मॉन सांता आणि सिडे लिस्बो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

युरोपात पोर्तुगालपासून ग्रीसपर्यंत त्यांच्या शहरात काही साम्यस्थळं असतात.

– स्वच्छता! स्वित्झर्लंड, ऑस्ट्रियाची शहरं किंवा गावं लॉण्ड्रीतून आलेल्या कपडय़ांसारखी स्वच्छ असतात. इतर युरोपातली शहरे घरी धुतलेल्या कपडय़ासारखी स्वच्छ, पण मळलेली नाही दिसणार. त्यांनी बिहार, यूपी पाहिलं तर सांस्कृतिक धक्क्याने ते हृदयविकाराचा झटका येऊन कोसळू शकतात.
– कुठलेही सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ असते. त्यासाठी अलीकडे इतके पैसे लागतात की, त्या पैशात दारिद्रय़रेषेखालची हिंदुस्थानातली माणसं पोटभर जेवू शकतील.
– ट्रफिक शिस्तबद्ध असते.
– ट्राम, रेल्वे, मेट्रो, बस वगैरे सर्व्हिसेस दिवसासाठी, आठवडय़ासाठी मिळणारी कार्डस् यामुळे परक्या माणसालाही एकटं फिरता येतं. शहराला डोंगरमाथे असतील, तर तिथे जायला फनिक्युलर्स किंवा ट्रॉलीज असतात.
– प्रासादासारखा वाटणाऱया उत्तम नक्षीकाम, पुतळे, आर्चेस् असणाऱया मध्ययुगीन इमारती असतात. वेळीच केलेल्या डागडुजीमुळे या इमारतींनी आपले तारुण्य टिकवलेले असते.
– प्रत्येक शहरात अनेक बागा असतात. आणि शहरांच्या मध्यभागी असतातच असतात.

ब्रिटिशांनी तो वारसा आपल्याला दिला. मुंबई, कोलकातामधली जुनी मैदानं पाहिली की ते जाणवतं. पण तो परकीय वारसा असल्यामुळे राष्ट्राभिमानाच्या आपल्या व्याख्येत तो बसत नाही. त्यामुळे तो चालवला नाही. उलट राखीव हिरवे पट्टे जहागिरीसारखे बिल्डर्सना दिले गेले.

लिस्बनमध्ये हे वर उल्लेखलेले सर्व आहेच, पण शहरातल्या मध्यम भागातले गार्डन म्हणजे नॅशनल पार्क वाटावं इतकं मोठं आहे. दहा चौरस किलोमीटर्सचं आहे. त्याला मॉन सांता फोरेस्ट म्हणतात. गंमत पहा. 1868 साली वेगवेगळी झाडं आणून हे जंगल उभारलं गेलं. तिथे नैसर्गिक जंगल नव्हतं. 1930 च्या सुमारास लिस्बन शहराचा विकास व्हायला लागला. घरबांधणी रस्ते उभारणे, ही कामे वाढली. झाडं तोडली गेली. (जे आपल्याकडे सातत्याने होतंय). पण तिथली महानगरपालिका जागरूक होती. ते इतिहासात डोकावले. 1868 साली काय केलं होतं ते अभ्यासलं आणि 1934 साली झाडं लावण्याचं, जंगल उभारण्याचं काम हातात घेतलं. आर्किटेक्ट किल डो अमारालने आखणी केली. शेतकरी आणि तुरुंगातल्या कैद्यांना घेऊन त्यांनी जंगल उभारलं. त्यात आराम करायच्या, पिकनिक करायच्या जागांची आखणी केली, पण त्यात खेळांना प्रोत्साहन मिळेल अशा सुविधा अंतर्भूत केल्या. 5.44 किलोमीटर्सचा फॉर्म्युला वन गाडय़ांच्या शर्यतीचा ट्रकही तयार केला. 1959 साली तिथे पोर्तुगाल ग्रॅण्ड प्री झाली. मुख्य म्हणजे त्या जंगलाला आजही कुणी हात लावत नाही. आपल्या देशात हे कधी होईल? बहुधा ते पाहण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल.

युरोपात प्रत्येक शहरात टॉवर असतात. ही जुनी परंपरा आहे. लिस्बनमधला टॅगस नदीच्या काठावरचा बेलेम टॉवर खूप प्रसिद्ध आहे. मला काही तो फार आकर्षक वाटला नाही, पण त्याची दोन वैशिष्टय़े आहेत. टॅगस नदीच्या उजव्या काठाजवळच्या बेटावर होता, पण नंतर नदीत भर टाकून तो काठाला चिकटविण्यात आला आणि त्याच्या बांधणीवर मूर शैलीचा प्रभाव आहे. मूर शैली समजण्यासाठी पोर्तुगालचा थोडासा इतिहास समजून घ्यायला हवा. पोर्तुगालवर काही शतकं मुस्लिम राजवट होती. हे मुस्लिम राज्यकर्ते उत्तर आफ्रिकेतल्या मोरोक्कोवरून आले होते. 1139 साली ख्रिश्चन धर्मीय सत्तांच्या मदतीने मुस्लिमांची सत्ता उलथवली गेली. त्या मुस्लिम आर्किटेक्टला मूर शैली म्हणतात आणि मुख्य म्हणजे ही मूर शैली तुम्हाला त्यानंतर पाचसहाशे वर्षांनी बांधलेल्या वस्तूतही दिसेल. पोर्तुगीजांच्या स्थापत्यशास्त्र्ाात ही नदी समुद्रात मिसळून जावी तशी मिसळली. हे मला महत्त्वाचं वाटतं. ‘ऐतिहासिक वैर’ हे संस्कृतीपासून दूर ठेवायचे असते. देशाची संस्कृती ही समुद्रासारखी असते. त्याला वेगवेगळय़ा कालखंडांतल्या वेगवेगळय़ा संस्कृती येऊन मिळतात. एकमेकांत त्या मिसळून जातात. हेच आपल्याकडे झालं. ते जपलं पाहिजे. मध्ययुगीन तत्त्वाच्या मागे जाऊन ते उद्ध्वस्त होता कामा नये.

अर्थात जगभर जे झालं ते पोर्तुगालमध्येही झालं. जो जेता असतो तो स्वतःच्या वास्तू उभारताना जुन्या वास्तू जमीनदोस्त करतो किंवा त्यावर आपली वास्तू उभारतो. मध्ययुगात या गोष्टी जगभर घडत होत्या. लिस्बनमध्ये सिडे लिस्बो (Sede Lisboa). हे सर्वात प्राचीन कॅथेड्रेल आहे. मूर (म्हणजे मुस्लिम) सत्ताधीशांकडून लिस्बन जिंकल्यावर मुख्य मशिदीच्या जागी हे कॅथेड्रेल बांधायला घेतलं आणि तेराव्या शतकाच्या पहिल्या दशकात त्यांचं बांधकाम पूर्ण झालं. ते गॉथिक शैलीत बांधलं. तुम्ही युरोपात फिरताना ‘गॉथिक शैली’ हा शब्द तुमच्या सातत्याने कानावर पडेल. ही शैली युरोपात अगदी मध्ययुगाच्या शेवटापर्यंत अस्तित्वात होती. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूचं वर्णन करताना गाईड वारंवार या शैलीबद्दल सांगतो. रोमन आर्किटेक्चरमधून ती विकसित झाली. रेनेसान्सच्या काळात तिची भरभराट झाली. तसं म्हटलं तर ही फ्रान्सची देणगी आहे. आणि युरोपने ती आपली मानली. त्यामुळे वास्तू उंच बांधता आल्या वजन कमी झालं आणि वास्तूचं आयुष्य वाढलं.

असो. तर सांगत काय होतो, 1755 च्या भूकंपात या चॅपेलमधल्या गॉथिक शैलीचं नुकसान झालं. मग आग लागली. आणि पुन्हा बांधले तेव्हा त्यात रोमन, मूर, गॉथिक (खूप सजावटीची शैली) शैलीचा समावेश केला. वारसा असा जपतात.

लिस्बन सोडतानाही वास्को द गामा तुम्ही टाळू शकत नाही. तो 476 फुटी आधुनिक टॉवरच्या रूपात दिसतो. टॅगस नदी ओलांडताना तो 17.2 किलोमीटर लांबीच्या पुलाच्या रूपात भेटतो. आपल्याकडे महात्मा गांधी जसे प्रत्येक शहरात भेटतात तसा येथे वास्को द गामा भेटतो. पण तुम्ही लिस्बनला गेलात तर पॉण्टे 25 डी अब्रिल हा अमेरिकेतल्या सॅन फ्रॅन्सिस्कोच्या गोल्डन गेटची आठवण करून देईल, पण माझ्या मनात अजून रेंगाळतायत त्या विविध भल्यामोठय़ा चौकांमधल्या चकाकणाऱया लाद्या किती सुंदर दिसतात! त्या अशा बसवल्या आहेत की आपण टाइल्सच्या लाटांवर आरूढ झालोयत असं वाटतं. तिथून स्पेनला जाताना ऑलिव्हच्या बागा, द्राक्षाचे मळे, गव्हाची शेतं दिसतात. मी त्यांच्याकडे कौतुकाने पाहिलं. कारण ऑलिव्हीज ऑलिव्ह ऑईल, द्राक्ष आणि द्राक्षासवची हौस तिथेच भागवता येते.

– [email protected]