कवडसे – बरं झालं आपण भेटलो नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>महेंद्र पाटील

तू गेल्या पावसात म्हणाली होतीस, कधीतरी माझ्या शहरात ये, आपण भेटू, पण पाऊस निघून गेला आणि खूपदा ठरवूनही आपली भेट होऊ शकली नाही. तुझ्या शहराची वाट ओळखीची होती तशी पण कधी पावलं तिकडे वळली नाहीत. तू म्हणालीस, आता दिवाळीत तरी ये वेळ काढून, पण पुन्हा काहीतरी झालं आणि आज जाऊ, उद्या जाऊ, असं करता करता काही वर्षे निघून गेली. तो योग काही आला नाही आणि आपली ठरलेली भेट राहून गेली. तरीही आपल्या दोघांच्या मनात भेटीची ओढ मात्र कायम होती.

जेव्हा कधी बोलणं व्हायचं तेव्हा त्या संवादाचा शेवट आपल्या भेटीवर व्हायचा आणि लवकरच भेटू, असं ठरवून पुन्हा आपण खूप दिवस अबोल असायचो. मनात भेटीची इच्छा आहे, पण तरी आपण समोर का येऊ शकत नाही? ती भेट का होऊ शकत नाही? असे प्रश्न मनाला कधीच पडले नाहीत. कारण तुला विश्वास होता की, भेट होईल कधी ना कधी, जेव्हा योग येईल तेव्हा, पण मला माहीत होतं, भेटी या योगायोगाने होत नाहीत. या भेटी नियतीच्या मनाप्रमाणे होत असतात. तिच्या मनात असतं तर आपण भेटलोही असतो कदाचित आणि गोष्ट सुरू झाली असती आपली. आपली गोष्ट आहे का? हो, नक्कीच काहीतरी आहे. त्याशिवाय आपण बोलत नाही एकमेकांशी. फक्त ती गोष्ट आपल्या भेटीनंतर सुरू होईल. यंदाच्या पावसात आपल्या भेटीच्या चर्चासुद्धा झाल्या नाहीत आणि विषयसुद्धा निघाला नाही. हळूहळू नियतीने गोष्ट सुरू होण्यापूर्वी तिचा शेवट करायचं ठरवलेलं दिसतंय.

परवा सहज बोलता बोलता विषय निघाला आणि मी विचारलं, आपण भेटू तेव्हा तूच म्हणालीस, नको आता भेटायला. तुझं ते वाक्य ऐकून मला नवल वाटलं नाही. कारण सतत न घडणाऱया भेटी, न जुळून येणारे योग माझ्या मनाला आतून सांगत होते की, काही गोष्टी सुरू होण्याआधीच संपतात. तशी आपली गोष्ट असेल का? तर तू सहज म्हणालीस, नको भेटू या. मी कारण विचारलं तर तुझ्याकडे त्याचं उत्तर नव्हतं की तुला ते उत्तर द्यायचं नव्हतं हे ठाऊक नाही मला, परंतु तुझं ते वाक्य ऐकून खूप गोष्टी मनात आल्या. आपण भेटलो असतो कदाचित तर काय झालं असतं! आपण मनाने जवळ होतो की नाही हे समजलं असतं. आपली गोष्ट पुढे कशी असेल हेदेखील समजलं असतं, पण आता मनात आपल्या भेटीबद्दलच्या असंख्य गोष्टी बंदिस्त राहतील…कायम! दोघांच्याही मनात आणि त्याच भावना नेहमीप्रमाणे प्रत्येक ऋतूत आपल्या मनाला भेटीची ओढ निर्माण करून भेटीची ही धग कायम मनात जिवंत ठेवतील. आपलं हे अनोखं नातं हेसुद्धा असंच पुढे सुरू राहील.
यंदाच्या दिवाळीत नाही, तर पुन्हा पुढल्या दिवाळीत तरी आपण भेटू या आशेवर दिवस पुढे रेटत राहू. पुन्हा काही ऋतू येतील आणि जातील. काही नवीन कविता, काही नवीन शब्द वेचत मी आपल्या न झालेल्या भेटीची गोष्ट लिहीत बसेन. म्हणूनच माझं मनसुद्धा आतल्या आत म्हणालं, बरं झालं, आपण भेटलो नाही, नाहीतर काही सुचलंच नसतं आज मला. बरं झालं, आपण भेटलो नाही, तर काही लिहिलंच नसतं आज तुला…
[email protected]