
>> एकनाथ आव्हाड
मुलांच्या समतोल शारीरिक वाढीसाठी जशी सकस, आरोग्यपूर्ण अन्नाची गरज असते तशीच त्याच्या भावनिक, मानसिक, बौद्धिक विकासासाठी उत्तम बालसाहित्याची गरज असते. म्हणूनच उत्तम बालसाहित्य मुलांच्या हाती वाचण्यासाठी देणं हे पालकांचं परमकर्तव्य आहे, पण उत्तम बालसाहित्य कुणाला म्हणावं हेच अनेक पालकांना ठाऊक नसते. ते जाणून घेण्यास आजच्या पालकांकडे सवड नसते आणि आवडही नसते.
अलीकडे प्रसार माध्यमांचा जनमानसावर जबरदस्त पगडा असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. या प्रसार माध्यमांच्या सहज उपलब्धतेमुळे लहान मुलेसुद्धा त्यांच्या प्रभावापासून सुटलेली नाहीत. या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व ऑनलाइन माध्यमांमुळे जग खूप जवळ आले असून त्यांतील स्पर्धा, गती, विविधता आणि नावीन्याने आजची मुलं दिवसेंदिवस उत्सुकता, कुतूहलापोटी या प्रसार माध्यमांच्या अधिकाधिक जवळ जात आहेत. या प्रसार माध्यमांच्या सहवासात ते तासन्तास रमताना दिसत आहेत. हे आभासी विश्व त्यांना हवंहवंसं वाटू लागतं. प्रसार माध्यमांच्या या वाढत्या प्रभावामुळे आणि अतिरेकी वापरामुळे मुलांच्या मनाचा ताबाही ही माध्यमं सहज घेतात. अशावेळी या माध्यमांच्या अतिवापरामुळे जसं मोठय़ांचं आयुष्य ढवळून निघाल्याची कितीतरी उदाहरणे आपल्या पाहण्यात, वाचनात येतात तसेच बाल जगतावरसुद्धा या प्रसार माध्यमांचे दूरगामी झालेले इष्ट-अनिष्ट परिणाम आपल्याला दिसून येतात. त्याची कितीतरी बोलकी उदाहरणं आपण आजूबाजूला पाहत असतो, वृत्तपत्रांतून वाचत असतो.
मुलांच्या समतोल शारीरिक वाढीसाठी जशी सकस, आरोग्यपूर्ण अन्नाची गरज असते तशीच त्याच्या भावनिक, मानसिक, बौद्धिक विकासासाठी उत्तम बालसाहित्याची गरज असते. म्हणूनच उत्तम बालसाहित्य मुलांच्या हाती वाचण्यासाठी देणं हे पालकांचं परमकर्तव्य आहे, पण उत्तम बालसाहित्य कुणाला म्हणावं हेच अनेक पालकांना ठाऊक नसते. ते जाणून घेण्यास आजच्या पालकांकडे सवड नसते आणि आवडही नसते. त्याबाबत कमालीची उदासीनता मात्र असते. गुळगुळीत कागद, रंगरंगोटी, चित्रांचा भडिमार केलेली पुस्तकं म्हणजे उत्तम बालसाहित्याची पुस्तकं असा काही पालकांचा गैरसमज झालेला आपण पाहतो, पण खरंच, कशाला म्हणावं उत्तम बालसाहित्य हे पालकांनी समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. जे बालसाहित्य मानवी व्यवहार व मानवेतर सृष्टीविषयी मुलांची जिज्ञासापूर्ती करते, कल्पनारम्य व चमत्कृतिजन्य वातावरणाने मुलांचे मनोरंजन करते तसेच मुलांमध्ये चांगल्या – वाईटाची जाण निर्माण करून त्यांचे व्यक्तिमत्त्व सुसंपन्न करण्यास सहाय्यभूत ठरते, ते साहित्य उत्तम बालसाहित्य आहे असे मला वाटते.
हल्ली मुलांचं लक्ष पुस्तकाने वेधून घेण्यासाठी नको ते फंडे प्रकाशकाकडून वापरले जातात. मुलांना हाताळायला कठीण जातील असे पुस्तकांचे मोठाले आकार, नेटवरचीच कवितेला चिकटवलेली रेडिमेड मोठमोठाली चित्रं, फोर कलरच्या नावाखाली पुस्तकात अक्षरशः ओतलेले विविध रंग आणि ज्यांचं रंगसंगतीशी काहीच देणंघेणं नाही अशा प्रकारे रंगांची वारेमाप उधळण करणारी व आतील आशयाला फारसं महत्त्व न देणारी पुस्तकं आपलं स्वत्व हरवून मुलांच्या भेटीला येताना दिसतात. अशी पुस्तकं मुलांची अभिरुची कशी वाढवतील? वाचनानंद कसा देतील? आजच्या बालसाहित्यात बालसाहित्याचे मुख्य प्रयोजन मनोरंजन, ज्ञानविस्तार आणि आनंदनिर्मिती हेच आहे याचा विसरच पडलेला दिसतो. या प्रयोजनालाच बगल देऊन उपदेशाचे डोस पाजताना आजचं बरंचसं साहित्य आपल्या समोर येतं. कथेला तात्पर्य द्या असं म्हणतं. खरं तर गोष्ट एक असली तरी तात्पर्य मुलागणिक बदलू शकतात हेच अनेकांना मान्य नसतं. प्रत्येक मूल स्वतंत्र विचारशक्ती घेऊन जन्माला आलेलं आहे हे विसरून कसे चालेल.
बालसाहित्याची महत्त्वाची चार वैशिष्टय़ेही बालसाहित्यकाराने जाणून घ्यायला हवीत. याचा विचार बालसाहित्य लिहिताना प्राधान्याने जेवढा व्हायला हवा तेवढा आजच्या घडीला होताना दिसत नाही. 1) कल्पनाशीलता- कल्पनारम्य वातावरण म्हणजे बालसाहित्याचा जणू प्राणच असे म्हटले जाते. 2) अतार्किकता – अवास्तव गोष्टींची जाणीवपूर्वक वास्तवाप्रमाणे केलेली मांडणी. बौद्धिक तर्कपरंपरा मोडणारी गोष्ट. 3)अननुमेयता- उत्कंठा वाढवण्यासाठी अनुमान न करता येणाऱया गोष्टींची निर्मिती. 4) बालमानससंबद्धता- मुलांच्या भावनांशी एकरूप होऊन, बालमनाची गुणधर्म लक्षात घेऊन लिहिण्याची क्षमता. या चार बालसाहित्याच्या महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ांचा अंगीकार करून बालसाहित्य लिहिताना बालमनाच्या गुणधर्मांचाही विचार होणं तितकंच गरजेचं आ. मुलांची काही मासिकं अनेक वर्षांपासून आजतागायत निष्ठsने सुरू आहेत. ‘किशोर’ हे पाठय़पुस्तक मंडळामार्फत निघणारे मासिक अनेक शाळांमध्ये हमखास पाहायला मिळते. या मासिकांचे वैशिष्टय़े म्हणजे उत्तम साहित्यिक मूल्य आणि किंमत अतिशय कमी, ती म्हणजे अवघी सात रुपये. आकाराने आणि गुणाने मोठे आणि किमतीने छोटे असे हे लहानथोरांचे आवडते प्रयोगशील किशोर मासिक. तसेच नागपूरहून निघणारे आजोबा, वडील आणि आता मुलगा जयंत मोडक अशी तिसरी पिढी चालवत असणारे जुनेजाणते बालमासिक म्हणजेच मुलांचे मासिक. कथा, कविता, लेख, विनोद असा भरगच्च खाऊ हा अंक मुलांना प्रत्येक महिन्यात देत असतो. कुमार मुलांसाठी असणारे ‘छात्र प्रबोधन’ हे मासिकही दर्जेदार, सकस साहित्याने नटलेले पाहायला मिळते. ‘वयम’ हे मुलांसाठी असणारे मासिकसुद्धा त्यातील अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांमुळे मुलांच्या मनाचा ठाव घेते. कथामाला, बालविकास मंदिर, छोटू, निर्मळ रानवारा ही मासिकंही मुलांचं मनोरंजन करण्यासाठी मनःपूर्वक धडपड करताना दिसून येतात.
सोपं लिहिणं ही खूप कठीण गोष्ट आहे याची ही जाणीव लेखकांनी कायम ठेवावी. मुलांना गृहीत न धरता त्यांच्यासाठी लिहीलं जावं. नवनवीन विषय मुलांसाठी लिहीले जावेत. बालसाहित्य या विषयाची व्याप्ती अधिकाधिक वाढावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जावेत तर आणि तरच मुलांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. यासाठी साहित्य, कला, प्रसार माध्यमं अशा साऱया माध्यमांनी एकत्र यायला हवं आणि समाजानेही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या कृतीला जोड द्यायला हवी. प्रसार माध्यम हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. या विश्वातून मुलांना सोबत घेऊन फेरफटका मारून आणला पाहिजे. असं असलं तरी पुस्तकांतून, अक्षर वाड्मयातून होणारा संस्कार हा चिरकाल टिकणारा असतो. असे प्रयत्न झाले तर प्रसारमाध्यमं बालजगतासाठी खऱया अर्थाने वरदान ठरतील.




























































