ज्वारीची भाकर आणि भोरड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. महेश गायकवाड

पूर्वी घरात भांडण लागलं की, जुन्या महिला म्हणायच्या, ‘‘भोरड्यासारखं कला-कला करू नका.’’ भोरड्या म्हटलं की, ज्वारीचे पीक खाणार असल्याची भावना गेली कित्येक वर्षे आपल्या बारामती, दौंड, इंदापूर, सासवड, सोलापूर, मंगलवेढा परिसरात प्रचलित आहे. मात्र याचं वास्तविक भान आणि वास्तविकतासुद्धा जुन्या पिढीला माहीत होती. अहो, भोरड्या नसतील तर आपण ज्वारीचे पीकच घेऊ शकत नाही. कारण थंडीमध्ये कीटकांचे जग अमाप वाढत असते. या अमाप कीटकांना भोरड्या मोठ्या प्रमाणात खातात. त्यामुळे ज्वारी पिकावर येणारे कीटक भोरड्या खातात आणि मग आपले ज्वारीचे पीक आपल्या घरात पोहोचते.

माळरान आणि भोरड्या असं समीकरण गेली अनेक वर्षे सुरू आहे. यात भर पडली ती बदलत्या अधिवासाची आणि त्याप्रमाणे जगणाऱ्या वन्य जीवांची. मग यात अनेक वन्य जीव असे आहेत की, ज्यांना अधिवास बदलता आले. ते आजपर्यंत स्वतःचे अस्तित्व टिकून आहेत.

मात्र सात्यत्याने गवताळ माळरानात दिसणाऱ्या भोरड्या अलीकडे शहरात मोठ्या संख्येने दिसू लागल्या आहेत. कारण गवताळ माळराने झपाट्याने कमी होऊ लागली आणि परिणाम अधिवास कमी होऊ लागले. मग भोरड्यांनी आपला मोर्चा गेल्या 15 वर्षांत शहराकडे वळविला असे दिसून आले. मी सात्यत्याने 1998 पासून भोरड्यांविषयी निरीक्षणे नोंदवीत असून यात गवताळ माळराने, खुरटी बाभळीची वने, पाझर तलाव अशा भागात भोरड्या मोठय़ा प्रमाणात दिसून येत होत्या. माळरानातील गवत कमी होत चालले असून परिणामी कीटक विविधता कमी होत आहे. काटेरी झाडे तोडली गेली आहेत, शिवाय पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष. असा सारासार विचार करता

शहरालगत त्यांचे प्रमाण वाढत आहे. कारण पाणी, अन्न आणि निवाऱ्याची जागा, उंच झाडे आणि सुरक्षितता. लोकांमध्ये पक्षी आणि वन्य जीव यांच्याबद्दल वाढलेले प्रेम व जनजागृती असे एकूणच बदलते निसर्गचक्र भोरडीला शहरात यायला भाग पाडत आहे.

पक्षी स्थलांतर करताना हिवाळ्यात उत्तर गोलार्धातील कडाक्याची थंडी सहन करू शकत नाहीत. अर्थात या काळात खूप बर्फवृष्टीमुळे अनेक पाणवठे गोठतात. खाद्यही उपलब्ध होऊ शकत नाही, शिवाय बर्फातील जीवघेणी थंडी आणि अन्नाचा तुटवडा ही बाब प्रामुख्याने स्थलांतर करण्यासाठी अनेक वन्य जीवांना मजबूर करत असते आणि मग सुरू होते जगण्यासाठी हजारो किलोमीटरची सफर. यात भोरड्या किवा गुलाबी मैना यांची सफर तर 8 ते 12 हजार किलोमीटरची असते. त्यांचे रोझी स्टारलिंग असे इंग्रजीत नाव असून भोरड्या मूळच्या पूर्व युरोप – रशिया, उत्तर आशियाच्या भागातल्या आहेत. आपल्याकडे पावसाळ्याचा शेवट आणि थंडीच्या सुरुवातीला ऑक्टोबरमध्ये हिंदुस्थानभर दाखल होतात. मात्र या भोरड्यांची वीण थंड प्रदेशात म्हणजे युरोप व रशियामध्येच होत असते. हिंदुस्थानातून पुन्हा मायदेशी परतल्यानंतर म्हणजे युरोप आणि रशियात जूनमध्ये त्यांची वीण होते. एक मादी चार अंडी घालत असते. आणि मग पिले सप्टेंबरपर्यंत मोठी होतात. तरुण पिले आणि वयस्कर भोरड्या एकत्रितपणे ऑक्टोबरमध्ये हिंदुस्थानात दाखल होतात.

आजच्या फेसबुक व व्हॉटस्ऍप आणि इतर माध्यमांनी बारामतीसह इतर राज्यांतल्या भोरड्या पक्ष्यांना आपल्या गावापासून ते हिंदुस्थानबाहेर पोहोचविण्याचे काम केले आहे. साधारणपणे 2015 पासून सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी बारामतीत येऊन भोरड्या नृत्य पाहिले आणि मग सुरुवात झाली या सर्व बाबी मीडियामधून पुढे जायला. अनेक व्हिडीओ मी स्वतःही यूट्यूबवर प्रसिद्ध केले. अक्षरशः हिंदुस्थानातून अनेक राज्यांतून माझ्याशी विविध लोकांनी संपर्क साधला आणि भोरड्या नृत्याचा आनंद प्रत्यक्ष घेतला. यावर्षी तर जवळपास 10 हजारांपेक्षा जास्त लोकांनी भोरड्या नृत्याचा आनंद घेत शेकडो व्हिडीओ विविध माध्यमांतून सर्वांना पाठविले. त्यामुळे प्रत्येक मोबाईलमध्ये यांचा नृत्य प्रकार पाहावयास मिळत आहे. अर्थात हे सर्व शिस्तीत सुरू राहावे म्हणून गेली अनेक वर्षे मी प्रयत्न करीत आहे. याचा आनंद घ्यायचा असेल तर भोरड्याच्या निवासापासून जवळपास अर्धा किलोमीटर लांबूनच हे भोरड्या नृत्य पाहिले पाहिजे. तरच त्यांचे विविध आकार आपल्याला पाहावयास मिळतात. यात सापाचा आकार, माशांचा आकार, मगरीचा आकार, मोठय़ा फुग्याचा आकार, ढगांचा आकार असे नानाविध आकार करत असतात.

दख्खनच्या माळरानात जास्तच भोरड्या दरवर्षी येत असतात. त्याचे कारण पण खूप महत्त्वाचे आहे. पावसाळा संपला की, आपल्याकडे गवताला असंख्य बिया आलेल्या असतात. शिवाय या गवतात असंख्य कीटक, नाकतोडे, गवती किडे यांचे प्रमाण खूप वाढलेले असते. शिवाय कीटकांची अंडी, अळ्या यांचे प्रमाणही जास्त असते. मग काय, भोरड्या त्यावर तुटून पडतात. आपल्या भागातील कीड नियंत्रण करण्यासाठी भोरड्या मोठ्या प्रमाणात काम करीत असतात.

शिवाय आपल्याकडील अनेक वृक्षराजी पुढे उन्हाळ्याची चाहूल लागताच फुलांनी बहरलेली असते. यात काटेसावर, पळस, पांगाऱ्यासह अनेक झाडे फुलांनी गच्च बहरलेली असतात. मग काय भोरड्या त्यावरही मोठ्या प्रमाणात ताव मारताना दिसून येतात. म्हणून या भोरड्यांना विविध नावे आहेत. जसे कोकणात साळ भोरडी. कारण भात पिकावरील कीड खाऊन शेतकऱ्यांना खूप मोठी मदत करत असते. विदर्भात पळस, पांगारा, काटेसावर झाडांवर मधुरस पित असते म्हणून पळस भोरडी किंवा मधुसारिका, तर माळरानात ज्वारीवर भरडल्यासारखा ताव मारते म्हणून भोरडी अशी विविध नावे स्थानिकांनी दिली आहेत. आपल्या भागात भोरड्याची शिकार माणसं अजिबात करत नाहीत. त्यामुळे त्यांना खूप सुरक्षितता वाटते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांना फक्त नैसर्गिक शिकारी पक्षी, साप, मांजर, असे मोजकेच शिकारी आहेत. नैसर्गिक आपत्तीमधून मात्र कोणाचीही सुटका नाही. सन 2015च्या गारपिटीत जवळपास एक लाखापेक्षा जास्त भोरड्या मेल्याची नोंद हंपे, निसर्ग जागर प्रतिष्ठान संस्था अशा विविध संस्थांनी केली होती. शिवाय स्थलांतर करताना शिकारी पक्षी, बदलते वातावरण, ढगाळ वातावरण असे अनेक नैसर्गिक धोके यांच्या संख्येवर परिणाम करीत असतात.

हा पक्षी दिसायला हिंदुस्थानी मैना अर्थात साळुंकीपेक्षा थोडा लहान असून वजन साधारणपणे 150 ते 200 ग्राम एवढे असते. गुलाबी रंगाचे पोट व पाठ, ते पण हिंदुस्थानात आल्यानंतर होतो. डोक्यावर काळा तुरा. काळे पंख असलेली मादी मात्र नरापेक्षा फिकट रंगाची असते. नर मात्र खूप गुलाबी असतात. मादीपेक्षा नर दिसायला सुरेख असतात. तसेच नरापेक्षा माद्यांचे प्रमाण जास्तच असते.

आपल्या परिसरातील भोरड्या संरक्षण करण्याचे महत्त्वाचे काम आपल्या सर्वांचे आहे. यात त्यांच्या संरक्षणासाठी स्थानिक वृक्ष लागवड करणे, शिवाय जुनी काटेरी झाडे वाचविणे असे नानविध उपाय करणे नितांत गरजेचे आहे. आपल्याला त्यांचे नृत्य प्रकार पाहायचे असतील तर शिस्तबद्धता अंगीकारणे गरजचे आहे. पक्षी निरीक्षणातून आपल्याला जगातील सर्वोच्च आनंद आणि समाधान मिळत असते हे विसरून चालणार नाही. हाच आनंद आणि समाधान पुढच्या पिढीला देणे अत्यंत जबाबदारीचे काम आहे हेही विसरता कामा नये. एक सुखद अनुभव पुढच्या पिढीला द्यायचा असेल तर आपल्याला निसर्ग रक्षण आणि निसर्ग वाचन करायला शिकले पाहिजे. पहाटेच्या थंडीत भोरड्या मुरमुरेशन पाहताना भोरड्या माझ्या डोक्यावरून गेल्या की उबदार झलक अनुभवता येते. भोवतीचं तापमान 20 डिग्री असले तरी भोरड्या डोक्यावर असताना 30 डिग्रीपेक्षा जास्त तापमान अनुभवता येते. असा ऊबदार आनंद फक्त भोरड्यांच्या जगातच अनुभवता येतो.

(लेखक निसर्गजागर प्रतिष्ठान या पर्यावरण संस्थेचे संचालक आहेत.)
[email protected]