अवती भवती – बटाटावडा

>> गणेश आचवल

‘महापूजा ओलांडून पुढे जाऊ नये, नमस्कार करून आधी तीर्थप्रसाद घ्यावा’ असे पूर्वी मोठी माणसे सांगत असत, पण हाच नियम माझ्यासाठी बटाटावडा स्टॉलला कसा लागू झाला कधी लक्षातच आले नाही.

स्टॉलवर बटाटावडा तळताना सुटणाऱ्या खमंग दरवळीने बटाटावडा खाल्ल्याशिवाय मला कधीही पुढे जाऊ दिले नाही. मागे एकदा कार्यालयीन कामासाठी दिल्लीला गेलो होतो, तेव्हा एका टपरीवरून असाच बटाटावडय़ाचा घमघमाट नाकात घुसला आणि मी बेचैन झालो. अपरिचित ठिकाणी जोखीम नको म्हणून संध्याकाळी हॉटेलवर गेल्यावर मी आणि सहकाऱयाने रेस्टॉरंटमध्ये जाऊन बटाटावडय़ाची ऑर्डर दिली. ‘‘नो सर, बटाटावडा नहीं मिलेगा, स्नॅक्स में आपको इडली, डोसा, मेदूवडा, ढोकला, पावभाजी मिलेगा. क्या चाहिये?’’ बटाटावडा उपलब्ध नाही हे मनाने पचवायला खूप जड गेले. पंचतारांकित हॉटेलात बटाटावडा सोडून इतर स्नॅक्स मिळतात याचे मोठे नवल वाटते.

दिल्लीच्या त्या पंचतारांकित हॉटेलात टाय व सूट घातलेल्या वेटरने कदाचित बटाटावडा ऑर्डर करणारे म्हणजे ते मुंबईकरच हे ओळखून चक्क चहाची किटली आणि काचेचे ग्लास आणले आणि आमच्यासमोरच ओतून रुबाबात कटिंग दिला. प्रेझेंटेशन छान फाइव्हस्टार होते, पण मग आपल्या बटाटावडय़ानेच कुठे पेंड खाल्ली ते कळले नाही. याची आठवण आता अशासाठी आली की, ठाण्यातील एका नाटय़गृहात मराठमोळय़ा कार्यक्रमाला गेलो होतो. मध्यंतरात इडली, समोसे, पॅटीसपासून चहा, कोल्ड्रिंकपर्यंत सगळे होते, फक्त बटाटावडा नव्हता. खरेच सांगतो, धस्स झाले. गेल्या वर्षी शेगावला एका हॉटेलात जाण्याचा योग आला. तिथे मेनूकार्डमध्ये ‘आलूवडा’ पाहिल्यावर उत्सुकता ताणली गेली. हे आलूवडा प्रकरण काय आहे ते बघू म्हणून ऑर्डर केले तर चक्क बटाटावडा टेबलवर आला. दिल्लीतही आणि अगदी लखनौलाही बटाटय़ाला आलू जरी म्हणत असले तरी रोडसाइड टपरीवर बटाटावडा याच नावाने मिळणारा मराठमोळा बटाटावडा आपल्याच राज्यात आलूवडा नावाने का मिळतो, अशा संभ्रमात मी पडलो.