मनतरंग : पंखांना बळ हवे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

‘बॉडी डिस्मॉर्फिया’ ही अशी मानसिक अवस्था असते ज्यामध्ये व्यक्तीला स्वतःच्या शरीराची थोडीसुद्धा कमतरता ही एकदम मोठी वाटायला लागते. काहीजणांना मग स्वतःच्या केसांचा रंग, शरीराच्या भागावर असलेली चरबी किंवा मग चेहरा आवडेनासा होतो. अशा व्यक्ती मग आपल्या शरीरावरच्या त्या एका विशिष्ट भागाबद्दल कमालीच्या सतर्क असतात. ही सतर्कता मग चिंतेमध्ये बदलते आणि हेच जर सतत (6 महिन्यांपेक्षा जास्त) चालू राहिले तर मग ‘बॉडी डिस्मॉर्फिया’ नावाचा मानसिक आजार जन्म घेऊ शकतो. अशा केसेसमध्ये ह्या व्यक्ती आत्मविश्वास गमावून बसतात आणि त्यांना कायम ‘इतरांची मान्यता’ त्यांच्या प्रत्येक कामात लागते. जर का त्यांनी स्वतः कुठलेही पाऊल उचलले तरी त्यांना कोणाचा तरी आधार लागतो. समजा तो जर नाही मिळाला तर त्यांची चिडचिड होते किंवा मग त्यांना नैराश्य-नकारात्मकता येऊ शकते.

ही गोष्ट आहे एका फुगेवाल्याची! हा फुगेवाला दररोज फुगे विकायचा. त्याच्याकडे निरनिराळ्या रंगांचे आणि आकारांचे फुगे होते. ते फुगे तो विकायचा. या फुगेवाल्याकडे ‘हिलियम’चे (गॅस भरलेले) फुगेही असायचे. अधूनमधून तो तेही विकायचा. सगळ्या लहान मुलांना त्याचे हिलियमचे फुगे विशेष आवडायचे. एकदा त्याला लहान मुलाने एक प्रश्न विचारला, ‘काका, माझ्याकडे एक काळ्या रंगाचा न फुगवलेला फुगा आहे. त्यात हवा भरली तर तो उडेल का?’ त्या फुगेवाल्याने त्या मुलाला काय उत्तर दिले असेल? हा प्रश्न मी निशा (नाव बदलले आहे)ला जेव्हा विचारला तेव्हा तिचे डोळे आनंदाने चमकले. चेहऱ्यावर हसू पुन्हा एकदा परतलं होतं.

निशा ही बारावीच्या वर्षाला होती. दिसायला अतिशय सामान्य, स्थूलपणाकडे जाणारी अशी तिची अंगकाठी होती. निशाला तिच्या रंगरूपाचा प्रचंड न्यूनगंड होता. इतका की ती कॉलेजला गरज असेल तरच जात होती. तिचे मित्र-मैत्रिणीही कमी होते. नातेवाईकांकडे तिचं जाणं फारसं होत नसे.

निशा ही दिवसरात्र स्वतःच्या विश्वात असायची. बाजारात मिळणारं प्रत्येक फेअरनेस क्रिम तिने वापरून बघितलं होतं आणि रंग उजळला नाही म्हणून फेकून दिलं होतं. बांधेसूद शरीरासाठी तिचा व्यायामाचा मारा चालू होताच, पण तिने स्वतःच इंटरनेटवरून काही डाएटिंगचे प्रकार शोधले होते. फरक काही पडत नव्हता.

या सर्वांमुळे निशा अधिकाधिक निराश होत चालली होती. तिचं अभ्यासातलं लक्ष उडत चाललं होतं. मन ‘मला बारीक आणि गोरं व्हायचंय’ ह्या आणि अशा प्रकारच्या विचारांनी ऑब्सेसिव बनत चाललं होतं. निशाने स्वतःला आणि स्वतःच्या शरीराला स्वीकारणं सोडलं होतं. स्वतःच्या शरीराबद्दल असलेला तिचा राग आणि स्वतःच्या रंगावरून असलेला तिचा तिरस्कार हल्ली वाढत चालला होता.

‘बॉडी डिस्मॉर्फिया’ ही अशी मानसिक अवस्था असते ज्यामध्ये व्यक्तीला स्वतःच्या शरीराची थोडीसुद्धा कमतरता ही एकदम मोठी वाटायला लागते. काहीजणांना मग स्वतःच्या केसांचा रंग, शरीराच्या भागावर असलेली चरबी किंवा मग चेहरा आवडेनासा होतो. अशा व्यक्ती मग आपल्या शरीरावरच्या त्या एका विशिष्ट भागाबद्दल कमालीच्या सतर्क असतात. ही सतर्कता मग चिंतेमध्ये बदलते आणि हेच जर सतत (6 महिन्यांपेक्षा जास्त) चालू राहिले तर मग ‘बॉडी डिस्मॉर्फिया’ नावाचा मानसिक आजार जन्म घेऊ शकतो.

निशाच्या बाबतीत अजून एक गोष्ट अशी झालेली की लहानपणी तिची तिच्या स्थूलपणामुळे तिच्या आजीकडून खूपच कडवट बोलणी ती ऐकत आली होती. त्यामुळे ती काहीशी दुखावलीही गेली होती. अशातच शाळेत इतर मुलांचं चिडवणं आणि मस्करीमुळे ती एकलकोंडीही बनत चालली होती.

अशा केसेसमध्ये ह्या व्यक्ती आत्मविश्वास गमावून बसतात आणि त्यांना कायम ‘इतरांची मान्यता’ त्यांच्या प्रत्येक कामात लागते. जर का त्यांनी स्वतः कुठलेही पाऊल उचलले तरी त्यांना कोणाचा तरी आधार लागतो. समजा तो जर नाही मिळाला तर त्यांची चिडचिड होते किंवा मग त्यांना नैराश्य-नकारात्मकता येऊ शकते.

या सगळ्यावर उपाय तो काय?

निशाचा तिने गमावलेला आत्मविश्वास तिला परत मिळवण्यासाठी मदत करणं हे महत्त्वाचं आव्हान होतं. कारण ती तिच्या क्षमता आणि हुशारी यांना कमी लेखत होतीच. शिवाय ‘मी कुरूप आहे’ हा विचार तिच्यावर कुरघोडी करत होता.

‘मॅडम, न फुगवलेला फुगा हा कुठल्याही रंगाचा असो, तो उडणारच नाही आणि कुठलाही फुगा काळा का असेना जर त्यात हवा भरली तर तो उडणारच. फुग्याचं उडणं हे त्याच्या रंगावर नाही, तर त्याच्या आतमधल्या हवेवर अवलंबून असतं.’ निशा एवढं बोलून पटकन थांबली आणि माझ्याकडे बघून हळूच हसली. फुगेवाल्याची गोष्ट तिला कुठेतरी क्लिक झाली होती. मग पुढच्या गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या. ‘माझी प्रगती ही माझ्या रंगरूपावर नाही, तर माझ्यात असलेल्या क्षमता आणि गुणांवर अवलंबून आहे.’ हे जसजसं तिला कळत गेलं तसतसं ती स्वतःच्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिकली. तिला अजून जाणीव करून देण्यासाठी रूपाने सामान्य, पण कर्तृत्वाने असामान्य अशा व्यक्तींची आत्मचरित्रे वाचण्याचा सल्ला दिला. तसेच स्वतःवर काम करताना तिला प्रेरणा मिळावी म्हणून स्वयंप्रेरणेचे तंत्र समुपदेशनाद्वारे शिकवले.

या सगळ्यात तिच्या पालकांनाही विश्वासात घेतले गेले. कारण, निशा आठवडय़ातून एकदाच समुपदेशन घेत होती. मात्र या सत्रांत सांगितलेल्या गोष्टींसाठी तिचे पालकही तिला जास्त मदत करणार होते.

या सगळ्या गोष्टी आता वाचायला जशा सोप्या आहेत तेवढय़ाच त्या अंमलात आणणे आणि त्यांचे सातत्य राखणे हे निशासमोर आव्हान होते. पण तिच्या अंगभूत असलेल्या प्रामाणिकपणा आणि मेहनत घेण्याच्या वृत्तीमुळे तिने ते सहज पेलले. कारण शेवटी तिच्यामध्ये असलेल्या काळ्या फुग्याला त्याच्यातील चांगल्या गुणांची जाणीव कुठेतरी तिला आत्मसन्मान देऊन गेली होती.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
– [email protected]