
>> कमलेश गिरी
गेल्या काही वर्षांपासून जागतिक राजकारण-अर्थकारण-उद्योग व्यवस्थेचा आसमंतात हिंदुस्थानी वंशाच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांची यशोपताका दिमाखाने फडकत आहे. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी अजयसिंह बंगा यांची निवड घोषित झाल्याने या शृंखलेत आणखी एक पुष्प जोडले गेले आहे. यानिमित्ताने इतिहासात पहिल्यांदाच विश्व बँकेच्या सर्वोच्च पदी हिंदुस्थानी व्यक्ती विराजमान होणार आहे. प्रगत पाश्चिमात्य देश अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत साप-गारुडय़ांचा देश म्हणून हिंदुस्थानला हिणवत असत; पण आज गुगल, मायक्रोसॉफ्टच्या प्रमुख पदापासून ब्रिटन, आयर्लंडच्या पंतप्रधानपदापर्यंत आणि अमेरिकेच्या मंत्रिमंडळापर्यंत सर्वदूर असणारा हिंदुस्थानींचा प्रभाव हा जगाला अचंबित करणारा ठरला आहे.
ब्रिटिशांच्या वसाहतवादी, अन्यायी, जुलमी राजवटीतून मुक्त होत मिळवलेल्या स्वातंत्र्याचा विजयोत्सव साजरा करत हिंदुस्थानने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत गारुडय़ांचा देश म्हणून ब्रिटनसह पाश्चिमात्य जगातील हिंदुस्थानची आणि हिंदुस्थानींची नेहमीच हेटाळणी करत आले. हिंदुस्थानी स्वातंत्र्याला संमती देतानाही इथे लोकशाही कशी टिकणार, अशी शंका स्वतःच्या गोरेपणाचा आणि पुढारलेपणाचा दुराभिमान बाळगणाऱयांनी व्यक्त केली होती; परंतु आज साडेसात दशके अखंड लोकशाही व्यवस्था राबवून हिंदुस्थानने जगासमोर एक आदर्श घालून दिला. इतकेच नव्हे तर हिंदुस्थान आज विभागीय महासत्ता म्हणून आशिया खंडात नावारूपाला आला आहे. जी-20 सारख्या जगातील बलाढय़ संघटनेचे अध्यक्षपद मिळवून हिंदुस्थानने आपल्या वैश्विक प्रभावाचे दर्शन घडवून दिले आहे. दुसरीकडे हिंदुस्थानी वंशाच्या अनेक प्रतिभावंत, कर्तृत्ववान व्यक्तींचा आज जगभरात डंका आहे. आशिया, आफ्रिका, अमेरिका अशा सर्वच खंडांमध्ये कॉर्पोरेट विश्वापासून राज्यसत्तेपर्यंत महत्त्वाच्या स्थानांवर विराजमान होणारे हिंदुस्थानी वंशाचे नागरिक हिंदुस्थानच्या वैभवशाली परंपरेचे शिरोमणी आहेत. ज्या हिंदुस्थानवर 150 वर्षे ब्रिटिशांनी राज्य केले, त्या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हेदेखील हिंदुस्थानी वंशाचे आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनात 130 हून अधिक हिंदुस्थानी अमेरिकन महत्त्वाच्या पदांवर आहेत. हिंदुस्थानी वंशाचा समुदाय अमेरिकेच्या लोकसंख्येपैकी सुमारे एक टक्का आहे; परंतु प्रशासनात त्यांचे प्रतिनिधित्व सर्वात मोठे आहे. हिंदुस्थानी लोक ज्या ज्या देशांत गेले तेथे त्यांनी त्या ठिकाणचे संविधान आणि संस्कृती आत्मसात करून त्या देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. समविचारी विचार करणारे आणि त्या देशाच्या भावनेचे प्रतिबिंब असलेल्या नेत्यांसह सरकार स्थापन करणाऱया अशा हिंदुस्थानींबद्दल म्हणूनच जगभरात आत्मीयता आणि आदर पाहायला मिळतो. आज टेक्नॉलॉजी विश्वातील दिग्गज पंपन्यांचे सीईओ हिंदुस्थानी वंशाचे आहेत. विविध देशांमध्ये मूळ हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्ती खासदार, महापौर आहेत. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हिंदुस्थानी-अमेरिकन उद्योजक आणि माजी मास्टरकार्ड प्रमुख अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
तीन दशकांपूर्वीपर्यंत अजय बंगा हे कोलकाता येथील नेस्लेचे शाखा व्यवस्थापक होते. त्यांचा हा प्रवास प्रत्येक हिंदुस्थानीसाठी प्रेरणादायी आहे. अमेरिका जागतिक बँकेवर हवामान बदलाच्या समस्या सोडवण्यासाठी पावले उचलण्यासाठी दबाव आणत असताना बायडेन यांनी ही निवड केली आहे, हे विशेष म्हणावे लागेल.
अजय बंग यांचे संपूर्ण शिक्षण हिंदुस्थानातच झाले आहे. येथून उच्च शिक्षण घेतल्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि तिथे जाऊन आपली क्षमता सिद्ध केली. त्यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1959 रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण जालंधर आणि शिमला येथे झाले. दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र्ाात पदवी घेतल्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले. 1981 मध्ये त्यांनी नेस्ले इंडियामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून प्रवेश केला आणि तेथून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. आपल्यातील काwशल्यांनी आणि कर्तृत्वाने 13 वर्षांत बंग हे या पंपनीत व्यवस्थापक पदापर्यंत पोहोचले. त्यानंतर पेप्सिकोच्या रेस्टॉरंट विभागात ते सहभागी झाले. केएफसी आणि पिझ्झा हट हिंदुस्थानात आणण्याचे श्रेय त्यांनाच जाते. 1996 मध्ये ते सिटी ग्रुपचे मार्पेटिंग हेड बनले. सन 2000 मध्ये सिटी फायनान्शियलचे प्रमुख म्हणून बंग यांची नियुक्ती झाली. 2009 मध्ये ते मास्टरकार्डचे सीईओ बनले. ‘फॉर्च्यून’ या जगप्रसिद्ध मासिकाने 2012 मध्ये अजय बंग यांची जगातील शक्तिशाली उद्योगपती म्हणून निवड केली. व्यवसाय क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन हिंदुस्थान सरकारने 2016 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.
जागतिक बँकेने योग्य अजेंडा निवडून चांगल्या कामांवर भर द्यावा अशी अमेरिकेची इच्छा आहे. अजय बंगा यांना हवामान बदलासारख्या समस्या सोडवण्याची विशेष क्षमता असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून संबोधले जात आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारी पंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये भागीदारी निर्माण करण्याचा त्यांना व्यापक अनुभव आहे. अजय बंगा हे ‘जनरल अटलांटिक’ या खासगी इक्विटी फर्मचे उपाध्यक्ष आहेत. साडेतीन अब्ज बजेट असणाऱया क्लायमेट चेंज फंडाच्या सल्लागार मंडळावरदेखील ते आहेत.
जागतिक बँकेचे प्रमुख बनणे ही अभिमानास्पद बाब असली तरी हे पद तितकेच आव्हानांनी भरलेले आहे. जागतिक बँकेचे मुख्य कार्य म्हणजे विकास प्रकल्प आणि लोककल्याणकारी कामे वाढवणे. सध्या कोरोना महामारीशी झुंज दिल्यानंतर अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. अनेक देश कर्जाच्या सापळ्यात अडकले आहेत. अशा स्थितीत जागतिक बँकेचे प्रमुख म्हणून अजय बंगा यांच्या समोर कमी उत्पन्न असलेल्या देशांच्या आर्थिक गरजा संतुलित करण्याचे मोठे आव्हान असेल.
अजय बंगा यांना अमेरिकन सरकारमध्ये काम करण्याचा भरपूर अनुभव आहे यात शंका नाही. त्यांच्याकडे योग्य नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्य आहे. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये राहण्याचा आणि काम करण्याचा अनुभव आणि काwशल्य त्यांच्यात आहे. त्यामुळे विश्व बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तितक्याच यशस्वीपणे सांभाळून ते या संधीचे सोने करण्याबराबेरच या पदाची गरिमा वाढवतील यात शंकाच नाही.
अजय बंगा यांची ही भरारी समस्त हिंदुस्थानींसाठी, खास करून तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. आपल्या क्षमतेच्या बळावर आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम अनुकरणीय आहेत. गेल्या काही वर्षांत हिंदुस्थान-अमेरिका संबंधही लक्षणीयरीत्या मजबूत झाले आहेत. त्यात अनिवासी हिंदुस्थानींची भूमिकाही महत्त्वाची आहे. परदेशात राहूनही तेथील हिंदुस्थानी आपल्या देशाच्या मातीशी जुळलेली नाळ विसरलेले नाहीत. ते अजूनही त्यांच्या मुळाशी जोडलेले आहेत. अजय बंगा यांचेच उदाहरण घेतल्यास त्यांना पंजाबच्या संस्कृतीची प्रचंड ओढ आजही आहे. अजय बंगा यांचे कुटुंब दिल्लीतील डिफेन्स कॉलनीमध्ये राहते. त्यामुळे दिल्लीकरांसह समस्त देशासाठी त्यांची निवड अभिमानाने ऊर भरून आणणारी आहे. याचे कारण या पदावर विराजमान होणारे ते पहिले हिंदुस्थानी आहेत.





























































