोबत घ्यायचो. बसमधून स्टेडियमच्या प्रवासात त्यांची गाणी ऐकायचो. त्यामुळे खेळातील ताणतणाव दूर व्हायचा. त्यांची गाणी आम्हाला रिफ्रेश करायची.
साधारण 50-60 च्या दशकापासून लतादीदी कसोटी सामने पाहायच्या. त्यांचे त्याकाळचे जुने फोटो मी बघितलेले आहेत. मुंबईत कसोटी सामने असले की त्या वेळात वेळ काढून यायच्या. जशा दीदी कसोटी सामने बघायला यायच्या तसे पूर्वीचे क्रिकेटपटू विजय मांजरेकर, सुभाष गुप्तेदेखील त्यांच्या रेकॉर्डिंगला जायचे, असे मी ऐकलेले आहे. मला आठवतेय की, 1979 साली हिंदुस्थानने आसिफ इक्बालच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघाला वानखेडे स्टेडियमवर हरवले होते तेव्हा लतादीदी आणि आशा भोसले दोघीही ताज हॉटेलमध्ये टीमचे कौतुक करायला आल्या होत्या आणि आम्हाला बक्षिसेही दिली होती.
हिंदुस्थानी संघाने 1983 मध्ये विश्वचषक जिंकून इतिहास घडवला होता. प्रत्येक देशवासीयाचा ऊर अभिमानाने भरून आला होता. लतादीदी प्रचंड खूश होत्या. विजयानंतर बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. हे जेव्हा दीदींना समजले तेव्हा त्यांनी दिल्लीत गाण्याचा एक खास कार्यक्रम केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हा प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपये मिळाले होते.
दीदींची हृदयात जपलेली आणखी एक आठवण इथे सांगतो. 1986 साली लॉर्ड्सवर मी तिसरे शतक झळकावले होते. त्या सामन्याच्या वेळी दीदी स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. त्यांचा फ्लॅट लॉर्ड्स स्टेडियमच्या जवळच होता. हा विजय साजरा करण्यासाठी त्यांनी आम्हा पाच-सहा खेळाडूंना घरी बोलावले होते. त्यावेळी मला काय आवडते याची चौकशी करून दीदींनी माझ्यासाठी खास गाजराचा हलवा बनवला होता. त्या मेजवानीत कोल्हापुरी मटणाचा आस्वादही आम्ही घेतला. अशा सुंदर आठवणींचा पट आज डोळ्यांसमोर उलगडतोय. दीदींना आम्हा खेळाडूंचा खूप अभिमान होता. अलीकडच्या काळात भेट झालेली नसली तरी कधीतरी त्यांचा फोन यायचा, खुशाली विचारली जायची. दीदी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या गाण्यांची साथ आहे. त्यांची कित्येक गाणी मला आवडायची. त्यांच्या गाण्यांवर आमची पिढी मोठी झाली. दीदींची गाणी आणि त्यांच्यासोबतच्या आठवणींचा खजिना आयुष्यभराचा ठेवा आहे… तो तसाच राहणार.
(लेखक हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत.)



























































