विशेष – कोरोना, कोरोनील आणि आक्षेप

>> डॉ. अविनाश भोंडवे

पतंजली आयुर्वेद कंपनी निर्मित कोरोनील हे औषध कोरोना प्रतिबंध आणि उपचारासाठी उपयुक्त असल्याचा व या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केल्यानुसार मान्यता दिल्याचा दावा केला जात होता. परंतु खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत स्पष्टता दिल्याने आयुष मंत्रालयाने दिलेल्या मान्यतेबाबत आणि इतर काही मुद्दय़ांबाबत भारतीय वैद्यक संघटनेने (आयएमए) आक्षेप नोंदविले आहेत.

योगगुरू म्हणवणाऱया बाबा रामदेवांनी 19 फेब्रुवारीला एक समारंभ आणि पत्रकार परिषद घेतली. बाबा रामदेवांच्या पतंजली फार्मा या औषध कंपनीतर्फे ‘कोरोनील’ नावाचे कोरोनावरील औषध बाजारात आणल्याचे जाहीर करण्यासाठी हा समारंभ होता. पतंजलीचे हे आयुर्वेदिक औषध कोरोनाचा प्रतिबंध करते आणि आजार झाल्यावर विषाणूच्या बाधेपासून रुग्णांना मुक्तही करते, असे याप्रसंगी बाबा रामदेवांनी सांगितले. हिंदुस्थानच्या औषध नियंत्रण सर्वाधिकारी (डीसीजीआय) यांच्याकडून त्यांना मान्यता मिळाली आहे तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील त्याला कोरोनासाठी मान्यता दिलेली असून जगातील 154 देशांत कोरोनील निर्यात केले जाईल अशा जाहीर घोषणा या कार्यक्रमात केल्या गेल्या. या समारंभात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बाबांची आणि कोरोनील या औषधाची भलावण केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील या औषधाची तारीफ केली.

मात्र या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर आयएमएच्या हिंदुस्थानभरातील सदस्यांना एक जबरदस्त धक्का बसला. आयुर्वेदाच्या नावाखाली बनविलेल्या या अशास्त्र्ााrय औषधाच्या कार्यक्रमात चक्क देशाचे आरोग्यमंत्री सामील झाले याबाबत अनेकांना आश्चर्य आणि खेदही वाटला.

आयएमएचे राष्ट्रीय सचिव डॉ. जयेश लेलेंनी त्वरित जागतिक आरोग्य संघटनेला एक इ-मेल पाठवून पतंजली फार्माच्या कोरोनील औषधाला दिलेल्या मान्यतेबाबत विचारले. यावर जागतिक आरोग्य संघटनेने एक ट्विट करून ‘‘आम्ही कोणत्याही पर्यायी पद्धतीच्या औषधांना मान्यता दिलेली नाही’’ असे उत्तर दिले. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील आयएमएच्या पदाधिकाऱयांनी एक पत्रक काढले. या पत्रकामध्ये पतंजली फार्माने जागतिक आरोग्य संघटनेकडून त्यांना कोरोनील कोरोनाच्या उपचारासाठी वापरायला आणि 154 देशांमध्ये निर्यात करायला दिलेल्या तथाकथित परवानगीचा ‘पर्दाफाश’ केला. आयएमएने दिलेल्या या वृत्तपत्र निवेदनात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या दुटप्पी वागण्याबाबत आक्षेप घेत खालील गोष्टींबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे –

1. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आधुनिक वैद्यकशास्त्र्ााचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. त्यामुळे भारतीय मेडिकल कौन्सिलचे नीतिनियम त्यांना लागू होतात. या नीतिनियमातील कलम 6ः1ः1अन्वये, या कौन्सिलच्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने कोणत्याही औषधाची जाहीररीत्या जाहिरात किंवा भलावण लिखित अथवा वक्तव्याद्वारे करण्यास मनाई आहे. तसेच त्याने त्याचे नाव, सही, फोटो कोणत्याही औषधाच्या प्रमोशनसाठी कोणत्याही धंदेवाईक कंपनीला वापरू देऊ नये असेही नमूद केलेले आहे. कोरोनीलच्या या कार्यक्रमास उपस्थित राहून आणि या कार्यक्रमात कोरोनीलची स्तुती करून डॉ. हर्षवर्धन यांनी या कायद्याचे उल्लंघन केले आहे.

2. मेडिकल कौन्सिलच्या नीतिनियमातील कलम 6.5 नुसार, ज्या औषधातील घटक अधिकृतरीत्या माहीत नाहीत, ज्या औषधाच्या घटकांबाबत गुप्तता पाळली जात आहे, असे औषध वापरणे किंवा इतरांना वापरण्यास सांगणे हा नियमभंग मानला गेला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनील औषधाचे घटक त्यांना माहीत नसतानादेखील ते कोरोनासाठी वापरले जाण्याबाबत शिफारस केलेली आहे.

3. देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी अशी अवैज्ञानिक उत्पादने देशवासीयांना वापरण्यासाठी प्रस्तुत करणे कितपत न्याय्य आहे? तसेच संपूर्ण देशाला अशा प्रकारच्या अनैतिक आणि चुकीच्या मार्गाने बनावट उत्पादनास प्रोत्साहन देणे किती नैतिक आहे?

4. आपण प्रोत्साहन देत असलेल्या या कोरोनाविरोधी औषधाच्या वैद्यकीय चाचण्या (घेतल्या असल्यास) त्या कोणत्या काळात आणि कोणत्या प्रकारे, कोणत्या स्वरूपात घेतल्या गेल्या याबाबत आपण देशाचे आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय डॉक्टर म्हणून स्पष्टीकरण देऊ शकाल?

5. या कोरोनाविरोधी औषधाच्या शास्त्र्ााrय पद्धतीने घेतलेल्या ‘डबल ब्लाइंड’ किंवा ‘सिंगल ब्लाइंड’ चाचण्या किती रुग्णांवर घेतल्या गेल्या हे जाहीर करू शकाल?

6. हा कार्यक्रम झाल्यानंतर झालेल्या एका मुलाखतीत बाबा रामदेव यांनी आधुनिक वैद्यकशास्त्र्ााबद्दल अत्यंत वादग्रस्त आणि भडकवणारी विधाने करत ‘‘आधुनिक वैद्यक हा एक वैद्यकीय दहशतवाद आहे’’ असा उल्लेख केला. देशाचे आरोग्यमंत्री आणि आधुनिक वैद्यकीय डॉक्टर म्हणून या विधानाचे आपण समर्थन करता का?

7. देशाच्या औषध नियंत्रण सर्वाधिकारी यांनी कोणत्या गोष्टींच्या आधारे या औषधाच्या मुक्त वापराला मान्यता दिली आहे? सदर घोषणा या कार्यक्रमात आपल्याच उपस्थितीत केली गेली होती.
कोरोनील हे औषध कोरोना विषाणूने होणाऱया आजाराचा प्रतिबंधही करते आणि तो आजार झाल्यास त्याचा उपचार म्हणूनही ते वापरता येते असे म्हणणे हे अशास्त्र्ााrय असून हिंदुस्थानी नागरिकांची होणारी शुध्द फसवणूक आहे. बाबा रामदेवांचे कोरोनील जर कोरोना आजाराचा प्रतिबंध करण्यास एवढे प्रभावी असेल, तर सरकारी तिजोरीतील 35 हजार कोटी रुपये कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी का खर्च केले? सध्या हिंदुस्थानी नागरिकांना दिली जात असलेली लस आणि कोरोनील यामध्ये कोरोना प्रतिबंध करण्यास डॉ. हर्षवर्धन यांच्या मते कोण जास्त उपयुक्त आहे? कोरोनीलला केंद्र सरकार अधिकृत आयुर्वेदिक लस म्हणून वापरणार का? याबाबतीतही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून स्पष्टीकरण हवे आहे.
आयएमए शुद्ध आयुर्वेदाचा सन्मानच करत आली आहे, परंतु अशा प्रकारे आयुर्वेदाबाबत जनतेच्या मनात असलेल्या आदराचा गैरफायदा घेऊन आपले अशास्त्र्ााrय औषध आयुर्वेदिक म्हणून घुसवणाऱया प्रवृत्तींचा आयएमए निषेध करते. अशी औषधे ही आयुर्वेदिक नसतात, ती केवळ काही धनदांडग्या व्यक्तींचा आणि कॉर्पोरेट समूहांचा फायदा करण्यासाठीच बाजारात येत असतात. सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने ही एक महाआपत्तीच ठरते.

(लेखक आयएमए, महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष आहेत)
– avinash.[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या