अभिप्राय – गुंतागुंतीचे वास्तव

>> डॉ. बाळासाहेब लबडे

चंद्रकांत बाबर यांचा `यास्मिन आणि इतर दीर्घ कविता’ (सत्यान्वेषी प्रकाशन, एप्रिल 2025) हा कवितासंग्रह समकालीन मराठी दीर्घ कवितेतील एक महत्त्वाचा आणि संवेदनशील हस्तक्षेप ठरतो. या संग्रहात `यास्मिन – एक आठवण’, `मी गच्च धरून ठेवलं आहे काबाला’ आणि `सैतानाच्या तावडीतून सुटका’ अशा तीन दीर्घ कवितांचा समावेश असून प्रेम, धर्म, स्त्राrदेह, हिंसा, सत्ता आणि कुटुंब संस्था यांचे गुंतागुंतीचे वास्तव या कवितांतून उलगडते.

`यास्मिन – एक आठवण’ ही दीर्घ कविता वरवर पाहता प्रेमभंगाची वाटत असली तरी ती केवळ वैयक्तिक प्रेमकथा राहत नाही. हिंदू-मुस्लिम धार्मिक सीमारेषा ओलांडून उभ्या राहिलेल्या प्रेमाची ही कथा आहे. येथे प्रेम हे `इबादत’ आहे; पण समाजातील सांप्रदायिक उन्माद, पुरुषसत्ताक मानसिकता आणि हिंसा या प्रेमाचा नाश करतात. यास्मिनचा मृत्यू हा एका स्त्राrचा नव्हे, तर स्त्राrच्या प्रेम करण्याच्या स्वातंत्र्याचा आणि माणुसकीचा खून आहे. मुस्लिम मोहल्ला, उर्दू-अरबी-फारसी शब्दसंपदा, धार्मिक विधी, जनाजा, मातम अशा प्रतिमांतून कवितेचा सांस्कृतिक अवकाश जिवंत होतो. नायकाचे तुटलेले भावविश्व, देव-धर्माबाबतचे प्रश्न आणि हरवलेल्या प्रेमासाठीची आर्त हाक ही कविता सामाजिक दस्तऐवज बनवते.

`मी गच्च धरून ठेवलं आहे काबाला’ या दुसऱया दीर्घ कवितेत बाबर अधिक तीव्र आणि विद्रोही स्वरात समकालीन वास्तवाशी भिडतात. मोहल्ल्यातील सहअस्तित्व, अफवा, दंगली, पुढारीगिरी आणि धार्मिक राजकारण यांचे विदारक चित्र येथे दिसते. काबा, करबला, कयामत यांसारखी धार्मिक प्रतीके केवळ श्रद्धेची न राहता नैतिकतेची आणि मानवी करुणेची प्रतीके बनतात. निवेदकाचा आतला संघर्ष, अपराधबोध, पुरुषत्वाबद्दलचे प्रश्न आणि कृती न होण्याची वेदना ही कविता अधिक अस्वस्थ करते. यास्मिन आणि रेश्मा या स्त्राr व्यक्तिरेखा पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्राrची असुरक्षितता आणि मौन व्यक्त करतात, तर दिलावरसारखी पात्रे धर्माच्या नावाने उगवलेल्या सत्तेचे भयावह रूप दाखवतात.

`सैतानाच्या तावडीतून सुटका` ही दीर्घ कविता कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरील पितृसत्तेचे ाtढर वास्तव उघड करते. येथे `सैतान’ हा बाहेरचा नसून घरातला आहे-बापाच्या रूपात. कामगारातून कारखानदार बनताना तो शोषक होतो आणि कुटुंबालाच आपल्या सत्तेचे बळी बनवतो. निवेदकाचा अपूर्ण विद्रोह, आईचे अदृश्य श्रम, भावंडांतील स्वार्थी नाती आणि कुटुंब संस्थेची ढासळलेली रचना या कवितेतून समोर येते. ही कविता सुटकेची नसून सुटका न होण्याची कबुली आहे; पण लेखनातून अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न आहे.

रचनात्मकदृष्टय़ा हा संग्रह मुक्तछंदातील, तुटक-खंडित रचनेचा, बहुभाषिक प्रवाह असलेला आहे. संवाद, आत्मसंवाद, स्मृती, घोषवाक्ये आणि धार्मिक उद्गार यांचा कोलाज कवितांना मोहल्ल्याचा जिवंत आवाज देतो. बाबरांची भाषा थेट, बोचरी आणि प्रतीकात्मक असून ती वाचकाला अस्वस्थ करून विचार करायला लावते.

एकूणच `यास्मिन आणि इतर दीर्घ कविता’ हा संग्रह प्रेम, मजहब आणि हिंसा यांचा अस्वस्थ संगम मांडत समकालीन समाजातील दुभंग, स्त्राrविरोधी मानसिकता आणि सत्तेचे राजकारण उघडे करतो. हा संग्रह केवळ साहित्यिक अनुभव न राहता मानवी सहअस्तित्वाची आणि सामाजिक संवेदनशीलतेची महत्त्वपूर्ण साक्ष ठरतो.

यास्मिन आणि दीर्घ कविता

कवी : चंद्रकांत बाबर

प्रकाशक : सत्यांन्वेशी प्रकाशन

रेखाटने : प्रभाकर कोलते

ह पृष्ठ : 148 ह मूल्य : 350 रुपये