
>>गुरुनाथ तेंडुलकर
आईचा पदर ही जगातील सर्वाधिक सुरक्षित आणि उबदार जागा असते, पण आईची कूस किंवा तिच्या पदरापेक्षाही अधिक सुरक्षित जागा म्हणजे आईच्या पोटातला उबदार अंधार…
बहुसंख्य सामान्य माणसं इतरांनी आपल्याबाबतीत केलेल्या चुका आणि घडलेल्या अप्रिय घटना कायम स्मरणात ठेवतात. पुनः पुन्हा त्या घटना आठवतात आणि स्वतःशीच चडफडत राहतात. ज्याच्या संबंधी आपण आपला जीव जन्मभर जाळत राहतो, ती व्यक्ती मात्र तो प्रसंग कधीच विसरून गेलेली असते. त्यानंतर त्या माणसाची वागणूक कितीही चांगली झाली तरी आपण मात्र तो कोळसा उगाळत राहतो.
आपल्या मनातली जळमटं आपणच दूर करायला नको का? त्यासाठी अनेक सोपे-सोपे उपाय आहेत. क्षमाशीलता अंगी बाणवणं, आपल्या रागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणं, इतर चांगल्या घटना मनात आठवून साठवणं, एखादा छंद जोपासणं त्याकडे लक्ष पेंद्रित करणं, आपण आपल्या वागणुकीतून कुणाला दुखावत नाही ना याकडे सजग रहाणं… इतपासून ते अगदी मेडिटेशन ध्यानधारणेपर्यंत. कोणत्याही प्रकारच्या उपायांनी मन स्वच्छ निर्मळ करायला हवं. तरच आपण स्वतःचं आयुष्य योग्य तऱहेनं जगू शकतो. हाच विचार सांगणारी आजची कविता ‘घर.’
या कवितेचे कवी आहेत मोहन शिरसाट. शिरसाट सर अकोल्या जवळच्या वाशिम जिह्यातील राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयात माध्यमिक शिक्षक आहेत. त्यांनी ‘घर’ या कवितेत घराचं रूपक वापरून घर स्वच्छ करण्याच्या निमित्तानं मन स्वच्छ करण्याची शिकवण दिली आहे. मनात नकारात्मक विचार साठले की, त्याचं रूपांतर विकारात होतं. मनात विकार निर्माण झाले की, मन विकृत होतं. मन विकृत झालेली माणसं एकमेकांशी वागताना कधीही सरळपणे वागत नाहीत, ती सदैव विकृतीनेच वागतात. वाकडय़ातच शिरतात. स्वार्थानेच वागतात. आपल्या मनाजोगतं घडलं नाही की, त्यांना राग येतो. रागामुळे माणसामाणसांतील मनं दुखावतात, मनं दुखावली की संबंध दुरावतात. संबंध दुरावले की, त्याचा सामाजिक स्वस्थ्यावरदेखील विपरीत परिणाम होतो.
एक छोटासा किस्सा सांगतो. वयाची साठी उलटून गेलेलं एका जोडप्याचा मुंबईतल्या वांद्रय़ाच्या कौटुंबिक न्यायालयात म्हणजेच फॅमिली कोर्टात घटस्पह्टासाठी खटला सुरू होता. त्यांची दोन्ही मुलं लग्न होऊन त्यांना मुलंबाळं होऊन परदेशात सेटल झाली होती आणि आयुष्याच्या उत्तरार्धात हे दोघंजण सततच्या भांडणाला पंटाळून विभक्त होण्यासाठी न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या नियमानुसार न्यायमूर्तीनीं दोघांचं समुपदेशन करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही घटस्पह्ट घेण्याच्या निर्णयावर ठाम होते. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. अगदी त्यांचं लग्न ठरल्यापासूनच्या अनेक बारीकसारीक नकारात्मक घटनांचा तपशीलवार पाढा वाचून आपल्यावर कसा अन्याय झाला, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी न्यायाधिशांनी नाइलाजाने घटस्पह्ट मंजूर केला आणि म्हणाले,
‘तुम्हा दोघांच्या स्मरणशक्तीला मी सलाम करतो. इतकी तीव्र स्मरणशक्ती तुम्ही अभ्यासावेळी किंवा इतर कोणत्याही योग्य कारणासाठी वापरली असती तर तुम्हा दोघांचीही आयुष्य उजळून निघाली असती.’ समर्थ रामदासस्वामी मनाच्या श्लोकात सांगतात…
नको रे मना क्रोध हा खेदकारी
नको रे मना काम नानाविकारी
नको रे मना लोभ हा अंगिकारू
नको रे मना मत्सरू दंभभारू
वाईट गोष्टी लक्षात ठेवून आपल्या मनाचं दुर्गंधी गटार करायचं की, मोकळय़ा मनाने आयुष्याची सुगंधी फुलबाग फुलवायची हे सर्वस्वी आपल्याच हातात असतं. सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकरही एका कवितेत म्हणतात…
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा
काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं याचा सोपा नियम म्हणजे इतरांनी आपल्याबाबतीत केलेल्या वाईट गोष्टी विसरून जायचं आणि केवळ चांगल्या गोष्टीच लक्षात ठेवायच्या. कपाळाला आठय़ा घालून वावरणारी, कण्हत कुढत जगणारी माणसं कुणालाही आवडत नाहीत. त्याउलट प्रसन्न हसणारी निर्मळ मनाची माणसं सगळय़ांनाच हवीहवीशी वाटतात. म्हणूनच शिरसाट सर कवितेच्या शेवटच्या कडव्यात लिहितात
माझ्या घराची दारं खिडक्या
सदा उघडय़ा असतात
अंगणातली फुलं पाहून
माणसंही फुलतात.
ठरलं तर… मनातली सगळी जळमटं काढून, सगळा केरकचरा बाहेर फेकून मन अगदी स्वच्छ करूया. मोकळय़ा निर्मळ मनानं, सर्वांशीच आपुलकीनं वागण्याचा निश्चय करून आपलं आयुष्य फुलवूया, नातेसंबंध दृढ- समृद्ध करून सामाजिक आरोग्यदेखील सुधारण्याचा प्रयत्न करूया. अगदी आजपासूनच…
मूळ कविता: घर
मी
घर गळपं ठेवत नाही
पडपं ठेवत नाही
सडपं ठेवत नाही की
मळपं ठेवत नाही.
घरघर लागेल अशी ठेव ठेवत नाही.
घरात नादुरुस्त असं काहीच ठेवत नाही
रद्दी ठेवत नाही
सद्दी ठेवत नाही
कचरा ठेवत नाही की
बोचरा ठेवत नाही
फाटपं ठेवत नाही
तुटपं ठेवत नाही
नुसते खोके ठेवत नाही की
रिकामे डोके ठेवत नही
नासलेलं ठेवत नाही
उबवलेलं ठेवत नाही
शस्त्रांची टोकं माणसांकडे ठेवत नाही
अस्त्रांची बुकं अडगळीत ठेवत नाही
मी घरात झाडू ठेवतो
नेलकटर ठेवतो
घासणी ठेवतो
पुसणी ठेवतो
झटकणी ठेवतो
फटकणी ठेवतो
फाटलेल्या पुस्तकांना कव्हर नीट लावतो
घरात अनावश्यक झोपत नाही
उगीच खोकत नाही
डाफरत नाही की
काहीबाही उकरत नाही
मला हवं नवं कोरं करकरीत
ताजंतवाणं तरारी आणणारं
माझ्या घराची दारं खिडक्या
सदा उघडय़ा असतात
अंगणातली फुलं पाहून
माणसंही फुलतात.
कवी : मोहन शिरसाट




























































