मातीचे आरोग्य जपू या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. आदिनाथ ताकटे

हिंदुस्थान कृषीप्रधान देश असला तरी पिकाच्या अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी हिंदुस्थानी शेतीचे आरोग्य बिघडत चालले असल्याचे चित्र सामोरे येत आहे. सद्य परिस्थितीत मातीच्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने जमिनीच्या सुपिकतेवर आणि उत्पादकतेवर विपरीत परिणाम झाला आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक मृदा दिनानिमित्त मातीचे आरोग्य जपण्यासाठी जागरूक होणे गरजेचे आहे.

हिंदुस्थान हा कृषीप्रधान देश आहे. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था ही कृषीक्षेत्रावर आधारित आहे. साहजिकच हिंदुस्थानी समाजजीवनात शेतीला पर्यायाने शेतकऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदुस्थानात कृषी संस्कृती ही पारंपरिक असली तरी स्वातंत्र्यानंतर झालेल्या हरित क्रांतीमुळे हिंदुस्थानात आधुनिक शेतीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली.

आज जगात हिंदुस्थानचा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो आणि विशेष म्हणजे या लोकसंख्येला आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याबाबत हिंदुस्थान स्वयंपूर्ण आहे. यावरून हिंदुस्थानी संस्कृतीत शेतीचे महत्त्व विषद होते, परंतु असे असले तरीही दुसरीकडे मात्र पिकाच्या अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी हिंदुस्थानी शेतीचे आरोग्य बिघडत चालले असल्याचे चित्र सामोरे येत आहे.

सधन कृषी पद्धतीत रासायनिक खतांच्या अनिर्बंधित वापरामुळे तसेच तदनुषंगिक कारणामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. मातीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी माती तपासणी आधारित खतांच्या परिणामकारक वापरास महत्त्व प्राप्त झाले आहे.परिणामी शेतीबाबत पर्यायाने मातीच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने मातीच्या निरोगी आरोग्याचे गांभीर्य ओळखून केंद्र शासनाने देशभरात मृद्पात्रिका, आरोग्यपात्रिका अभियान राबवण्याचा निर्णय घेतला असून या अभियानांतर्गत जिरायती व बागायती जमिनीचा म्हणजेच मातीचा सामू व क्षारता, मातीतील सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश, सूक्ष्म मूलद्रव्ये, जसे जस्त, तांबे, लोह, मंगल आदी घटक तपासून शेतकऱ्यांना मृदा आरोग्य संवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजनांचे मार्गदर्शन केले जात आहे.

शाश्वत शेती व्यवस्थापनामध्ये जमिनीचे आरोग्य अबाधित राखून किफायतशीर पीक उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक असते. दरवर्षी पीक घेतल्यामुळे पिकांच्या शोषणामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत असतो. त्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होते. जमिनीची सुपीकता आजमावण्यासाठी भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माची तपासणी करणे आवश्यक असते. त्यासाठी माती परीक्षणाची गरज आहे. माती परीक्षणामुळे जमिनीच्या सर्व गुणधर्माची माहिती मिळते. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते आणि त्यानुसार रासायनिक खतांच्या मात्रा व शिफारसी ठरविणे सुलभ होते.

माती आणि पाणी ही पिकांची संजीवनी आहे. पिकांचे अस्तित्व मातीच्या आणि पाण्याच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते. पीक उत्पादनातील सर्वात महत्त्वाचा घटक कालांतरापासून शेतकरी जमिनीत विविध पिके घेत आला आहे. पूर्वीच्या काळात सेंद्रिय पदार्थ जमिनीत साचण्याचे प्रमाण जास्त होते. साहजिकच जमिनीचा पोत टिकण्यास आपोआपच मदत होत असे. अन्नधान्याची गरज जसजशी वाढू लागली तसा जमिनीतून अधिकाधिक उत्पादन काढण्याकडे कल वाढत गेला. त्यासाठी प्रगत व उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेतीसाठी अधिक भांडवल गुंतवावे लागत असल्याने या ठिकाणी माती व पाणी परीक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण झालेले आहे.

माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन केल्याने खतांच्या मात्रेत बचत तर होतेच, परंतु जमिनीचे स्वास्थ्य टिकवण्यासाठासुद्धा मदत होते. जमिनीच्या स्वास्थ्याविषयक समस्यांचे निदान व त्यावरील उपाययोजना याबाबतचे नियोजन हे या माती व पाणी परीक्षणावरच आधरित असते. जमिनीच्या नियोजनासाठी माती परीक्षणाबरोबर मृद सर्वेक्षणामुळे जमिनीची उत्पत्ती, तिचे गुणधर्म काय आहे हे समजते. मृद सर्वेक्षणामुळे जमिनीच्या समस्या व प्रमाण यांची माहिती मिळते. अशा समस्या दूर करण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत याचे नियोजन व व्यवस्थापन मृद सर्वेक्षणाच्या आधारे करता येते.

सुपीक जमीन ही निसर्गाची एक देणगी असून तिची योग्य काळजी घेतल्यास ती एक चिरकाल ठेव आहे. जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू जरी कमी पडली तरी उत्पादनात घट येते. जमिनीची सुपिकता, तिचे महत्त्व आणि ती वाढविणे किंवा टिकविणे याबाबतच्या उपाययोजना करणे खूप महत्त्वाचे आहे. गेल्या 50 वर्षांत रासायनिक खतांचा आणि पाण्याचा अनिर्बंध वापर झाला. त्यामुळे लाखो हेक्टर जमीन नापीक झाली. रासायनिक खतांच्या वापरामुळे मोठा फायदा होतो असे प्रारंभी दिसले खरे, परंतु लहान मुलांची प्रकृती लक्षात न घेता खाद्यपदार्थांचा आणि व्हिटॅमिन्सचा मारा केला तर त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडत जाते तसाच काहीसा प्रकार शेतजमिनीच्या बाबतीत झाला. जमीन सुधारण्याऐवजी, जादा उत्पादन मिळण्याऐवजी पिकाला आवश्यकतेपेक्षा जास्त खत दिल्यामुळे जमीन बिघडली. उत्पादन कमी येऊ लागले, त्याचबरोबर खरोखरच आवश्यक असलेल्या सेंद्रिय खतांकडे दुर्लक्ष झाले. पाटाचे पाणी परत केव्हा मिळेल याची खात्री नसल्यामुळे मिळाले की, पिकाला आवश्यक नसतानाही जड पाणी दिल्याने क्षाराचे प्रमाण वाढत गेले. त्या जमिनीत पीक येईनासे झाले. जमीन नापीक झाली, क्षारपड झाली. खते आणि पाणी यांच्या अधिकाधिक वापराने अधिकाधिक उत्पादन घेण्याची हाव नडली. अतिरेक अंगलट आला. हरित क्रांतीच्या यशाच्या नादात शेतजमिनीचे आजारपण फार उशिरा लक्षात आले.

एकीकडे लागवडयोग्य क्षेत्रात अनेक कारणांनी होत असलेली घट, जमिनीचा खालावत चाललेला पोत हे आजच्या शेतीसमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे शेती टिकवायची असेल तर माती जिवंत राहिली पाहिजे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2015 या वर्षापासून दरवर्षी 5 डिसेंबर रोजी मृदा दिन म्हणून साजरा होत आहे. या पाठीमागील प्रमुख उद्देश जमिनीच्या आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणे आणि त्यावरील उपाययोजना यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जाणीव निर्माण करणे.

सद्यपरिस्थितीत मातीच्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने जमिनीच्या सुपीकतेवर आणि उत्पादकतेवर विपरीत परिणाम झाला आहे. दरवर्षी हेक्टरी 16 टन माती वाहून जात आहे. जमिनीतील सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण अत्यंत कमी (0.03 टक्क्यापर्यंत) झाले आहे. जागतिक स्तरावर या बाबींची प्रकर्षाने नोंद घेतली गेली आहे. वाढत्या लोकख्येसाठी पुरेशा अन्नधान्याचे उत्पादन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. अन्नधान्यही सकस असले पाहिजे. याबाबतीत स्वावलंबी होणेही जरुरी आहे. त्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न होत आहेत. शासनही सतर्प झाले आहे. जमिनीत काय कमी आहे हे आजमावत रासायनिक खतांचा आणि पाण्याचा मारा करण्यापूर्वी झालेली चूक परत होऊ नये म्हणून जमिनीची तपासणी करून सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा तपासणीमुळे जमिनीत काय कमी आहे आणि किती कमी आहे हे आजमावता येते आणि ते व तेवढेच देण्याच्या प्रयत्न करता येतो.

शेती व्यवसायामध्ये सुपीक जमिनीस अत्यंत महत्त्व आहे. म्हणून शेतकऱ्याने आपल्या जमिनीविषयीची सखोल माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. आपली जमीन कशी आहे, पाणी कसे आहे, त्यानुसार कोणते पीक घेतले पाहिजे, त्या पिकास कोणत्या अन्नद्रव्यांची केव्हा आणि किती प्रमाणात गरज आहे, जमिनीत किती प्रमाणात अन्नघटक उपलब्ध आहेत, भरपाई कोणत्या खतामधून भागविता येईल याचा विचार करताना जमिनीचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे त्याचाही विचार करणे आवश्यक आहे. यशस्वी शेतीचे रहस्य प्रामुख्याने जमिनीतून भरघोस पीक घेणे तसेच जमिनीची उत्पादन क्षमता कायम टिकवून ठेवणे हे आहे. नियमित माती, पाणी परीक्षण ही नियोजनबद्ध, किफायतशीर शेतीची गुरुकिल्ली आहे.

(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पात कार्यरत आहेत.)
[email protected]