
>> डॉ. युगंधरा रणदिवे
आम्हा बायकांना सगळय़ा विषयांत रुची असते. फक्त काही बाबतीत आम्ही बागुलबुवा करवून ठेवलेला असतो. जसं की, मोबाइल-लॅपटॉप यामधील अॅडव्हान्स फीचर, सफाईदार चारचाकी चालवणं आणि आर्थिक गुंतवणूक!
पाककला, चित्रं काढणं (रांगोळी), नृत्य (सर्वांच्या तालावर तर कायमच), गायन (अंगाईगीत, प्रेमगीत, भजन, स्तोत्रं, वा सिनेमातली गाणी गुणगुणणे), नटणे, फॅन्सी ड्रेस (घरातल्या गाऊनपासून ते भरजरी साडीपर्यंत) अशा कितीतरी कलांमध्ये आम्ही पारंगत असतो.
आपल्याकडे चिवट जिद्द तर जन्मतः असतेच! मग ज्ञान मिळवण्यासाठी व ते दुसऱयांना देण्यासाठी आपण मागे का राहायचे?
बाह्य सौंदर्य, पैसा टिकेल ना टिकेल, ज्ञान तर आपल्याबरोबर राहणारच! मग त्यासाठी आपली धडपड नको का? अर्धवट माहितीद्वारे बडबड करून हसं नाही करून घ्यायचं. अर्ध्या हळपुंडाने पिवळे का व्हायचे?
अगदी आपल्या लहान मुलाकडूनही खूप शिकता येतं. गुरू कोणत्याही रूपात भेटतो, नाही का… लीनता ठेवली की ज्ञानाचं ओझं होणार नाही, स्वाभिमान वाढेल, समाजातलं स्थान अधिक बळकट होईल.
सरस्वती देवीच्या लेकी शोभलो पाहिजे, नाही का?

























































