पराभव जिव्हारी लागलाय!

1198

>> द्वारकानाथ संझगिरी

हिंदुस्थानी संघाला इतक्या लवकर माझी दृष्ट लागते? न्यूझीलंडमध्ये हिंदुस्थानी संघ टी-20 मध्ये 5-0 जिंकल्यावर आणि तत्पूर्वीच्या यशावर मी हिंदुस्थानी संघाने अश्वमेधाचा घोडा सोडल्याच्या वल्गना केल्या होत्या. माझे शब्द हवेत विरायच्या आत ‘दात घशात जाणं’ ही म्हण मी तीन वन डेत जगलो. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने अश्वमेधाच्या घोडय़ाचा लगाम पकडला आणि निकोल्स, ग्रॅण्डहोम वगैरे फलंदाजांनी घोडय़ावर मांड ठोकली.

क्रिकेट हा खेळ तुम्हाला कधीही मूर्ख ठरवू शकतो.

असं का घडलं?

कारणं सांगणं सोपं आहे. ‘दुसरी फळी’ जितकी तगडी आपल्याला वाटते तेवढी तगडी नाही. त्यांनी रिकाम्या जागा भरल्या, पण नगास नग या नात्याने, परफॉर्मन्सने नाही. रोहित शर्माच्या पायाने धावाची लक्ष्मी न्यूझीलंड सोडून गेली आणि अचानक विराट कोहलीच्या बॅटने लिफ्टचं चुकीचं बटणं दाबलं. त्यामुळे धावांची लिफ्ट चक्क बेसमेंटला आली. तीन वन डेत मिळून त्याने फक्त 75 धावा केल्या. गेल्या पाच वर्षांत त्याची इतकी हलाखीची परिस्थिती झाली नव्हती. दोनदा तर त्याला फार सुंदर सापळा लावून पकडला. ‘‘शुक पंजरी वा हरीण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैशी’’, असं विराटला वाटलं असेल. विराटची लिफ्ट पुन्हा खूप वर जाईल. तो दर्जा त्याच्याकडे आहे. पण एक नकोशी गोष्ट पुन्हा सिद्ध झाली. रोहित-विराटच्या मोठय़ा धावांशिवाय अश्वमेधाचा घोडा दौडत नाही. भीम-अर्जुन लागतातच, नकुल-सहदेवावर सर्व जबाबदारी सोडून चालत नाही. राहुल-श्रेयस अय्यरने त्यांचा रक्तगट, सॉरी धावगट पांडवांचा आहे हे सिद्ध केले. राहुलची फलंदाजी जास्त सनातनी आहे. श्रेयस जास्त प्रक्षोभक आहे. (विश्वचषकामध्ये श्रेयसला मधल्या फळीत खेळवलं असतं तर… कदाचित 1983 प्रमाणे मी इंग्लंडमधून बॅगेतून सुखद आठवणी आणल्या असत्या.) तरीही वन डेतील शेवटच्या दहा षटकांत मंदी जाणवली. अलीकडे त्या दहा षटकांत 90-100 धावा ही भरभराट मानली जाते. सत्तरच्या आसपास धावा हे मंदीचं लक्षण आहे.

पण या मालिकेत सर्वात धक्कादायक अपयश हे गोलंदाजांचं होतं… विशेषतः जसप्रीत बुमराहचं! गेल्या सहा वन डेत त्याला फक्त एक विकेट मिळालीय. तीसुद्धा ऑस्ट्रेलियाच्या दहाव्या क्रमांकाच्या झांपाची. एरवी दर 29 चेंडूंत विकेट काढणाऱया बुमराहला शेवटच्या चार वन डेत विकेट मिळालेली नाही. त्याचा इकॉनॉमी रेट या मालिकेत 5.56 होता. बुमराहला ही उधळण आहे. सुंदर किटलीतून नक्षीदार कपात ओतून चांदीच्या चमच्याने साखर ढवळून चहा पिणाऱया माणसावर गल्लीच्या कोपऱयावर चहाच्या टपरीतल्या ग्लासातला ‘कटिंग’ चहा प्यायची पाळी यावी तसं बुमराहच झालंय. पाठीच्या दुखण्याआधी काय थाट होता बुमराहचा! कुठल्याही फलंदाजाने त्याला फोडून काढल्याचे स्मरणात नव्हते. खेळपट्टी कशी आहे याची काळजीही त्याच्या चेंडूने कधी केली नाही. अगदी चेंडू उसळवण्यासाठीही नाही. त्याच्या त्या रॉबीन हूडच्या बाणाप्रमाणे लक्ष्यवेध करणाऱया यॉर्करसाठी तरी खेळपट्टीचा तर संबंध नव्हता. खेळपट्टीच्या वेगाप्रमाणे चेंडूच्या अचूक टप्प्याच्या जवळपास व्याख्या तो ठरवत होता. ग्लेन मॅग्रालाही मत्सर वाटावा अशी त्याची गोलंदाजी होती. त्याच्या दुखण्यानंतरचा बुमराह वेगळा वाटला. त्याची ऍक्शन अशी आहे की फिटनेसचं शुक्लकाष्ठ त्याच्यामागे अधूनमधून लागणारच. फलंदाजही आज ना उद्या त्याच्यावर हल्ला कसा करावा हे शोधून काढेल. पण लवकरात लवकर त्याला तो जुना फॉर्म मिळवावा लागेल. कारण बुमराह हा आपला नुसता बाण नाही, अस्त्र्ा आहे. सैनी आणि शार्दुल ठाकूर अजून बाणाच्या अवस्थेतच आहेत. सैनीकडे तुफान वेग आहे, पण बऱयाचदा दिशाहीन वेग फलंदाजाला धावा करायला मदत करतो. शार्दुल ठाकूरने गोलंदाजीत विविधता आणलीय, पण चेंडू वारंवार बेशिस्त होतो. त्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी धावा चक्क लुटल्या. पहिल्या सामन्यात जवळपास साडेतीनशे धावांचा त्यांनी पाठलाग केला आणि तिसऱया सामन्यात तीनशेचा पाठलाग त्यांनी लीलया केला. ज्या हिंदुस्थानी गोलंदाजांनी गेली काही वर्षे सातत्याने चांगला परफॉर्मन्स दिला होता तिने अचानक धावांचा लंगर घातला. त्यात क्षेत्ररक्षण तर असं होतं की, संघ 1980 सालात जाऊन खेळतोय असं वाटलं. ही सर्वात अक्षम्य गोष्ट होती.

या मालिकेतला पराभव हा जिव्हारी लागला तरी हा छोटा अपघातच ठरावा अशी इच्छा आहे. वेगात धावताना हिंदुस्थानी संघ पडलाय. पाय मुरगळलाय की फ्रॅक्चर आहे हे लवकरच कळेल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या