सह्याद्रीतील आनंदयात्रा

12222

>> महेश तेंडुलकर

काळय़ाकभिन्न कडय़ांनी वेढलेली उत्तुंग शिखरे हे तर सहय़ाद्रीचे वैशिष्टय़. घनदाट जंगलांमधून उतरत गेलेल्या खोलच खोल दऱया, भयान घळी, उंचच उंच सरळसोट सुळके, ताठ उभे उसलेले कडे, अवघड पायवाटा, घातकी वळणे, आडवळणाचे घाट, भयाण कपारी, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे आणि मृत्यूच्या जबडय़ासारख्या ‘‘आ’’ वासून बसलेल्या गुहा! हे सारं काही बघणं अन् बघून अनुभवणं यातील आनंद शब्दांमध्ये कधीच व्यक्त करता येत नाही, तो अनुभवावाच लागतो.

निसर्गाने प्रत्येक ऋतूला विशिष्ट वरदान दिलेले आहे; परंतु माणसाला तर जीवन नावाचे उत्कृष्ट दान दिले आहे. इतकं असूनही तो त्यात सतत नकारात्मक सूर लावत असतो. रणरणते उैन त्याला हैराण करते, पावसाची रिपरिप त्याचे मन उदास करते तर गारठवणारी थंडी त्याला कमालीचे आळशी बनवते. या परिस्थितीवर मात करायची असेल तर मनाची उभारी घेऊन अन् पाठीवर सॅक बांधून उन्हा-पावसाची तमा न बाळगता पर्यटनासाठी घराबाहेर पडायलाच पाहिजे. शहरापासून दूर प्रदूषणविरहित वातावरणात, निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटन करणे म्हणजे पर्यावरणाशी संवाद साधणे असते याचे भान ठेवले पाहिजे आणि त्याकरिता सहय़ाद्रीच्या दऱयाखोऱयात आवर्जून गेलेच पाहिजे.

काळय़ाकभिन्न कडय़ांनी वेढलेली उत्तुंग शिखरे हे तर सहय़ाद्रीचे वैशिष्टय़. घनदाट जंगलांमधून उतरत गेलेल्या खोलच खोल दऱया, भयान घळी, उंचच उंच सरळसोट सुळके, तुटलेले तरीही ताठ उभे उसलेले कडे, भीषण आणि तितक्याच अवघड पायवाटा, घातकी वळणे, अडचणीच्या खिंडी, बिकट चढाव, आधारशून्य घसारे, फसव्या वाटा, आडवळणाचे घाट, लांबच लांब पसरलेल्या सोंडा, भयाण कपारी, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे आणि मृत्यूच्या जबडय़ासारख्या ‘‘आ’’ वासून बसलेल्या गुहा! हे सारं काही बघणं अन् बघून अनुभवणं यातील आनंद शब्दांमध्ये कधीच व्यक्त करता येत नाही, तर तो अनुभवावाच लागतो.

सहय़ाद्रीतील पर्यटन करताना स्वतःच स्वतःकरिता नियम करायला पाहिजेत. पर्यटनाला निघण्यापूर्वी वेळेचे व प्रवासाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. त्याकरिता खासगी वाहनाचा वापर टाळून राज्य परिवहन मंडळाच्या एस.टी. गाडय़ांचा वापर केला पाहिजे. कारण खिडकीत बसून उलटय़ा दिशेने धावणारी झाडे, माणसे, प्राणी बघत अगदी निवांतपणे आवडीचे गाणे गुणगुणण्याची संधी या प्रवासात मिळते. शिवाय वेगवेगळी माणसं वाचणं याच्यासारखी दुसरी करमणूक नसते. खास करून कोकणातील पर्यटनात याचा आनंद सर्वाधिक मिळतो. तो जरूर अनुभवायला पाहिजे. त्यांची भाषा, बोलताना होणारे हातवारे, चेहऱयावरचे हावभाव, उभे राहण्याची पद्धत आणि सवयी हे सारेकाही डोळय़ांच्या कॅमेऱयात टिपायला पाहिजे. हे जर जमलं तर आपला एस.टी.मधला प्रवास हा धक्के खात केलेला प्रवास राहात नाही तर त्याची आनंदयात्रा होते.

वळणदार डांबरी रस्त्यावरून दौडत जाणारी एस.टी.गाडी आपल्या नियोजित ठिकाणी उतरवते आणि मग सुरू होते ती डोंगरयात्रा. निसर्गाची हिरवाई, आभाळाची निळाई डोळय़ांना कमालीची सुखावते. गावातील लोकांशी ओळख करून घेत त्यांच्याशी संवाद साधत त्यांची सुखदुःखं समजून घेणं हाही पर्यटनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यातून आपण कोणत्या विश्वात कसे जगतो आहोत याचे आकलन होते. गडावर जाणारी वाट समजून घेताना आपल्या शब्दासंग्रहात अगदी नकळतपणे भर पडत जाते. डोंगराला फक्त उंचीच नसते तर पोट, छाती, नाळ, माथा, शेंडी यांच्यासारखे अवयवदेखील असतात हे नव्याने समजते. पायथ्याच्या गावातील मळलेल्या पायवाटेवरून डोंगरयात्रेला सुरुवात होते. कधी खाचाखळग्यांमधून, कधी बारीक वाटेवरून तर कधी मुरमाड घसाऱयावरून आपल्या पायांची गाडी चालत असते. छातीचा भाता खालीवर करीत तर कधी कडेकपाऱयांमध्ये हातपाय गुंतवीत नराचा वानर करून गडमाथ्याकडे आगेकूच सुरूच असते. बघता बघता हिरवाईचा पट्टा गायब होऊन समोर काळा कातळकडा उभा राहतो. मग त्या कातळात खोदलेल्या पायऱयांवरून वाटचाल सुरू होते. काही अंतर पार केल्यावर त्याही गायब होतात. रॉक पॅच डोळय़ांसमोर आव्हान देत उभा राहतो. ते आव्हान स्वीकारत पुन्हा एकदा नराचा वानर करीत, कधी घाबरत, कधी बिचक तर कधी मनाचा हिय्या करीत रॉय पॅच पार केला जातो. तो पार करताना एका मुक्या प्राण्याची मात्र प्रचंड करमणूक होत असते. कडय़ावरून खाली टकामका पाहात, माणसांच्या माणूसचेष्टा बघत हा आपलाच वंशज आहे आणि तो रॉक पॅच चढून जाण्यात अजूनही इतका मागासलेला आहे, याची उत्तरे शोधत प्रश्नार्थक चेहरे करून बसलेली माकडे. कडेकपाऱयांमधून लिलया संचार करणारे आणि बागडत संचार करता करता एखाद्याच्या सॅकमधील वेफर्सचे पाकीट अलगदपणे काढून पसार होणारे आपलेच पूर्वज पाहिल्यावर मागच्या जन्मी आपण त्यांचे काही देणे लागत होतो ते सहय़ाद्रीच्या साक्षीने दिले याचे समाधान चेहऱयावर उमटल्याशिवाय राहात नाही.

रॉक पॅच पार केल्यावर पायांची गाडी गडमाथ्याकडे कूच करायला सुरुवात करते. थोडय़ाच वेळात गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाऊन पोहोचतो. इथून निसर्गसृष्टीचा अनोखा नजारा आपल्या नजरेचे पारणे फेडतो. वाऱयाच्या तालावर झुलणारी हिरवीगार वनश्री त्यांमधून वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे, दरीतून घोंघावत वाहणारे वारे, रंगीबेरंगी रानफुलांचे ताटवे हे पाहता पाहता मनावरचे ताण हलके होतात, काही क्षण होईना प्रापंचिक दुःखांचा विसर पडून मन सुखावते. हे सारंकाही बघत, कॅमेऱयात दृश्य टिपत नकळतपणे संत कबीराच्या दोहय़ातील एक ओळ मनाची तार छेडून जाते. ‘‘ना घर मेरा, ना घर तेरा, दुनिया रैन बसेरा’’. खरोखरच असा आनंद, असा अनुभव गाठीशी बांधायचा असेल तर सहय़ाद्रीसारखी दुसरी जागा नाही.

सहय़ाद्रीच्या साक्षीने केलेले निसर्गदर्शन आपल्या पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करते. मनाला उभारी देते अन् जगण्याचा दृष्टिकोन देते. मनसोक्त निसर्गदर्शनाने पोट भरल्यावर मनात परतीचे विचार सुरू होतात. जाणाऱया वाटेला परतीचा शाप आहे आणि काळ अनंत आहे ही शुद्ध थाप आहे! या वाक्याचा खऱया अर्थाने उलगडा होतो. मग पुन्हा एकदा कसरत करीत कधी दरीकडे पाठ करीत तर कधी तोंड करीत पायांची गाडी उतरू लागते. आज आपण काहीतरी मिळवलं, आगळंवेगळं जगावेगळं साहस करून गड सर केला याचा आनंद चेहऱयावरून ओसंडून वाहात असतो. हळूहळू पायांची गाडी उतरून डांबरी रस्त्यावर जाऊन उभी राहते. त्यामुळे ज्यांना साहस करण्याची दांडगी हौस असेल, स्वतःच्या क्षमता ओळखायच्या असतील, निसर्गातील थ्रिल एन्जॉय करायचे असेल, रडता रडता चेहरा हसरा करण्याची कला साध्य करायची असेल आणि जीवनात काही थ्रिल असावं वाटत असेल तर सहय़ाद्रीसारखी दुसरी जागा नाही अन् पर्यटनाशिवाय दुसरा पर्यायदेखील नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या