आदिवासी आणि पोषण आहार योजना

>>महेश काळे

अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून गरोदर आदिवासी माता तसेच लहान बालकांना पोषक आहार दिला जातोय खरा, पण त्यात अधिक परिणामकारकता आणण्याची आवश्यकता आहे. आदिवासी भागाचा विचार केला तर प्रश्न अगदीच हाताबाहेर गेला आहे अशातला भाग नाही, पण त्याआधीच तो दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. मुळात हा जीवनशैली बदलाचा परिणाम असल्याने ती पूर्ववत केली तर ही समस्या दूर होऊ शकेल. ती सर्वांना मिळून दूर करावी लागणार आहे. कारण आपला हा वनवासी बांधव नैसर्गिक जीवनशैलीचा एकमेव प्रेरणास्रोत आहे. त्यामुळे हा स्रोत शुद्ध राहिला पाहिजे.

काही महिन्यांपूर्वीची एक घटना आहे. एका सर्वेक्षणाच्या निमित्ताने काही कॉलेज विद्यार्थ्यांना घेउैन नाशिक जिह्यातील एका आदिवासी पाडय़ावर गेलो होतो. दुपारच्या सुट्टीत जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुले मध्यान्ह भोजन योजनेतील भोजन घेण्यासाठी एकत्र आली होती. सर्व मुले जेवणाच्या प्रतीक्षेत रांगेत बसली होती. तितक्यात एका विद्यार्थ्याने ताट भरून भात घेतला आणि जवळच असलेल्या एका खडकावर टाकला. त्याक्षणी आसपासच्या झाडावर वाट पाहत बसलेले तीस-चाळीस कावळे एकदम त्या भातावर तुटून पडले. काही मिनिटांतच त्यांनी त्या भाताचा फडशा पाडला. याबाबत शाळेच्या शिक्षकांसोबत झालेल्या संवादात त्यांनी ही या मुलांची रोजची पद्धत असल्याचे सांगितले. आपण जेवण करण्यापूर्वी ते रोज कावळ्याला आधी जेवायला घालतात असे त्यांनी सांगितल्यानंतर तर वनांमध्ये निवास करणाऱ्या या आदिवासी बालकांचे खूपच कौतुक वाटले.

कॉलेज विद्यार्थ्यांसोबत परत येताना सहज विचार आला की, प्राणिमात्रांना देव मानणारा, आपल्याआधी त्यांच्या अन्नाची काळजी करणारा हा अत्यंत संस्कारशील समाज स्वतः मात्र कुपोषणासारख्या गंभीर समस्येला कसा बळी पडत असेल? एक मात्र नक्की आहे की, आज एकंदरीतच आदिवासी समाजात पोषक आहाराच्या अभावामुळे निर्माण झालेली स्थिती खूपच चिंताजनक आहे. जंगलचा राजा असल्याने प्रामुख्याने जंगलावरच आपली उपजिविका असणाऱ्या व निसर्गाकडूनच शरीराला पोषक अशा अनेक घटकांचा मुक्तपणे वापर करणाऱ्या या समाजाची पावले नकळतपणे परावलंबित्वाकडे वळू लागली आहेत.

खरं तर आदिवासी क्षेत्र म्हणजे औषधी वनस्पती, रानभाज्या, कंदमुळे, धान्य यांसारख्या नैसर्गिक साधनसामग्रीचे अक्षरशः भांडार आहे. मनुष्याला जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते ते निसर्गाने वनवासी माणसाला अगदी भरभरून दिले आहे. आजच्या जमान्यात ज्या रसायनविरहित गोष्टींची चलती आहे, त्या गोष्टी निसर्गतःच वनवासी माणसाला उपलब्ध आहेत. इथली हवा, पाणी, भाज्या, धान्य, डाळी… सारं सारं शुद्ध आहे. वनवासी क्षेत्रातील सर्व बाबी शुद्ध स्वरूपात मिळत असल्याने वनवासी माणूसदेखील अंतर्बाह्य निर्मळ आहे, शुद्ध आहे. वर्षानुवर्षे निसर्गाच्या सान्निध्यात राहत असल्याने निसर्गाशी त्याचे हे नाते अगदी घनिष्ठ झाले आहे. त्यामुळेच असेल कदाचित, या समाजाचा निष्कपटपणा, निर्व्याजपणा, भाबडेपणा आणि प्रामाणिकपणा अद्यापही टिकून आहे. त्याच्या या स्वभावाचा गैरफायदा काही जणांनी घेतला असेलही, पण त्याला त्याची फारशी फिकीर असल्याचे दिसत नाही.

वनवासी समाजाच्या निसर्गपूरक जीवनशैलीत एकूणच त्याच्या आहाराला खूपच महत्त्व आहे. सकाळी शेतात जाण्यापूर्वी नाचणीची भाकरी, चटणी किंवा उडदाचे मेतकूट (ज्याला काही भागात भुजा म्हणतात) यांचा नाश्ता करण्याची पद्धत जवळपास देशभरातील सर्व आदिवासी भागात आढळून येते. खरं तर हे एक प्रकारे जेवणच असते. शेतात काम करण्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण ऊर्जा या जेवणातून त्यांना प्राप्त होत असते. दुपारी पुन्हा भात, उडदाचे वरण, एखादी रानभाजी, मिरचीची चटणी, मांस-मच्छी, नाचणीची वा तांदळाची भाकरी यांचा समावेश असलेले जेवण आणि रात्रीच्या जेवणात थोडय़ाफार फरकाने याच पदार्थांचा समावेश केला जातो. एकंदरीतच नाचणी (ज्याला रागी वा नागलीदेखील म्हणतात) आणि उडीद हे दोन घटक आदिवासी जीवनात खूप महत्त्वाचे मानले जातात. शरीरासाठी आवश्यक असणारे बहुतेक पोषक घटक या दोन पदार्थांमधूनच त्यांना मिळत असतात. जंगलात मिळणाऱया भाज्या हा वनवासी समाजाच्या दृष्टीने पोषणमूल्य असलेला एक महत्त्वाचा घटक आहे. रायगड जिह्यात पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवसच आधी शेवळा ही अळूच्या कंदासारखी भाजी उगवते. ती भाजी एकदा तरी खाल्लीच पाहिजे असा या भागात प्रघात आहे. मुख्य म्हणजे शरीरासाठी दीर्घकाळ पुरेल एवढे लोह या भाजीतून उपलब्ध होते असे मानले जाते. शेवळा, लोंदी, करंद, कंदके, रताळे ही कंदमुळे आजही आदिवासीच्या शरीराचे पोषण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

आर्थिक विषयासाठी आदिवासी समाज आज शहरावर अवलंबून राहू लागला आहे. त्यामुळे शहरात असलेल्या अनेक भल्याबुऱ्या बाबींचा आदिवासी भागात प्रवेश होउै लागला आहे. वनवासी भागात रानभाज्या जाउैन कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची यांसारख्या भाज्यांनी त्यांची जागा घेतली आहे. गाईच्या दुधाचा वापर फक्त तिच्या वासरासाठी असल्याची आदिवासी समाजाची भावना असल्याने मुळातच दुधाचा वापर या समाजात जवळपास शून्य होता. त्यामुळे घरात गाय असूनही तिच्या दुधाचा वापर न केल्याने खूप मोठय़ा पोषक घटकापासून हा समाज वंचित आहेच. मुख्य म्हणजे शेतीला व्यावसायिक स्वरूप आल्याने भातशेती असेल वा भाजीपाला असेल, त्यांच्या उत्पादन वाढीसाठी खते आणि रसायनांचा वापर वाढल्याने या सर्व गोष्टींना जी एक शुद्धता होती तीच आता नाहीशी झाली आहे. पौष्टिकेतचा मोठा साठा असणाऱ्या नाचणीसारख्या महत्त्वपूर्ण घटकाच्या उत्पन्नात लक्षणीय अशी घट झाली आहे. छोटय़ा पाडय़ांमधील दुकानांमध्ये पोषक मूल्ये शून्य असलेली अनेक पाकिटे लटकताना दिसत आहेत. एकंदरीतच जीवनशैली बदलल्याने महिला व बालकांच्या आरोग्यावर प्रभाव जाणवू लागला आहे. व्हिटॅमिन्स, लोह यांच्या कमतरतेमुळे महिलांना, त्यातही तरुण मुलींना ऍनिमियासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. प्रचंड मेहनत करतानाही न थकणारी आदिवासी महिला आता मात्र हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे थकवा येण्यासारख्या तक्रारी घेउैन डॉक्टरांकडे जात आहे. खेळातील अद्भुत कौशल्य असलेल्या खेळाडू मुली शारीरिक क्षमतेच्या अभावी मागे पडत आहेत. आतापर्यंत कधीही न आढळणाऱया मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यासारख्या व्याधींनी आदिवासी समाजाकडेदेखील आपला मोर्चा वळवला आहे. आईचेच पोषण न झाल्याने बाळेदेखील कुपोषित जन्माला येत आहेत. एका भयंकर दुष्टचक्रात आदिवासी सापडला आहे.(लेखक वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत.)

जीवनशैलीला लागलेले ग्रहण
आदिवासी भागातील जंगल म्हणजे एका अर्थाने कामधेनू मानले जायचे. घनदाट अरण्यांमध्ये निवास करताना वा शिकारीसाठी, शेतीसाठी जंगलात फिरताना कुणालाही उपाशी ठेवणार नाही एवढी ताकद या वनसंपदेत होती. काही मिळाले नाही तर जंगलात अशा प्रकारचा एक कंद उपलब्ध होता की, जो खाल्ल्यानंतर चार-पाच दिवस माणूस काहीही न खाता जिवंत राहू शकत होता. आदिवासी माणूस जोपर्यंत संपूर्णपणे या जंगलावर अवलंबून होता तोपर्यंत निसर्गाने आपल्या या पुत्राची काळजी घेतली. आजही तो घेत आहेच, पण शहरांशी आदिवासींचा संपर्क आला आणि त्यांच्या निसर्गपूरक जीवनशैलीला ग्रहण लागते आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. जो समाज आजही शहरांपासून दूर राहिला आहे, त्याला निसर्ग अद्यापही भरभरून देतोय, पण एकंदरीतच गेल्या काही वर्षांमध्ये आदिवासी समाजाचे ज्या पद्धतीने नागरीकरण होत आहे व जंगलाचा नाश हा ज्या वेगाने होत आहे, त्या त्या प्रमाणात आदिवासी समाजाची वाटचाल ही स्वावंलंबित्वाकडून परावलंबित्वाकडे होताना दिसत आहे.

– maheshkale1857@gmail.com