लेख – कोरोना : स्वयंप्रतिकारक्षमता वाढवणे हाच उपाय

>> डॉ. घनश्याम मर्दा, [email protected]

आपल्या राज्यातील मोठी शहरे ही कोरोना हॉटस्पॉट म्हणून वर्गीकृत असल्याने व आपणांस हळूहळू बाहेर पडावे लागत असल्यामुळे काही विशेष गोष्टी आपण केल्या पाहिजेत. जरी कोरोनावर आत्ता निश्चित उपचार उपलब्ध नसला तरी स्वयंप्रतिकारक्षमता वाढवणे हाच सर्वोत्कृष्ट उपाय आहे. अशा पद्धतीने आहारविहार व जीवनशैली सांभाळून, आनंदी राहून स्वयंप्रतिकारक्षमता वाढवून कोरोनावर मात करण्याच्या दिशेने पाऊल टाकावे.

जगभरात कोरोना रागाने थैमान घातले आहे. कोरोनावर निश्चित असे औषध अजून सापडलेले नाही तसेच लस निर्मितीसंदर्भात अजूनही संशोधन चालू आहे. कोरोना आजारामध्ये शरीरातील, विशेषतः श्वसनमार्गातील अंतःत्वचा आणि पेशींना सूज येते व मार्गात अडथळा निर्माण होतो व श्वासोच्छ्वासास त्रास होतो, चव किंवा वास ना येणे, कोरडा खोकला येणे किंवा घसा खवखवणे, ताप येणे, अंगदुखी, पोट बिघडणे आदी लक्षणे दिसतात, पण जगभरात आणि आपल्या देशात 80 टक्के रुग्णांना लक्षणे दिसत नाहीत, पण ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, श्वासोच्छ्वासास त्रास होतो व रुग्ण गंभीर होतात. मग इन्टेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ऍडमिट होतात. या आजाराचे संक्रमण माणसातून माणसाला होत असल्यामुळे हा रोग पसरत आहे आणि त्यामुळे एक भीतीचे वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि विविध देशांच्या संशोधकांच्या निष्कर्षातून कोरोना अजून काही काळ राहणार आहे. त्यामुळे जगभरातील व हिंदुस्थानातील लोकांनाही आता आपल्याला कोरोनासोबत जगायचे आहे आणि त्यावर मात करायची आहे याची जाणीव होत आहे. त्यामुळे काळजी न करता योग्य काळजी घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे आणि यामध्ये आयुर्वेदाचा मोठा हातभार लागणार आहे. यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही अंतःत्वचेची सूज आपल्या पेशींच्या रोगाचा प्रतिकार करण्याच्या अति कार्यक्षमतेमुळे येते. म्हणजेच कोरोनाबाधितांमध्ये फक्त रोगप्रतिकारशक्ती वाढविणे उपयोगी नाही, तर रोगप्रतिकारशक्तीचे नियंत्रणही आवश्यक आहे. इतर सर्वसामान्य लोकांमध्ये योग्य व नियंत्रित पद्धतीने रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे.

आयुर्वेदामध्ये अशा पद्धतीने बाह्य घटकांपासून म्हणजेच जिवाणू किंवा विषाणूंपासून होणाऱया आजारांचे वर्णन सुश्रुताचार्य आणि चरकाचार्यांनी केले आहे. सुश्रुताचार्यांनी अशा संक्रमणाच्या मनुष्याला ताप येणे, श्वासास त्रास होणे, क्षय आदी रोग होतात असे सांगितले आहे, तर चरकाचार्यांनी एकाच वेळी अनेक लोकांना असा आजार होण्याची कारणे वर्णन केली आहेत. याचबरोबर सर्दीयुक्त ताप, घास खवखवणे, वास किंवा चव नसणे, श्वासास त्रास होणे आदी लक्षणांनी युक्त श्वास, कास आणि दुष्टप्रतिश्याय हेही आजार बाह्य कारणांनी होतात असे ग्रंथात वर्णन केले आहे.

आयुर्वेदाने रोगप्रतिकारशक्तीचे वर्णन ‘व्याधीक्षमत्व’ अशा शब्दांत केले आहे. व्याधीक्षमत्वाचे दोन प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत- 1. व्याधीबलविरोधी 2.व्याधीउत्पादप्रतिबंधक

1. व्याधीबलविरोधी – व्याधी किंवा रोगाच्या शक्तीच्या विरोधात काम करणे. यामध्ये शरीर रोगाची जी शक्तिस्थळे आहेत, त्याच्या विरोधी भूमिका घेते आणि विरोध करते. जसे विविध संक्रमित आजारांमध्ये शरीर विविध पातळ्यांवर रोगाचे कारण आणि त्याचा प्रसार रोखणे यासाठी कार्य करते. यामध्ये शरीरातील विविध घटक, आवरणे, पेशी आणि मध्यस्थ रसायने सहभागी होतात. हे सर्व घटक विविध पातळ्यांवर रोगाला अटकाव करण्याचा प्रयत्न करतात, अडथळे निर्माण करतात व या प्रक्रियेत सूज व स्राव निर्माण होतात.

2.व्याधीउत्पादप्रतिबंधक – हा थोडासा वेगळा विचार आहे. यामध्ये व्याधी निर्माण होऊ नये म्हणून शरीराची संरक्षण व्यवस्था वाढविणे आणि रोगाच्या संक्रमित करणाऱया कारणाला शरीराचे व्यासपीठ मिळू न देणे हे काम केले जाते. याबरोबरच शरीराची विशिष्ट व्याधीविरोधी क्षमता निर्माण करणे, की जेणेकरून तीच व्याधी पुन्हा उत्पन्न होऊ नये हेही केले जाते. यामध्ये शरीराची व्यवस्थित देखभाल करून शरीराला सक्षम आणि स्वयंव्याधीप्रतिकारक्षम बनविणे हे केले जाते. आयुर्वेदाने ‘व्याधीक्षमत्व’ टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी विविध उपाय सांगितले आहेत. त्यातील रोज करण्यासारख्या गोष्टी या ‘दिनचर्या’ म्हणून वर्णन केल्या आहेत, तर ऋतूनुसार बदल हे ऋतुचर्येमध्ये वर्णन केले आहेत. यामध्ये व्यक्तिगत स्वच्छतेचे नियम सांगितले आहेत, ते आज आपण कोरोनामध्ये रोज फोनच्या रिंगटोनमध्ये ऐकतो आहोतच. याचबरोबर आहारविहार, जीवनशैलीविषयक सल्ला आणि आरोग्यकारक उपाय आणि रोगप्रतिकारक्षमता नियंत्रित पद्धतीने वाढवणारी व रसायन औषधे यांचेही वर्णन केले आहे.

ऋतुबदलानुसार काही बदल करावेत. उदा. आताच आपण पावसाळ्यामध्ये /वर्षा ऋतूत प्रवेश करत आहोत. हा ऋतू आयुर्वेदाच्या मते वातदोष वाढवणारा असून या ऋतूत सर्दी/ पडसे, खोकला, ताप, जुलाब, दमा आदी विकार बळावतात आणि संक्रमण पण होते. म्हणून यामध्ये तुपातेलाचा बाह्य व खाण्यामधील वापर वाढविणे, गरम पाणी पिणे, अंघोळ गरम पाण्याने करणे आवश्यक आहे. लंघन, पण पोषक किंवा हलका आहार घेणे, पोषक गरम द्रव पदार्थाचे सेवन करणे, हलका व्यायाम करणे आदी बदल करणे आवश्यक आहे. आहारामध्येही गोड, खारट पदार्थांचे सेवन थोडेसे वाढवावे. नाकपुडय़ांमध्ये तेल/तूप हे दिवस व सूर्य असताना लावावे. रात्री लावू नये.

कोरोनाकालीन विशेष काळजी
आपल्या राज्यातील मोठी शहरे ही कोरोना हॉटस्पॉट म्हणून वर्गीकृत असल्याने व आपणांस हळूहळू बाहेर पडावे लागत असल्यामुळे काही विशेष गोष्टी आपण केल्या पाहिजेत.
कोरोना रोगाचा सविस्तर अभ्यास करून व जगातील 20 पेक्षा जास्त देशांतील (युरोप,अमेरिका आणि चीन) माझ्या वैद्यकीय सहकाऱयांबरोबर चर्चा करून मी आयुर्वेदातील काही वनस्पती आणि मसाल्याचे पदार्थ यांचा कोरोनाबाधित किंवा कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांना उपयोगी ठरेल असा फॉर्म्युला बनवला आहे. याचा संशोधन प्रकल्पही आयुष मंत्रालयाला सादर केला आहे. दुर्दैवाने अद्याप आम्हाला लक्षणांनी युक्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अधिकृतरीत्या चिकित्सा देण्याची परवानगी नसल्याने मुंबई आणि पुण्यामध्ये जे लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले आहेत किंवा बाधित आहेत त्यांना या आहारविहार, मसाल्याचे पदार्थ व वनस्पती मिश्रण घेण्याचा सल्ला फोनवरून किंवा ऑनलाइन दिला व त्याचा त्यांना उपयोग होत आहे असे काहींनी कळवले आहे. चीनमध्येसुद्धा माझी मुलाखत तेथील योग जर्नलमध्ये याविषयी फेब्रुवारी- मार्चच्या अंकात प्रसिद्ध झाली, ज्याचा उपयोग तेथील लोकांना झाला. हे औषध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱया घटकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती नियंत्रित पद्धतीने वाढविणे (इम्युनो-मोडुलेटरी), विषाणू प्रतिरोध करणे (अँटिव्हायरल), सूज (इन्फ्लेमेशन) कमी करणे यांसारखे विविध गुणधर्म आहेत आणि फुप्फुसे, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी संरक्षण म्हणून कार्य करतात. या सर्वांचा वापर केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल आणि रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोगाची तीव्रता कमी होईल.

हे औषध हिंदुस्थान सरकारच्या आयुष मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलेल्या आयुष क्वाथ घटकांवर आधारित आहे. काढा किंवा पावडर किंवा गोळ्या स्वरूपात घ्यावे. याच्या गोळ्या या ‘तुलसी इम्युन’ नावाने उपलब्ध होत आहेत.

जरी कोरोनावर आत्ता निश्चित उपचार उपलब्ध नसला तरी स्वयंप्रतिकारक्षमता वाढवणे हाच सर्वोत्कृष्ट उपाय आहे. अशा पद्धतीने आहारविहार व जीवनशैली सांभाळून, आनंदी राहून स्वयंप्रतिकारक्षमता वाढवून कोरोनावर मात करण्याच्या दिशेने पाऊल टाकावे.

आपली प्रतिक्रिया द्या