
>> ऋता कळमणकर
जंगलात प्रवेश केल्यावर अगदी सहजी दृष्टीस पडणारा व मन मोहून टाकणारा प्राणी म्हणजे हरीण. अतिशय सुंदर झळाळणाऱया कातडीचा, विविध प्रकारच्या शिंगांचा आणि अतिशय सुंदर मोठय़ा मोठय़ा डोळ्यांचा हरीण हा प्राणी. त्याचे डोळे एवढे सुंदर असतात की, आपल्याकडे सुंदर डोळ्याच्या स्त्रीला मृगनयनी म्हणतात.
हरीण हा प्राणी दोन दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात आहे. या देखण्या जनावराची दोन मुख्य उपकुळे आहेत ती म्हणजे सारंग हरिणे आणि कुरंग हरिणे. जगभर असणाऱया 180 जातीतील 10 सारंग आणि 6 कुरंग जाती हिंदुस्थान, तिबेट, नेपाळ, भूतान येथे आढळतात. हिंदुस्थानात आढळणारे चितळ, सांबर, बारासिंगा, कश्मिरी हंगूल, मणिपुरी संगई, दरडा, कस्तुरीमृग, सिक्कीम शाऊ, पिसोरी व पाडा हे सारंग हरिणे व चौसिंगा, नीलगाई, काळवीट चिंकारा, गोआ, तिबेटी चीक हे म्हणजे कुरंग हरिणे आहेत.
आफ्रिकेमध्ये प्राण्यांची इतकी विविधता असून येथे सारंग हरीण दिसत नाहीत. कारण ही हरिणे घनदाट जंगलात, शुष्क वाळवंटी प्रदेशात राहतात. जसे आफ्रिकेत सारंग हरिणे दिसत नाहीत तसेच ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिकामध्ये कुरंग दिसत नाहीत.
सारंग हरणांना दरवर्षी नवी शिंगे येतात. उदाहरणार्थ, चितळाच्या शिंगावर प्रथम मखमली आवरण असते. हळूहळू ते वाळून त्याचे पोपडे पडतात. हरिणे झाडाला घासून ते वाळलेले आवरण काढून टाकतात. त्यांच्या शिंगांना फांद्यांसाखी इतर शिंगे फुटलेली दिसतात. सारंग कुळात फक्त नरालाच शिंगे असतात, मादीला नसतात. एकदा का वरचे आवरण निघाले की, नर प्रजोत्पादनासाठी तयार असतो. शिंगे एकमेकांत अडकवून मागे रेटारेटी करून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. विजयी नर मेटिंगसाठी मादीकडे जातो. सारंग हरिणांना पायांना खूर असतात, ते विभागलेले असतात.
कुरंग कुळातील हरीण ( antelope) याची शिंगे ही पोकळ असून हाडाच्या सांगाडय़ाचा भाग असतात. त्यांची शिंगे कायमस्वरूपी असून सरळ असतात. त्यावर वळण, खाचा असतात. त्यांच्यात नर आणि मादी, दोघांनाही शिंगे असतात. एकदा का शिंग तुटले तर परत येत नाही. तसेच थॉम्सन गॅझेल हे शेकडोंच्या संख्येने दिसणारे आफ्रिकन अँटिलोप पांढऱया पोटाचे व अंगावर जाड काळा पट्टा असलेले मध्यम आकाराचे सुंदर हरीण आहे. चिंकारा हे हिंदुस्थानी गॅझेल आहे.
इलॅण्ड, कुडू हे आफ्रिकेतील आकाराने मोठे म्हणजे गाई एवढे अँटिलोप्स आहेत. त्याचप्रमाणे टोपी, हार्टबीस्ट हेही आकाराने मोठे. यातील टोपी हे हरीण. त्याचा संपूर्ण पायाचा व तोंडाचा भाग हा निळसर काळा असतो. ओरेक्स या कुरंग हरिणाच्या सरळसोट लांब शिंगांना खाचा असतात. कुडूच्या अंगावर पिवळसर पट्टे आढळतात. ब्लॅक बक, इम्पाला, जेरेणूक अशा कितीतरी कुरंगची विविधता येथे पाहायला मिळते. डीक डीक हे सर्वात छोटे हरीण सतत जोडीदाराबरोबरच दिसते व राहतेही. हरिणाचे बछडे जन्मल्यानंतर एका तासाभरातच उठून चालण्याचा प्रयत्न करू लागते. दोन आठवडय़ांत गवत खाण्यास सुरुवात करते. हरिणाच्या बछडय़ांच्या अंगाला हरिणाच्या अंगाला येतो तो वास येत नाही. हा सेंट नसल्यामुळे त्यांचे रक्षण होण्यास मदत होते. प्रेडिएटरला त्यांचा वास येत नाही.
जगातील सर्वात मोठे हरीण हे मूस जातीचे असून 400 किलोपर्यंत वजन असते. त्याची झलक मला अलास्का येथे पाहायला मिळाली. त्याचबरोबर उत्तर ध्रुवावर स्वालबर्ड रेनडीअर पाहिले.
सगळ्याच प्रकारची हरिणे ही वेगाने धावतात, धावत धावत वेगातच सुरेख वळणे घेऊन दिशा बदलतात. विशेषकरून चितळ आणि थॉम्सन गझल, इम्पाला यांना पळताना पाहणे हे फार विलोभनीय असते. शिकाऱयापासून स्वतःचे रक्षण करण्यात सर्वच जातीची हरिणे निष्णात असतात. एकमेकांना कॉल देणे, पाणी पिताना काही हरिणे उभे राहून सभोवार सावध नजर फिरवत असतात. त्यांची डोळ्यांची रचना ही त्यांना खूप रुंद असा परिसर न्याहाळण्यात मदत करते.
चितळ हे हिंदुस्थानात सर्वाधिक आढळणारे सारंग हरीण आहे, विटकरी कातडीवर पांढरे ठिपके, अतिसुंदर डोळे सकाळच्या कोवळ्या उन्हात व सायंकाळच्या सोनेरी उन्हात त्यांच्यावरून नजर हटत नाही. कितीही पाहिले तरी समाधान होत नाही. हे मात्र कळपाने चरत असतात. ही अत्यंत सावध जात आहे. खूप साऱया माद्या, छोटे गोजिरवाणे बछडे व मुख्य नर असे चरताना दिसतात. गवत खाणारा हा प्राणी गाईप्रमाणे रवंथ करतो. मध्य हिंदुस्थानात कान्हा, बांधवगड येथे चितळांची संख्या लक्षणीय आहे. हे वाघाचे मुख्य भक्ष्य असून बिबळे, रानकुत्रेही त्यांची शिकार करतात. चितळाप्रमाणेच सांबर हरिणेही हिंदुस्थानात खूप प्रमाणात आढळतात. सांबर हेही हिंदुस्थानातील मुख्य सारंग हरीण आहे. दाट जंगलात पाणवठय़ाच्या आजूबाजूला राहतात. माद्या नेहमी कळपात राहतात. धिप्पाड असे सांबर वाघाचे आवडते खाद्य आहे.



























































