रोहित आणि जावेद! वाचा कोण म्हणतंय असं आणि का?

2059

>> द्वारकानाथ संझगिरी

सध्या जगात दोन उद्दाम व्यक्तिमत्त्वं आहेत. एक अमेरिकेचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरा रोहित शर्मा. इतर नंतर येतात.

चुकलं. रोहित शर्मा उद्दाम नाही. त्याची बॅट उद्दाम आहे. पण त्या उद्दामपणाला नजाकत आहे हे परवा हॅमिल्टनच्या टी-20 मध्ये जाणवलंय आणि गेली काही वर्षे सातत्याने जाणवतंय. सुपर ओव्हरच्या शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकताना तो जेवढा उद्दाम वाटला तेवढाच सौंदर्यशालीसुद्धा! उद्दामपणा दाखवताना माणूस सुंदर कधी वाटू शकत नाही. तो प्रक्षोभक वाटू शकतो. मला दोन अपवाद सध्या दिसतात… ‘आईए मेहरबाँ’ म्हणत उद्दामपणे के. एन. सिंगला ‘हावडा ब्रिज’मध्ये खिजवणारी मधुबाला आणि जणू स्वतः स्क्रिप्ट लिहिली आहे असे वाटावं इतकं मॅचचं भवितव्य शेवटच्या दोन चेंडूंपर्यंत ताणून रोहित शर्माने ठोकलेले षटकार… सॉरी पुन्हा चुकलं – रोहित शर्मा चेंडू ठोकतो कुठे? त्याच्या टायमिंगने पांढऱया चेंडूला पंख फुटतात आणि त्याचा हंस पक्षी होऊन तो आकाशात उड्डाण करतो. शेवटच्या दोन चेंडूंवर दोन हंस पक्षी दोन दिशेने उडाले.

या सामन्यानंतर मला चटकन आठवला तो शारजामधला जावेद मियाँदादने चेतन शर्माला मारलेला शेवटच्या चेंडूवरचा षटकार. त्या वेळी मी तिथे स्टेडियमवर होतो. जावेद मियाँदाद हा महान खेळाडू खरा, पण त्याच्याकडे रोहित शर्माचा मखमली स्पर्श नव्हता. तो लोहाराच्या कुळातला, रोहित चित्रकाराच्या. पण त्या वेळी मॅच जिंकायला शेवटच्या चेंडूवर षटकार मारणे हे आठवे आश्चर्य होते. जावेदने तो अख्खा पाठलागच ‘‘चल अकेला चल अकेला, तेरा मेला पिछे छुटा राही चल अकेला’’ म्हणत एकटय़ाने केला होता.

तो फॉर्मात होता आणि एका लयीत पुढे गेला. पण तो षटकार हृदयात इतका आत घुसला की, त्याचे अवशेष तिथे आजही सापडतील. रोहितची परिस्थिती वेगळी होती. त्याने दोन अपयशी सामन्यांनंतर एक यशस्वी खेळी केली होती. (40 चेंडूंत 65 धावा). पण त्याच्याच म्हणण्याप्रमाणे त्याने बॅग भरली होती. सामना न्यूझीलंडच्या खिशात गेलाय हे मानले होते. तिथून उठून एक षटक खेळायचे आणि 17 धावा करायच्या हे सोपे नव्हते. बरे तो तसा आघाडीचा फलंदाज आहे. तो अशा दबावातून क्वचित गेलाय. तो शेवटपर्यंत नॉटआऊट राहिला तर त्याने मॅच आधीच संपवलेली असते. हिंदुस्थानी संघाचा विचार करायचा तर धोनी अशा निखाऱयावर अनेकदा चाललाय. पण रोहितच्या पायाला तशी सवय नव्हती. अशा षटकामागे प्लॅनिंग ही कवी कल्पना आहे. फक्त अनुभव तुम्हाला काय अपेक्षा ठेवायची हे सांगू शकतो. फलंदाजाला गोलंदाजाचे मन ओळखता आले पाहिजे. फलंदाज गोलंदाजाचे कसे मन ओळखतो याची दोन उदाहरणे देतो… 1982, वेस्ट इंडीजमधला कसोटी सामना. माल्कम मार्शलचा चेंडू सुनील गावसकरच्या डोक्याला लागून थर्डमॅनला गेला.

नॉनस्ट्रायकरला दिलीप वेंगसरकर होता. त्याने एण्ड बदलून सुनीलला विश्रांती द्यावी म्हणून एकेरी धावेचा प्रस्ताव मांडला. सुनीलने तो धुडकावला. विचार करा, माल्कम मार्शलचा वेग आणि हेल्मेट नसलेले सुनीलचे डोके! सुनीलने दीर्घ श्वास घेतला, स्वतःला सावरले. अशा वेळी सर्वसाधारण अपेक्षा असते आणखीन एका बंपरची. हादरलेल्या फलंदाजाला अधिक हादरवणे. पण सुनीलने मार्शलचे मन ओळखले. तो यॉर्करसाठी तयार होता. आला यॉर्करच! सुनीलने मार्शलच्या बाजूने चौकार ठोकला. दिलीप मला म्हणाला, मरेपर्यंत मार्शल हा चौकार विसरला नाही.

दुसरे उदाहरण – बांगलादेशमध्ये सचिन पाकिस्तानविरुद्ध खेळत होता. सकलेन मुश्ताकच्या पहिल्याच चेंडूवर पुढे येऊन त्याने षटकार ठोकला आणि मग लगेच पुढच्या चेंडूवर पुढे सरसावत षटकार ठोकला. मी सचिनला संध्याकाळी विचारले, ‘‘लागोपाठ दोन चेंडूंवर षटकार!’’ तो म्हणाला, ‘‘मी पहिल्याच चेंडूवर त्याला बाहेर येऊन मारेन ही त्याने अपेक्षा ठेवली नव्हती.’’ मी म्हटले, ‘‘बरोबर, पण लगेच पुढच्या चेंडूवरही तू पुढे सरसावलास?’’ तो म्हणाला, ‘‘पहिल्या चेंडूवर मी पुढे येऊन खेळलोय म्हटल्यावर पुन्हा मी दुसऱया चेंडूला क्रिझ सोडेन ही त्याने अपेक्षा ठेवली नसणार?’’ मोठे फलंदाज असा विचार करतात.

रोहित शर्मा हा आज पांढऱया चेंडूच्या क्रिकेटचा शहेनशहा आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, त्याने आजच्या पिढीचा विचार केला. ‘‘सुपरओव्हरमध्ये दबाव गोलंदाजावर असतो. आपण का घ्यावा?’’ तरीही पहिल्या काही चेंडूंत पटकथा ‘ट्रजिडी’कडे निघाली होती. रोहित नावाच्या चित्रकाराच्या हातात ‘रंगारी’चा ब्रश आल्याप्रमाणे त्याने काही फटके मारले, पण शेवटी रोहित इन्स्टिंक्टने खेळला. जे सर्वसाधारण परिस्थितीत केले असते ते त्याने केले. दबावाखाली साऊदीचा ‘यॉर्कर’ यॉर्कर ठरला नाही (पुन्हा चेतन शर्माचीच ऐतिहासिक चूक!). त्यामुळे तो चेंडू खवय्याच्या ताटात आलेला रसगुल्ला ठरला. पुढे साऊदीच गडबडला. पुन्हा यॉर्कर नको मग काय? तोपर्यंत रोहित शर्माने मन ओळखले होते. पटकथेचा शेवट सुखान्त ठरला. तो त्याच्या चित्रकाराच्या कुंचल्यानेच लिहिला.

पण रोहितने दोन उद्दाम षटकार मारल्यावर एक ‘उदात्त’ षटकार ठोकला. तो म्हणाला, ‘‘शेवटच्या चार चेंडूंत फक्त एक धाव देणाऱया शमीने ही मॅच खरी जिंकून दिली.’’

शेवटी हा फलंदाजांचा खेळ, मी तरी शमीच्या षटकाबद्दल कुठे लिहिलं?

ता. क.

पुन्हा सुपर ओव्हर. पुन्हा हिंदुस्थानने न्यूझीलंडच्या मोठय़ा आतडय़ातून मॅच काढली? हिंदुस्थानी क्रिकेटपटूंवर पोवाडे लिहायला न्यूझीलंड स्वतःच्या खिशातल पेन देतेय.

पुन्हा न्यूझीलंडला शेवटच्या षटकात सहा धावा करताना धाप लागली. चार बळी देऊन मॅच कशीबशी टाय केली? शार्दुल ठाकूर खरंच पोवाडय़ाचा विषय होऊ शकतो. हिंदुस्थानी संघाला आता सिकंदर म्हणणं हा सिकंदराचा बहुमान ठरेल. त्याबद्दल उद्या-परवा लिहीन.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या