मनतरंग – चक्रव्यूह भेदताना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

भावनिक आघात… हे मानसिक अस्वास्थ्याचं अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण आहे. आपलं मन हा एक हिमखंड आहे. जो वरवर दिसायला जरी लहान असला तरी आत खोलवर प्रचंड मोठा आहे. त्याच्या खोलात जर शिरायचं म्हटलं तर त्यातून बऱयाचशा वर्षानुवर्षं दडपून ठेवलेल्या आणि राहिलेल्या भावना दिसतील. तसं पाहायला गेलं तर या भावनांसोबत आपण जगत असतो, पण शेवटी या भावनांचं ओझं कधीना कधी आपल्याला असह्य होतं. मग कुठल्याही छोटय़ा मोठय़ा कारणामुळे त्या आपल्याला अनावर होतात.

अक्षय (नाव बदलले आहे) हा तिशीचा तरुण मुलगा स्वतःच्या नोकरीत स्थिर व्हायचा प्रयत्न करत होता. पण काही केल्या त्याला जमतच नव्हतं. नोकरी लागली की त्याचे सुरुवातीचे काही दिवस हे खूप मस्त जायचे. मग जसजसा तो रुळायला लागला की कुठेतरी माशी शिंकायची. मग तडकाफडकी राजीनामा देऊन तो घरी यायचा. अक्षयने अशाप्रकारे पाच वर्षांत तीन नोकऱया बदलल्या होत्या. ‘मॅम, या अशा माझ्या धरसोड वृत्तीमुळे मी आतापर्यंत सेटल झालेलो नाही. मी आज ज्या पगारावर आहे त्यापेक्षा तिप्पट तरी मला असायला हवा होता आणि नोकरी सोडल्यावर जे गिल्ट येतं मला की विचारू नका. त्यानंतरच्या कित्येक रात्री मी झोपू शकत नाही. मला नोकरीच्या ठिकाणी कोणीही पिनपॉइण्ट केलं की कसंतरी होतं.’ अक्षय कळकळीने बोलत होता.

हे ‘कसंतरी’ होणंच त्याची चिडचिड होण्यामागचं कारण होतं. तसंच त्याच्या झोप न लागण्यामागचंही कारण त्याची निराशा होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या साऱया नकारात्मक भावनांच्यामागे कुठला तरी भावनिक आघात ( Emotional Hurt) दडलेला जाणवत होता.

भावनिक आघात… हे मानसिक अस्वास्थ्याचं अनेक कारणांपैकी महत्त्वाचं कारण आहे. आपलं मन हा एक हिमखंड आहे. जो वरवर दिसायला जरी लहान असला तरी आत खोलवर प्रचंड मोठा आहे. त्याच्या खोलात जर शिरायचं म्हटलं तर त्यातून बऱयाचशा वर्षानुवर्षं दडपून ठेवलेल्या आणि राहिलेल्या भावना दिसतील. या भावना म्हणजेच-

– दुखावलं जाणं (Hurt)
– शरमणं / लाज वाटणं (Guilt)
– आघात झालेले असणं (Trauma)

अशा प्रकारच्या असतात. तसं पाहायला गेलं तर या भावनांसोबत आपण जगत असतो, पण शेवटी या भावनांचं ओझं कधीना कधी आपल्याला असह्य होतं. मग कुठल्याही छोटय़ा मोठय़ा कारणामुळे त्या आपल्याला अनावर होतात. शेवटी त्या-

– आक्रस्ताळेपणा
– छोटय़ा छोटय़ा गोष्टींवर चिडचिड
– कमी सहनशक्ती
– आत्मविश्वासाची कमतरता
– गोष्टी मनाला लागणं
– अचानक रडू येणं
– नकारात्मक विचार
– नैराश्य

या स्वरूपात बाहेर येतात. हा उद्रेक त्रासदायक असतो. या उद्रेकामुळे आपल्याला अनेक वर्तनीय आंदोलनांचा सामना करावा लागतो.
अक्षयच्या बाबतीत सहनशक्तीची कमतरता होती. त्याच्याशी बोलता बोलता लक्षात येत होतं की, तो फक्त नोकरीच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील असमाधानी आणि नकारात्मक होता. त्याची सगळ्यात जास्त नकारात्मकता ही त्याच्या वडिलांवर होती.

अक्षयच्या मते त्याने वडिलांचे त्याच्या लहानपणापासूनच टक्केटोणपे खाल्ले होते. त्याचे वडील त्याचा सर्वांसमोर अपमान करत. ‘तू काय करणार? ना-लायक आहेस सगळ्याच बाबतीत’ या वाक्याचा परिणाम त्याच्या मनात इतका खोलवर रुजला होता की त्यानेही अजाणतेपणी स्वतःला ना-लायकपणाचं विशेषण लावून घेतलं होतं आणि या विशेषणावर त्याचा विश्वास बसला होता. यामुळेच नोकरीत कोणी काही त्याला बोललं की त्याला त्याच्या गतआयुष्यातले अपमानाचे प्रसंग आठवत. यामुळे तो अधिकच दुःखी होई. त्याचा आत्मविश्वास डळमळीत होत असे आणि त्या निराशेच्या भरात तडकाफडकी राजीनामा देऊन मोकळा होत असे.

अक्षय हळवा होता. आणि आताच्या त्याच्या आयुष्यातील उमेदीच्या वर्षांत आत्मविश्वास गमावून बसल्यामुळे त्याची नकारात्मकता वाढीस लागली होती.
“I am deeply hurt. माझ्या बाबांना कसं सांगू?’’ ही चिडचिड तो प्रत्येक वेळी बोलून दाखवत होता.

अक्षयला त्याच्या भावनांचा उद्रेक समुपदेशनाच्या सुरक्षित वातावरणात होऊ देणं हे मुख्य काम होतं. तेव्हाच पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होणार होती.
अक्षयला भरपूर बोलतं करावं लागलं. सुरुवातीला मोजकं बोलणारा अक्षय नंतरच्या सेशन्समध्ये भयंकर बोलका झाला. मोकळा झाला. त्याच्या आयुष्यात घडलेल्या आणि घडणाऱया घटना तो व्यवस्थित सांगायला लागला. त्या सांगताना कुठेतरी त्याच्या वडिलांच्या बोलण्याचे संदर्भ येत. पण बोलण्याच्या ओघात तो त्या शब्दांचा वेगळ्या अर्थानेही विचार करू लागला. म्हणजेच ‘खरोखर माझ्या वडिलांच्या म्हणण्यानुसार मी ना-लायक आहे का?’ हा विचार त्याच्या मनात कुठेतरी चमकून जायला लागला होता.

‘आत्मचिंतना’ (Introspection)चे महत्त्व आणि ते कसे करावे याबद्दल त्याला मार्गदर्शन करण्यात आले. त्याला ध्यानधारणेचीही जोड देण्यात आली.

अक्षयच्या समुपदेशनाची दुसरी पायरी होती, विचार आणि भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे ही. यामध्ये त्याला त्याला त्रासदायक ठरणाऱया भावना ओळखायचे कसब शिकवण्यात आले. त्यानुसार तो त्याला आलेल्या आणि आताच्याही त्याला त्रासदायक ठरणाऱया प्रसंगांतून नकोशा भावना ओळखायला लागला. त्याला या भावनांचा कमीत कमी त्रास होण्यासाठी कुठले उपयुक्त विचार करता येतील (ज्यामुळे अशा प्रसंगांमधून बाहेर पडण्यास मदत होईल) हेही शिकवण्यात आले.

तिसरी पायरी होती ती राग तसेच ताण नियोजनाची. यामध्ये त्याला वेगवेगळ्या पध्दती सांगितल्या गेल्या.

चौथी आणि अक्षयसाठी कठीण पायरी होती ती स्वतःच्या वडिलांना माफ करण्याची. अक्षय साहजिकच यासाठी तयार नव्हता. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला वडिलांकडून झालेल्या शाब्दिक शोषणामुळे त्याचे बरेच नुकसान झाले होते. यामुळे त्याची घुसमट वाढली. पण अक्षयला भूतकाळात अडकून बसल्यावर त्याचे भविष्यात केवढे नुकसान होईल हे त्याला समजवल्यावर तो तयार झाला. अर्थात त्याने स्वतःला तयार करण्यासाठी वेळ घेतला. पण हळूहळू त्याने वडिलांबाबत तटस्थ भूमिका घेण्यास सुरुवात केली.

अक्षयमध्ये आज बरीच सुधारणा झाली आहे. स्वतःवर त्याने प्रामाणिकपणे मेहनत घेतली आहे. नोकरीही तो आता करतोय आणि ती टिकवण्याचा प्रयत्नही करतोय… त्याच्या बॉसला माफ करून!

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
– [email protected]