लेख – ग्रंथसंस्कृती वाढविण्याची आवश्यकता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. दीपक पवार  [email protected]

‘वाचेल तो वाचेल’ हे वाक्य आपण अगदी सहजपणे बोलतो. पण हे सहजसोपे वाक्य नाही. तर हे एखाद्या समाजाचा बौद्धिक निर्देशांक दाखवणारं वाक्य आहे. महाराष्ट्रामध्ये एकांडय़ा शिलेदारांनी ग्रंथ संस्कृतीच्या वाढीसाठी प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण महाराष्ट्राला महात्मा गांधी यांच्यासारख्यांनी कार्यकर्त्यांचं मोहोळ असंही म्हटलेलं आहे. आज ग्रंथालय सेनेच्या निमित्ताने हे मोहोळ पुन्हा एकदा जागवण्याची संधी आपल्या सगळ्यांपुढे चालून आली आहे.

महाराष्ट्राला वाचन संस्कृतीची दीर्घ परंपरा आहे. मौखिक संस्कृतीच्या विकासापासून लेखन कलेच्या विकासापर्यंत मोठा काळ लोटला आहे. या काळामध्ये समाजाची वाचण्याची गरज आणि इच्छा बदलत गेली. त्याचबरोबरीने वाचनाची साधनेही बदलत गेली. एकेकाळी वाचन समाजाच्या मोजक्याच घटकांना उपलब्ध होते. पण आज वर्तमानपत्रांपासून ई-पुस्तकांपर्यंत अनेक प्रकारचे वाचनाचे मार्ग उपलब्ध झाले आहेत, तसेच एका पातळीवर लोकांची वाचनाची भूकही वाढली आहे. वाचन संस्कृतीचे, किंबहुना ग्रंथ संस्कृतीचे हळूहळू का होईना, लोकशाहीकरण होते आहे असे दिसते. चारमंथन करणं अत्यंत औचित्याचं आहे असं मला वाटतं.

वाचन ही व्यक्ती आणि समूहाची गरज आहे. सामूहिक शहाणपण यायला हवं असेल तर वाचनाचं चळवळीत रूपांतर करणं आवश्यक आहे. अनेक मराठी, हिंदुस्थानी तसेच जागतिक लेखकांनी ग्रंथांवरचं आपलं प्रेम आणि अर्थपूर्ण जगण्यातलं ग्रंथांचं स्थान याबद्दल भरभरून लिहिलं आहे. पुस्तकांवर प्रेम करणाऱया प्रत्येकाने स्वतः तर ते वाचलं पाहिजेच, पण आपलं कुटुंब, मित्र मैत्रिणी, सामाजिक वर्तुळ, कामाचे ठिकाण अशा सर्व ठिकाणी पुस्तकांबद्दल आग्रहाने बोललं पाहिजे. आज महाराष्ट्रातल्या ग्रंथ संस्कृतीला जर कशाची गरज असेल तर या उभारीची आहे. त्यादृष्टीने ‘शिवसेना ग्रंथालय सेना’ हे वाचन संस्कृतीच्या प्रचार प्रसाराचं महत्त्वाचं वाहन ठरलं पाहिजे. किंबहुना शेतकऱयांपासून ग्राहकांपर्यंत जसे दबाव गट तयार होतात, तसा वाचकांचा, ग्रंथप्रेमींचा सक्रिय दबाव गट तयार झाला पाहिजे आणि धोरणकर्त्यांना भाषा, संस्कृतीचा विकास करतांना ग्रंथांचा अपरिहार्यपणे विचार करावा लागला पाहिजे.

गेल्या काही वर्षांत वाचनाचं जग आमूलाग्र बदललं आहे. त्यामध्ये सांस्कृतिक जागतिकीकरणाचा आणि तंत्रज्ञानाचा प्रचंड मोठा वाटा आहे. एकेकाळी लोक घर भरून पुस्तकं ठेवत असत. आता शेकडो पुस्तकं टॅबवर ठेवण्याची सोय झाली आहे. एकेकाळी वाचनालयांच्या वर्गण्या भरून तिथल्या संदर्भ कक्षात जावं लागायचं. आता ऑनलाईन संदर्भांची सोय उपलब्ध झाली आहे. इंटरनेटमुळे जगभरची हवी ती माहिती लोकांना संगणकावर आणि मोबाईलवर मिळू लागली आहे. अशा परिस्थितीत वाचण्याची गरज आहे का? असाही प्रश्न काही लोकांना पडलेला असू शकेल. पण वाचन म्हणजे समोर दिसणारी गोष्ट मेंदूत कोंबणं नव्हे. ती मनात रिचवणं आणि त्यातून नवा विचार घडवणं. वाचनामुळे विचार आणि कृतीतलं अंतर कमी होण्याची शक्यता निर्माण होते, हा त्याचा मोठाच फायदा आहे. ज्या समाजामध्ये ग्रंथांना प्रतिष्ठा नाही, त्याचं अधःपतन वेगाने होतं. महाराष्ट्रात सार्वजनिक जीवनात जर सुमारीकरण वाढल्याचं आपल्याला जाणवत असेल, तर त्याचं एक कारण ग्रंथ संस्कृतीच्या ऱहासातही असू शकेल. ही पोकळी भरून काढणं, ही ग्रंथालय सेनेची नैतिक आणि भाषिक जबाबदारी आहे असं मी मानतो.

स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांच्यातला महत्त्वाचा फरक असा की, राजकीय पक्षांची लोकांना आकर्षूण घेण्याची चुंबकशक्ती अफाट आहे. मात्र बरेचदा राजकीय पक्षांच्या संलग्न शांखांमधल्या कार्यकर्त्यांना विधिमंडळातल्या किंवा मुख्य संघटनेतल्या सत्तेचं एवढं आकर्षण असतं की, ते संघटनेच्या इतर अंगांकडे तेवढय़ा गांभीर्याने पाहात नाहीत. गंर्थालय सेनेच्या बाबतीमध्ये तसं होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. यादृष्टीने एक कच्चा कृती आराखडा मांडत आहे.

 शाखा तिथे वाचनालय ही भूमिका घेऊन प्रत्येक शाखेत किमान 250 पुस्तकांचे वाचनालय उभे करावे. सर्व वयोगटातल्या लोकांना उपयोगी पडतील अशी पुस्तके त्यात असावीत.
 पाच शाखांचा समूह तयार करावा, जेणेकरून त्यांना एकमेकांच्या पुस्तकांचे आदानप्रदान करता येईल.
 वाचकांचा अभिप्राय महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन, त्यानुसार ग्रंथसंग्रहात वाढ करावी.
 कथा, कविता, कादंबरी, नाटक, समीक्षा, चरित्र – आत्मचरित्र, वैचारिक – संशोधनात्मक लेखन अशा सर्व बाजाचं लेखन वाचकांना उपलब्ध करून द्यावं. या सोबतच मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रं आणि नियतकालिकंही उपलब्ध करून द्यावीत.
 जिथे शाखांमध्ये पुरेशी जागा असेल, तिथे ग्रंथालयाला जोडून अभ्यासिकेची सोय करावी.
 देशातल्या इतर राज्यांमध्ये राजकीय पक्षांनी याप्रकारचे उपक्रम सुरू केले असतील, तर त्याचा अभ्यास करण्यासाठी सक्रिय कार्यकर्त्यांच्या अभ्यास दौऱयांचे आयोजन करावे.
 येत्या भाषा दिनाला राज्यव्यापी कार्यक्रमात ही वाचन चळवळ सुरू करावी.

‘वाचेल तो वाचेल’ हे वाक्य आपण अगदी सहजपणे बोलतो. पण हे सहजसोपे वाक्य नाही. तर हे एखाद्या समाजाचा बौद्धिक निर्देशांक दाखवणारं वाक्य आहे. महाराष्ट्रामध्ये एकांडय़ा शिलेदारांनी ग्रंथ संस्कृतीच्या वाढीसाठी प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण महाराष्ट्राला महात्मा गांधी यांच्यासारख्यांनी कार्यकर्त्यांचं मोहोळ असंही म्हटलेलं आहे. आज शिवसेना ग्रंथालय सेनेच्या निमित्ताने हे मोहोळ पुन्हा एकदा जागवण्याची संधी आपल्या सगळ्यांपुढे चालून आली आहे.

(लेखक मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत.)