
>> डॉ. ऋतू सारस्वत
तामीळनाडूत काही आठवड्यांपूर्वी ‘नीट’ परीक्षेच्या निकालाअगोदर एका परीक्षार्थीने घरातच आत्महत्या केल्याची घटना घडली. ‘नीट’ची दोनदा परीक्षा देऊनही तो अपयशी ठरला. तिसऱ्या प्रयत्नांतही अपयशी होऊ या धास्तीने आणि पालकाचे स्वप्न पूर्ण करू शकत नसल्याचे गृहित धरून त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला. अलीकडच्या काळात किशोरवयीन आणि तरुण मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. पालकांशी विसंवाद, अपेक्षांचे ओझे, वाढता भौतिकवाद, जीवघेणी स्पर्धा या कारणामुळे तरुणांत निराशावाद पसरत आहे. या गोष्टी थांबवण्यासाठी पाल्य-पालक यांच्यात संवाद वाढवणे नितांत गरज आहे. दुर्दैवाने त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.
आजघडीला हिंदुस्थानात दररोज 31 किशोरवयीन मुले आपले कोवळे आयुष्य संपवत आहेत. ‘एनसीआरबी’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. मागच्या वर्षी 2020 मध्ये देशभरात विविध कारणांनी 11396 अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्यांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या (2019) तुलनेत 18 टक्के अधिक आहे. विशेष म्हणजे आत्महत्येच्या प्रमुख कारणांपैकी प्रेमभंग हे एक कारण सांगितले जात आहे. दुसरीकडे मानसिक दडपणांमुळेही मुले जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे. या विविध कारणांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्याची भावना विकसित होत आहे. अर्थात मुलांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस कशामुळे कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे. एवढे घडूनही सर्वजण मूग गिळून बसले आहेत आणि हे वास्तव चक्रावून टाकणारे आहे. अर्थात तारुण्यवय हे कोणासाठीच सोपे राहिलेले नाही. पण गेल्या काही वर्षांपासून बदलत्या जीवनशैलीमुळे आणि विचारसरणीमुळे युवकांची किशोरावस्था ही खूपच कठीण होत चालली आहे. कमी वयातच प्रचंड यश मिळवण्याची इच्छा, जीवघेणी स्पर्धा, सहनशीलतेचा अभाव, वाढता मानसिक दबाव आदी कारणांमुळे किशोरवयीन मुले नैराश्याच्या गर्तेत सापडत आहेत. शेवटी ते आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत.
आत्महत्या ही एक खासगी बाब नाही, हे अगोदर लक्षात घेतले पाहिजे. समाजशास्त्रज्ञ दुर्मिख यांनी यावर संशोधन करून काही तथ्ये समाजासमोर आणली आहेत. समाजात अशी काही परिस्थिती निर्माण होते की, एखादी व्यक्ती आपले आयुष्य संपवण्यासाठी प्रवृत्त होते. जेव्हा समाजात भावनांचा अतिरेक होतो, तेव्हा संबंधित व्यक्ती आत्महत्येचा मार्ग निवडते. अतिप्रेमामुळे जेव्हा स्वतःचे अस्तित्व कमी होऊ लागते किंवा अति दबावामुळे आपल्या स्वप्नाला कोणताही थारा मिळत नसल्याचे जाणवू लागते, तेव्हा या दोन्ही परिस्थिती आत्महत्येला कारणीभूत ठरू शकतात. समाजशास्त्रज्ञ दुर्खिम यांनी केलेले संशोधन हे आजच्या काळाला तंतोतंत लागू पडते. किशोरवयातील मुले प्रेमासारख्या गंभीर नात्यात का अडकत आहेत, असाही प्रश्न निर्माण होतो.
गेल्या काही दशकांत समाजाच्या रचनेत व्यापक बदल झाले आहेत. महानगरांतील पालकवर्गात आपल्याच विश्वात मश्गुल राहण्याची प्रवृत्ती वाढली आहे. विशेषतः चांगले जीवन जगण्याच्या ओढीने आई-वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे मुलांचे एकाकीपण वाढत चालले आहे. प्रेम ही एक स्वाभाविक वृत्ती असून किशोरावस्थेतून जाणारा मुलगा जेव्हा प्रेम आणि ममत्त्वाला पारखा होतो तेव्हा तो प्रेम आणि सहवास घराबाहेर शोधतो. विशेषतः आपल्या मित्रांच्या गटात. किशोरवयात मुलींबद्दलचे आकर्षण वाढणे ही सामान्य बाब आहे. पण काहीजण याच आकर्षणाला प्रेम समजू लागतात. पालकांकडून न मिळणारे प्रेम तो मैत्रिणीत शोधतो आणि इथेच सर्व गडबड होते. अशा स्थितीत पालकांकडून जेव्हा विरोध होते तेव्हा पाल्य बंडाच्या मूडमध्ये असतो, तर काही वेळा आत्महत्येसारखा भयंकर मार्गही निवडतो. यात दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की, लहान मुले एवढ्या तणावाखाली का वावरत आहेत. पालकांचा कमी असणारा संवाद हे मुलांवरील वाढत्या मानसिक ताणाचे प्रमुख कारण आहे. त्याच वेळी मुलांच्या भवितव्याबद्दल गरजेपेक्षा अधिक संवेदनशील राहणे देखील मुलांना नैराश्येत लोटणारे आहे.
निराशा, चिंता यासारख्या संवेदनशील गोष्टीवर सतत विचारमंथन करणाऱया जगाला नैराश्य हे अचानक आणि एकाएकी येत नाही, हे ठाऊक नाही का? असा प्रश्न पडतो. त्याची सुरुवातच लहानपणापासून झालेली असते आणि ती वयोपरत्वे वाढत जाते. कालांतराने मुले आत्महत्येसारखा निर्णय घेण्यास प्रवृत्त होतात. नोकरदार पालक हे मुलांना पुरेशा प्रमाणात वेळ देऊ शकत नाहीत. विविध माध्यमांतून मुलांवर प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवण्याची वृत्ती बळावली आहे. या वृत्तीला समाजशास्त्रज्ञ ‘हेलिकॉप्टर पॅरेंटिंग’ अशी उपमा देतात. ही स्थिती मुलांना नैराश्येकडे नेणारी ठरते. जे नाते भावनेवर, विश्वासावर आधारलेले आहे तेथेच यांत्रिकीपणा येऊ लागल्याने मुलांचा आत्मविश्वास ढासळत चालला आहे. सतत अभ्यासाचा ताण हा मुलांत चिंता आणि तणावाची गंभीर स्थिती निर्माण करत आहे. प्रत्येक मुलगा पालकांची इच्छा पूर्ण करतोच असे नाही. त्यामुळे पालकांची राहिलेली इच्छा पूर्ण करण्याचा ताण मुलांच्या मानसिक आणि भावनिक दबाव टाकतो. अपयशाच्या भीतीने पालकांचे स्वप्न मोडण्याची भीती ही पाल्याला आपल्या आयुष्यापेक्षा मोठी वाटू लागते. त्यामुळे जीवन संपवणे हाच त्याला चांगला मार्ग वाटू लागतो.
अलीकडच्या काळात एकाकीपणाची पार्श्वभूमी वाढू लागल्याने मुलांतील नैराश्येची भावना ही मागील पिढीच्या तुलनेत अधिक संवेदनशील असल्याचे दिसून येते. स्वप्न पूर्ण होत नसल्याच्या या प्रक्रियेत जीवन संपवण्याशिवाय पर्याय नाही, असाच त्यांच्या मनात विचार येऊ लागतो. आत्महत्या वाढण्यामागे आणखी एक कारण म्हणजे वाढता भौतिकवाद. पाल्यांना सूख आणि सुविधांची सहजासहजी उपलब्धता करून देणेदेखील पालकांना अडचणीचे ठरत आहे. सर्वकाही आलबेल असल्याने एखाद्या त्रासाचा किंवा अपयशाचा सामना ते सहजासहजी करू शकत नाहीत. एकूणातच स्वप्न आणि वास्तव याचा मध्यममार्ग म्हणजे धैर्य आणि सकारात्मक विचार होय. त्यातही भावनिकदृष्टय़ा खंबीर असणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्याला भावी पिढीला एखाद्या दुर्घटनेपासून वाचवायचे असेल तर भावनिकदृष्टय़ा सक्षम राहण्याबरोबरच पाल्यांशी संवाद ठेवणे गरजेचे आहे. मुलांत निर्माण केलेला आत्मविश्वास आणि प्रेम हे त्यांना भरकटण्यापासून थांबवते. हा भरकटलेपणा आणि एकाकीपणा रोखणे हाच आत्महत्या थांबवण्याचा एकमेव उपाय आहे.
(लेखिका समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)




























































