
>> डॉ. संजय बोरुडे
चमत्कार आणि गूढतेचे वलय असलेली ही शरद पौर्णिमा उत्सवप्रिय लोकांच्या भावविश्वात अढळ स्थान प्राप्त करून बसली आहे.
दिनदर्शिकेनुसार आश्विन सातवा तर कार्तिक महिना हा आठवा महिना मानला जातो. आश्विन पौर्णिमा अर्थात ‘कोजागिरी पौर्णिमा’ झाल्यावर सुरू होतो. कोजागिरी म्हणजे ‘को जागृति’ अर्थात ‘कोण जागे आहे?’ यामागची एक दंतकथा अशी आहे की, पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी आकाशात चंद्रविहार करते आणि कोण जागे आहे ते पाहते. तिने आपल्या घरी सतत वास्तव्य करावे म्हणून अंगणात गवऱया (शेण्या) पेटवून त्यावर दूध तापवले जाते. मग दूध पिताना चंद्राचे प्रतिबिंब दुधात पाहिले जाते आणि लक्ष्मीची आराधना केली जाते.
तसेच या महिन्यात कार्तिक स्नानाला व काकड आरतीला विशेष महत्त्व असते. मंदिरांमध्ये महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कार्तिक महिना उत्तम मानला जातो.
या पौर्णिमेला माणिकेथारी संबोधले जाते. कोजागिरीच्या दिवशी घराघरांत नवीन धान्य आलेले असते. पावसाळ्यानंतरची ही पहिली पौर्णिमा असते. या दिवसांत आकाश निरभ्र असते. घरात पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोडेही केले जातात. अशी प्रथा ‘कालविवेक’ या ग्रंथात नोंदवलेली आहे. नवीन धान्य व भाज्या यांची रेलचेल असते. ही सर्वसंपन्नता म्हणजे शेतकऱयांची लक्ष्मी असते. पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात. मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूवर नवी जुडी बांधतात. आंब्याच्या पानात भात, नाचणी आणि लोंबी तसेच कुर्डूची फुलं, झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी असते.
कोजागिरी पौर्णिमा ही ‘माडी पौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते व ती आश्विन महिन्यात येते. या दिवशी पाळावयाच्या व्रताला कोजागिरी व्रत असे म्हणतात.
कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध केले जाते. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ता, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्रसाद म्हणून प्यायले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची ‘अश्विनी’ साजरी करतात.
कृषिजन संस्कृतीमध्ये हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागातही ही प्रथा आपल्याला आजही दिसून येते. निसर्गाबद्दल वाटणाऱया कृतज्ञतेपोटी कोकणात पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुर्डूची फुले, नाचणी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यास मोठी गर्दी होते. कोजागिरी पौर्णिमेचे आरोग्यदृष्टय़ा महत्त्व आहे. दमा किंवा अस्थमा यांसारख्या आजारांवरील औषधे दुधामध्ये मिसळून कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते. चंद्राची किरणे त्या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते. आश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा ‘शरद पौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते. तिला ‘काwमुदी पौर्णिमा’ असेही म्हणतात. काwमुदी म्हणजे चांदणे. शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असताना एकीकडे उन्हाळा संपत असतो, तर दुसरीकडे हिवाळा सुरू होत असतो. दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते. दूध दिल्यामुळे पित्तप्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. कोजागिरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं की, मनःशांती, मनःशक्ती, उत्तम आरोग्य लाभते. कोजागिरी पौर्णिमा हे व्रत बरेच लोक पाळत असतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करतात. या पूजेनंतर रात्री आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात.
या दिवशी द्यूत अर्थात जुगार खेळावा असेही सांगितले आहे. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इत्यादी सर्व ठिकाणी असंख्य दीप लावतात.
काही लोक तांब्याच्या किंवा मातीच्या कलशावर वस्त्र्ााने झाकलेली सोन्याची महालक्ष्मी मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोने, चांदी किंवा मातीचे तुपाने भरलेले 100 दिवे लावतात. देवीला नैवेद्य दाखवला जातो. तूप घातलेली खीर तयार करावी व बऱयाच पात्रांत भरून ती चंद्रकिरणांखाली ठेवावी. तीन तासांनंतर संपूर्ण खीर लक्ष्मीला अर्पित केली जाते.
सकाळी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून लक्ष्मीची सोन्याची मूर्ती स्थापित करतात अशीही काही ठिकाणी पद्धती व परंपरा आपल्याला दिसून येते.दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लागतेच, पण मृत्यूनंतरही परलोकात सद्गती मिळते असा एक धार्मिक समज आहे. गुजरातमध्ये कोजागिरी पौर्णिमा रास व गरबा खेळून शरद पुनम नावाने साजरी केली जाते, तर बंगाली लोक याला ‘लोख्खी पुजो’ म्हणतात.
पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म दिवस मानला जातो. या दिवशी ती समुद्रमंथनातून प्रकट झाली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या 16 कलांमध्ये असतो. त्याची किरणे विशेष अमृतमय गुणांनी युक्त असतात. द्वापारयुगात वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा केली होती. वृंदावन निधी वनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका असलेल्या भक्तांत अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त उत्सव साजरा करतात.
कोजागिरी पौर्णिमेविषयी अनेक पौराणिक कथा आहेत. या कथा कोणत्याही आशयाभोवती फिरत असल्या तरी चमत्कार आणि गूढतेचे वलय असलेली ही शरद पौर्णिमा उत्सवप्रिय लोकांच्या भावविश्वात अढळ स्थान प्राप्त करून बसली आहे, हे मात्र खरे!
(लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)
[email protected]




























































