मंथन : बदल हवा आहे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरूरकर- सौदागर

घरगुती वादातून हत्येच्या घटना घडताना आजूबाजूच्या शेजाऱ्यांना या घटनेची खबरच दोन-तीन महिने नव्हती. घरात मारहाण आणि किंचाळ्या ऐकू येत असताना बाकीची दारं बंद होणं हे नक्कीच क्लेशदायक आहे. संवेदनशीलता आणि सहानुभूती ही हरवली आहे का? असा प्रश्न पडतो. हे कुठेतरी बदलायला हवं. या भावनांच्या निकोप वाढीसाठी गरजेची असलेली नैतिक आणि सामाजिक मूल्यांची जबाबदारी शेवटी आपलीच आहे.

हल्ली वर्तमानपत्र हातात घेतलं की, त्यातील प्रत्येक पानावर हिंसेची बातमी असते. मग ती हिंसा घरातील असो किंवा मग रस्त्यावरील. त्यामध्ये हिंसेला बळी पडलेल्या जिवांचे आणि एकंदरीतच त्या घटनेचे वर्णन वाचून आपल्या अंगावर सरकन काटा उभा राहतो. मारामारी, बलात्कार, हत्या किंवा आत्महत्या या अशा प्रकारच्या बातम्यांनी सुन्न व्हायला होतं.

माझ्याकडे कधी कधी समुपदेशनासाठी घरगुती हिंसाचाराच्या केसेस येतात. त्यातल्या दोन मला आता ठळकपणे आठवत आहेत. एक नुकतीच लग्न झालेली मुलगी तिच्या नव ऱ्याबरोबर समागम करायला तयार होत नव्हती. वय लहान आणि लैंगिक संबंधांचे असणारे अपुरे ज्ञान (म्हणण्यापेक्षा भीती) तिच्यामध्ये साहजिकच जास्त होते. त्यातच नव ऱ्याकडच्या लोकांना त्या गोष्टीची भरपूर घाई झाली होती. त्या दोघांवर लैंगिक संबंधांसाठी त्या सर्व लोकांकडून दडपण टाकलं जात होतं. हे दडपण इतक्या टोकाचं होतं की, अक्षरश त्या नव्या नवरीला फरफटत तिच्या नव ऱ्याबरोबर कोंडून ठेवलं जात होतं आणि घरची सगळी पुरूष मंडळी खोलीबाहेर उभी राहत होती. तिच्या नव ऱ्यालाही तिच्यावर समागमासाठी बळजबरी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात होतं, पण तरीही ती बधत नव्हती. तिची रोजची रडारड, किंचाळ्या आणि तिचे एकटे स्वतला खोलीत कोंडून घेणे, नव ऱ्याबरोबर न राहणे या सगळ्याला तिच्या सासरचे वैतागले. तिच्यात दोष आहे असं म्हणत प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले होते. एक उपाय म्हणून त्या दोघांना समुपदेशनासाठी आणले गेले. मात्र आरोप-प्रत्यारोप, सासरच्यांकडून तिचं समागमाच्या वेळी थंड असणं, त्यावेळी घाबरणं चवीनं सांगितलं जात होतं. त्यात कुठेही ‘ती’सुद्धा भावना असणारी मुलगी आहे, तिला काहीतरी त्रास होत असेल याबद्दल त्यांना काहीही वाटत नव्हते.

दुसरी एक केस होती एका डॉक्टर मुलीची. उच्चशिक्षित घरामध्ये लग्न करून गेलेली, पण सासरच्या अतिअपेक्षांमुळे तिला सासरी राहणं असह्य झालेलं. सततची भांडणं आणि कटकटींना वैतागून ती माहेरी रहायला गेली. तिला घटस्फोट हवाच होता. कारण सासरच्यांकडून येणारे टोमणे, विशेषत वयाने लहान असलेल्या दीर आणि नणंदेकडून उडवली जाणारी खिल्ली तिच्या स्व-प्रतिमेवर गदा आणत होती. त्यात एका अशाच भांडणात नव ऱ्याने तिच्यावर हात उचलला आणि त्याच्या घरच्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. ती त्यावेळी रडत होती आणि घरी असणारी माणसं जणू काही घडलंच नाही या आविर्भावात स्वतची कामं करत होती. मन अक्षरश हेलावलं होतं त्या दोघींची भावनाविवशता ऐकल्यावर आणि चीडही आली होती त्यांच्या घरातील लोकांचा कोरडेपणा बघितल्यावर! (मानसिक स्वास्थ्य क्षेत्रात काम करणाऱ्या आम्हालासुद्धा राग आणि दुःख या भावना असतात.)

अशीच उद्वेग आणणारी एक बातमी हल्लीच वाचनात आली. लालबाग-परळमध्ये राहणा ऱ्या एका मुलीने तिच्या आईचा मृतदेह जवळपास तीन महिने घरी तुकडे करून ठेवला होता. त्यापूर्वी गाजलेलं श्रद्धा वालकर प्रकरण, ज्यामध्ये तिच्या मित्राने अतिशय थंड डोक्याने तिला मारून तिचे तुकडे केले होते. त्यानंतर वाचनात आलेलं निक्की यादव हत्याकांड, ज्यामध्येही अशाच प्रकारचा खून करण्यात आला होता. या गाजलेल्या आणि वरील समुपदेशनासाठी आलेल्या दुर्दैवी प्रकारांमध्ये एक साम्य मात्र आढळून आलं, जे म्हणजे यात समावेश असलेल्या माणसांची मनं कोडगी झाली होती.

हल्लीच गेल्या आठवडय़ात ‘मदर्स डे’ साजरा करण्यात आला. समाजमाध्यमांवर आणि प्रत्यक्षातसुद्धा अनेकांनी हा दिवस आपल्या आईला समर्पित केला होता, पण जेव्हा हा दिवस साजरा करतानाच अशा असंख्य ‘आई’ डोळ्यांसमोरून गेल्या, ज्यांची ाtढरपणे हत्या काही घरगुती वाद किंवा क्षुल्लक कारणांवरून त्यांच्याच घरच्यांनी, स्पष्टपणे लिहायचं झालं तर स्वतच्या मुलांनी केली होती. आईला आपण गृहीत धरतच आलो आहोत, पण तिच्याकडे निर्जीव वस्तू म्हणून बघायला सुरूवात पण केली आहे का? असा प्रश्न आता हिंसेच्या घटना पाहिल्यावर/ऐकल्यावर पडायला लागलाय.

हा प्रश्न फक्त ‘आई’ या नात्याबाबतीत नाही, तर बाकी नात्यांच्या बाबतीतही आता पडू लागला आहे. मानवी नातेसंबंध ही गुंतागुंतीची प्रािढया आहे. कारण वेगवेगळ्या विचारसरणींची माणसं यात असतात. साहजिकच, प्रत्येकाची वागण्याबोलण्याची पद्धत ही वेगवेगळी आणि क्वचित परस्परविरोधी असतेच, पण म्हणूनच या सगळ्यात नात्यातील सर्व माणसांना कशा प्रकारे सांभाळून घ्यावे अथवा नाही हे शेवटी प्रत्येकावर अवलंबून असते.

हल्ली हेसुद्धा बघितलं गेलं आहे की, नाती टिकवून ठेवण्यासाठी हल्ली समाजमाध्यमांचा उपयोग केला जातो, पण आता याच समाजमाध्यमांना (social media) प्रमाणाच्या बाहेर आपल्या नात्यांमध्ये शिरकाव करू द्यायला लागलो आहोत आणि असलेली नाती बिघडवून टाकतो आहोत. या माध्यमांवर होणारे नात्यांचे प्रदर्शन सगळ्यांनाच प्रोत्साहन देते असे नाही, तर ते असुरक्षिततेची भावनाही तयार करू शकते. मग त्यातूनच नात्यांमध्ये संशय, कटुता, द्वेष या समस्या निर्माण होऊन त्याची परिणती आत्महत्या, हत्या या अशा भयानक अंतापर्यंत होऊ शकते. पण तरीही हा प्रश्न उरतोच की, एवढा कोरडेपणा नात्यांमध्ये का येत चालला आहे? समाजमाध्यमं खरंच या सगळ्याला जबाबदार आहेत का? हे सगळं लिहिण्याचं कारण एवढंच की, जेव्हा जेव्हा अशा घरगुती वादातून हत्येच्या घटना घडल्या आहेत, तेव्हा आजूबाजूच्या शेजा ऱ्यांना या घटनेची खबरच दोन-तीन महिने नव्हती. ‘आपण भलं आणि आपलं घर भलं’ हे काही अंशी ठीक, पण घरात मारहाण आणि किंचाळ्या येत असतील तरी बाकीची दारं बंद जेव्हा बंद होत असतात आणि घरच्या टीव्हीचे आवाज वाढतात हे नक्कीच क्लेशदायक आहे. हे कुठेतरी बदलायला हवं. थोडीफार संवेदनशीलता आणि सहानुभूती (empathy) ही यायला हवी. हे कठीण काम नाही. थोडाफार इतरांशी संवाद, आपुलकी आणि नात्यांमधील (इतरही) व्यक्तींच्या वेगळेपणाचा आदर जर असेल तर संवेदनशीलता आपोआप येईल. एकदा का संवेदनशीलता आली की, “तुला काय त्रास होतोय हे मला कळतंय. चल! काहीतरी मार्ग काढू” ही सहानुभूतीही त्यामागोमाग येईल. कारण हिंसाचार सोसणारी व्यक्ती मदतीच्या अपेक्षेत असते. तिला समजून घेणारं कोणीतरी हवं असतं. मात्र ती स्वतहून सांगेलच असं नाही. ते न सांगता ज्याला कळतं तोच त्या व्यक्तीला मदत करू शकतो. त्यासाठी गरज आहे ती डोळस होण्याची.

पण सुरुवात प्रत्येक घरात होणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक घरात आज पुढची पिढी तयार होतेय, जी आपल्याच घरातल्या मोठय़ांचे अनुकरण करतेय. तिला तिच्या निकोप वाढीसाठी गरजेची असलेली नैतिक आणि सामाजिक मूल्यांची जबाबदारी शेवटी आपलीच आहे. हो ना! वर्तमानपत्राचे रकाने चांगल्या बातम्यांनी भरायला हवे असतील तर तसे प्रयत्न आपण केलेच पाहिजेत. वेळ लागेलही यासाठी; पण एक दिवस नक्की होईल!
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)
˜ [email protected]