अक्षरलिपीचा निर्माता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. चंद्रकांत कुलकर्णी

लेखनासाठी थेट ध्वनीवर आधारित लिपीचा विचार गणेशाने हजारो वर्षांपूर्वी केला होता. ध्वनी हा मध्यवर्ती ठेवून त्याचे मूर्तरूप म्हणून थेट अक्षरे विकसित केली. अथर्वशीर्ष या गणेशविषयक श्लोक समूहामध्ये किंवा स्तोत्रामध्ये देवनागरी लिपीचा निर्माता या स्वरूपात गणपती आपल्याला दिसतो. निर्माण केलेली लिपी कशी लिहावी व कशी उच्चारावी याचा पाठच अथर्वशीर्षात सापडतो.

जिभेवर सरस्वती नाचावी हे स्वप्न जर आपण पाहत असू तर त्याआधी, तिचा पती असलेल्या गणेशाने दिलेल्या भाषेचा उच्चार शुद्ध, प्रमाणित करायला आपण शिकले पाहिजे.

गणपती या चार अक्षरांमध्ये अनेक गुण, शक्ती आणि प्रेरणा सामावल्या आहेत. गणेशाच्या अनेक गुणांचा विचार अनेकांनी केला आहे किंबहुना आपणही करीत असाल. यामध्ये आपल्या देवनागरी या लिपीचा निर्माता म्हणून गणेश जेव्हा समोर येतो तेव्हा तो वाचासंस्कार करणारा म्हणून ओळखला जातो.
अथर्वशीर्ष या गणेशविषयक श्लोक समूहामध्ये किंवा स्तोत्रामध्ये देवनागरी लिपीचा निर्माता या स्वरूपात गणपती आपल्याला दिसतो. निर्माण केलेली लिपी कशी लिहावी व कशी उच्चारावी याचा पाठच अथर्वशीर्षात सापडतो, जो आपण नकळत म्हणत असतो. तो असा –

गणादिं पूर्वमुच्चाय ।। वर्णादिं तदनन्तरम् ।।
अनुस्वारः परतरः ।। अर्धेंन्दुलसितम् ।।
तारेण ऋद्धम ।। एतत्तव मनुस्वरूपम् ।।
गकार ः पूर्वरूपम् ।। अकारो मध्यमरूपम् ।।
अनुस्वारश्चान्त्यरूपम् ।। बिन्दुरूत्तररूपम् ।।
नादः संधानम् ।। संहिता संधिः।। स एवा गणेशविद्या ।।

याचा अर्थ, गणांचा उच्चार आधी करावा. मग ते रंगांनी (वर्णाने) काढावेत. उच्चार सुस्पष्ट दिसण्यासाठी आवश्यकता भासल्यास अनुस्वार काढावा. अशाप्रकारे लिहिलेले गण (अक्षरे) वळणदार-अर्धचंद्राकृती (टोकदार नसावेत) असावेत. लिहून झाल्यावर मोठय़ाने (तारस्वरात) ते म्हणून पाहावेत. अशाप्रकारे लिहिलेले गण म्हणजे तुझे (गणेशाचे) मनुस्वरूप आहे. त्यामध्ये गकार हे पूर्वरूप (स्वर न मिसळलेला शुद्ध वर्म), अकार हे मध्यमरूप (स्वराचे चिन्ह), अनुस्वार हे अन्त्य रूप (गँ लिहितानाचा हा सर्व क्रम आहे. त्यामुळेच गँ हा बीजमंत्र मानला जातो.) आणि त्यावरील बिंदू हे त्यापलीकडचे (उत्तर) रूप आहे. पुन्हा हे सर्व लिहिल्याला एक नाद आहे, लय आहे (नादानुसंधान) अशी ही गणेश विद्या होय.

यावरून आपल्या लक्षात येईल की, लेखनासाठी थेट ध्वनीवर आधारित लिपीचा विचार गणेशाने हजारो वर्षांपूर्वी केला होता. ध्वनी हा मध्यवर्ती ठेवून त्याचे मूर्तरूप म्हणून थेट अक्षरे विकसित केली. म्हणजे आज फोनेटिक्सचा जो काही बोलबाला होतो आहे आणि एक नवकल्पना म्हणून कुतूहल निर्माण केले जात आहे, त्याचा विचार हिंदुस्थानी लेखनकलेने फार पूर्वीच केला आहे.

शंभुलिपी, ब्राह्मी, खरोष्टी, माहेश्वरी, भारती असा अनेक स्थित्यंतरांतून सध्याची देवनागरी लिपी तयार झाली आहे. देवनगर म्हणजे आताचे वाराणसी. येथे प्राचीन लिपीला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले म्हणून तिला देवनागरी म्हणू लागले. काहींच्या मते, देव आणि नागर ज्या एकाच लिपीत लिहितात ती देवनागरी होय. बरे ही सगळी लिपी गणेशाने ध्वनीवर आधारित केल्याने उच्चारांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे एक क्रांतिकारी गोष्ट गणेशाने केली आहे. ती अशी की, उच्चार तंतोतंत करा व त्याप्रमाणे लिहा – म्हणजेच शुद्धलेखनाच्या नियमांचा बाऊ न करता उच्चार सुधारा, नियम आपोआप लक्षात येतील.

म्हणून आपण गणेशाला बुद्धी-चातुर्य-वक्तृत्व-पांडित्य यांची जी देवता सरस्वती, तिचा पती (वाक्पति) मानतो, गणेशाने ध्वनी आधारित लेखनशैली विकसित केली. वर्ण असे म्हणण्याचा काळ संपूण अक्षर (ज्याने डोळे सुखावतात ते – अक्षः यत्र रमते सः आक्षरः।) म्हणण्याचा काळ नंतर सुरू झाला. आपल्या प्रत्येक अक्षरातील तीन वैशिष्टय़ांचा विचारही वेगवेगळय़ा कालखंडात झाला आहे असे विद्वानांचे मत आहे. अर्धचंद्राकृती (वळणदार) आकारात लिपी लिहिण्यास सुरुवात करणारा गणेश हा ब्रह्मस्पती होय, प्रत्येक अक्षरातील अकारदर्शक उभी रेघ देण्यास सुरुवात करणारा गणेश हा महाभारतातील गणपती आणि अक्षरांवर आडवी शिरोरेखा देणारा गणेश हा महागुप्त काळातील पद्मावती नगराचा राजा गणेन्द्रनाग होय. याप्रकारे देवनागरी लिपीची ही गणापत्य परंपरा दिसते.

गणेश या नावातील गण या शब्दाचेही अनुयायी, वर्ण, सैनिक, रक्षक, गुण असे अनेक अर्थ होतात आणि ते वेळोवेळी समोर येतात. आपण येथे लिपीशी संबंधित अक्षर हाच अर्थ घेतला आहे. गणेशाने देवनागरी लिपी म्हणजे गणेशविद्या गणकऋषींना दिली व पुढे त्याचा प्रसार करण्यास सांगितले.

आपण लिहीत असलेली, बोलत असलेली भाषा ही प्रत्यक्ष गणपतीने आपल्याला दिली आहे. त्यामुळे तिला कागदावर उमटवताना, तिचे उच्चारण करताना त्याचे स्वरूप बिघडणार नाही व त्याद्वारे गणपतीचा अपमान होणार नाही याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. जिभेवर सरस्वती नाचावी हे स्वप्न जर आपण पाहत असू तर त्याआधी, तिचा पती असलेल्या गणेशाने दिलेल्या भाषेचा उच्चार शुद्ध, प्रमाणित करायला आपण शिकले पाहिजे.