
>> महेंद्र पाटील
श्रावण सरीत सृष्टी न्हाऊन निघाली. आठवणींचे ओले ऋतू डोळ्यातून पाझरले होते. संध्याकाळ हळूहळू विरून जात होती, रात्र आपलं अंग पसरू लागली होती. चांदण्या जमा होऊ लागल्या, चंद्राचा मंद प्रकाश पसरू लागला होता. सारा आसमंत भारलेला वाटत होता. माझं मन मात्र वेगळ्याच विचारात गुंतलं होतं… मला वाटायचं, पहाट जेव्हा कोवळी उन्हं घेऊन माझ्या अंगणी येते तेव्हा तिचे कोवळे रूप मनाला खूप भावतं. असं वाटतं की ती अशीच समोर राहावी… पण ती पहाट तशीच समोर नाही राहात. कारण त्यानंतर येणारी दुपार त्या पहाटेचं अस्तित्व नाहीसं करतं. पहाटेला विरून जावं लागतं. पुन्हा दुपार येते, पुन्हा मन शांत होतं झाडांच्या गर्द सावलीत. त्या सावलीला नाहीसं करणारी संध्याकाळ हळूहळू येते आणि मग ती दुपारसुद्धा विरून जाते. सृष्टीतले सगळे प्रहर एकामागोमाग येत जातात आणि एकमेकांचं अस्तित्व हिरावून स्वतः पसरू लागतात…
पण ही गोष्ट मनाला कळत नाही. मन फार हट्टी असतं. त्याला ते प्रहर जपून ठेवायचे असतात. सुंदर रात्र, सुरंगी संध्याकाळ, कोवळी उन्हं, निसटती दुपार, झाडांची सावली, पाखरांचा किलबिलाट… निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला एक बंधन आहे. वेळेचं बंधन, ऋतूंचं बंधन… त्याप्रमाणे ते प्रहर उगवतात आणि मावळतात. निसर्ग जरी अथांग असला तरी त्याहून अथांग आपलं मन असतं. निसर्ग नियमाप्रमाणे जरी ऋतू येत जात असले आणि त्याप्रमाणे प्रहरसुद्धा बदलत असले तरी मनाला हवा तेव्हा, वाटेल तसं त्या ऋतूंना अनुभवता येतं. पावसाळी रात्री कधी मनाला दूर घेऊन गेलो त्या जुन्या आठवणींच्या गावी तर त्या भर पावसातही ग्रीष्माच्या झळा जाणवू लागतात मनाला. कधी वैशाखातही आपलं मन कुणाच्या तरी विचारात श्रावण सारी झेलू लागतं. कारण मनाला कसलंच बंधन नसतं. त्यामुळे ते कसंही वागतं. काही विचार न करता जगत असतं. असं आयुष्य बुद्धीला जगता येत नाही. नाहीतर खूप गोष्टी मनासारख्या झाल्या असत्या सगळय़ांच्या या जगात. जो तो आपल्या मर्जीप्रमाणे वागू लागला असता. मग कसलाच अर्थ उरला नसता आयुष्याला. नदीसुद्धा तिच्या मनासारखं वागू लागली असती आणि पाऊससुद्धा बरसू लागला असता कधीही, कसाही… रात्र कधीही आली गेली असती. दिवस कधीही उगवला असता. पण असं होत नाही. कारण त्यांना बंधनं आहेत आणि ही सारी बंधनं मनाला तोडता येतात. म्हणून मन बुद्धीच्याही पलीकडे जाऊन विचार करू शकतं आणि म्हणूनच त्याच्या या स्वभावामुळे मनाला चंचल, लहरी असं म्हटलं जातं. पण त्याची पर्वा मनाला कुठे असते? त्याला फक्त ठाऊक असतं कल्पनेच्या आभाळात स्वच्छंदपणे बागडणं. जिथवर जाता येईल तिथवर दूर जायला… समोरच्या मनाच्या तळाशी शिरून त्याच्या अंतरंगात बुडून जायला. मन बेफिकीरपणे आजवर कुणाचंही बंधन न जुमानता जगत आलंय. सगळ्या गोष्टीना बंधनं असतात, मनाला कधीच नसतात. मनाला फक्त दुसरं वेडं मन बंधनात टाकू शकत. मग ते बंधन काही क्षणाचं, काही दिवसाचं, काही वर्षांचं, तर कधी काही जन्मांचं असू शकतं. अशाच मनाच्या शोधात प्रत्येक मन असतं. आपल्यापेक्षाही दूर दूर जाऊ शकणारं मन जेव्हा त्या दुसऱया मनाला भेटतं तेव्हा ते मन त्यासोबत अलगदपणे निघून जातं. दूरच्या प्रवासाला. शेवटी मनाला एक गोष्ट हवी असते. या सृष्टीतली, या जगातली, आसमंतातली सारी पुंपणं तोडून जमेल तितपं दूर जायचं. त्यासाठी दुसऱया मनाचा आधार घेऊन जायचं झालं तरी त्याची तयारी असते. म्हणून दोन मनं जेव्हा जवळ येतात, तेव्हा एका मोठय़ा प्रवासाची ती नांदी असते.
– [email protected]





























































