
>> मलिका अमरशेख
हिमालय, जंगल यात जावेसे वाटणे ही एक पूर्वपरंपरा आहे. आपले पूर्वज बोलावतात, पर्वतातून, पुराणातून, कथांतून, झऱ्या-नद्यांतून, धबधब्याच्या अमोघ आवेगी वर्षावातून, मुसळधार पावसातून ते बोलावतात, हाक मारतात आपल्याला. मग ज्यांच्या संवेदना जागृत असतात असे जातात. ती साद खोटी नसते, ती खरीच असते. निसर्गाची हाक ही सनातन, आदिम अध्यात्माचीच हाक असते आणि ती तो हरक्षणी आपल्या बालकांना, मानवाला, प्राणिमात्राला, चराचराला घालत असतो. ऐकणारे क्वचितच. हेच दुःखय!
आठवतंय का? कधी भेटला होता स्वतःला, निसर्गाला? पूर्ण निरभ्र आकाश… उगवता सूर्य… उगवता चंद्र. चांदण्या आकाशातल्या.. तान्ह्याच्या डोळ्यातल्या… प्रेयसीच्या मंद पदरावर चमचमणाऱ्या… उडणारे काजवे… सागराची गाज… हरणाचे न् गाईचे डोळे… वाघाची थरकाप भरवणारी गर्जना, गर्द जंगल… लाल मातीची पायवाट… असंख्य रंगांनी झिलमिलणारी फुलपाखरं न् फुलं… या साऱ्यात तुम्ही नसता? न् तो सर्वांभूती ईश, विठ्ठल किंवा कुणी कुणीच दिसत नाही का? अध्यात्म अजून काय वेगळं असतं का? देह, मन, विचार न् निसर्ग यापल्याड काय असतं? ‘अहम् ब्रह्मास्मी’! ब्रह्म माझ्यात आहे… पूर्ण विश्व माझ्यात आहे…
वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर पृथ्वीवर जितके पाणी आहे तितकेच ते आपल्या त्या पटीने शरीरात असते. पंचमहाभूतांची तत्त्वं पण आपल्यातच असतात. आपण दुसऱ्याला पुजतो, भजतो, जेव्हा की, ती सर्व तत्त्वं आपल्यातच असतात.
निरामय अध्यात्म हा एक स्वतंत्र वेगळा अध्याय. निसर्गाकडे, स्वतःच्या मूलभूत तत्त्वाकडे ही वाट जाते. निसर्गाचा स्वतःचा नियम, कायदे आहेत, व्यवस्था आहे, ज्यात जात, पात, लिंग, धर्म, राष्ट्र हे काहीच नाही. निरामय. त्याला जाणणारे त्याला मानणारे प्राणी हे त्यांच्या जगातले वारकरीच आहेत. वाघ वाघासारखा राहतो, पक्षी पक्ष्यांसारखे राहतात. ते निसर्गाच्या नियमांना अनुसरतात. कावळे काय, हत्तीही आपल्याला मृतवत क्वचितच दिसतात. असे म्हणतात, त्यांना निसर्गाचे संकेत कळतात, मृत्यूचेही! ते मृत्युकाळ जवळ आला की, एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन मरतात. सुनामी आली तेव्हाही त्याआधी खूप जनावरे टेकडी, पर्वत याकडे धावत गेल्याचे व्हिडीओ व्हायरल झालेत.
… तर पहा, वेगळ्या दृष्टीने पाहिले की, सगळे व्याप जास्त माणसालाच असतात.
आजाराचे प्रकार खोकला, सर्दीपासून कॅन्सर हे रोग फक्त माणसालाच आहेत. शिंकणारा पक्षी किंवा खोकणारा कुत्रा, वाघ मी अजून पण पाहिला नाही.
तद्वत गे…समलैंगिकत्व वा इतर असे हे मानवी व्यवहार हे पण प्राण्यात दिसत नाहीत. याची कारणे शोधली आहेत का कुणी? की मानवीयता ही कन्सेप्ट फक्त मानवांसाठीच लागू आहे? प्राणिमात्रांसाठी नाही?
वस्तुतः आताच्या शोधप्रबंधानुसार जगातल्या 4 लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कारण त्यांचे अधिवास नष्ट झालेत आणि निसर्गाच्या सायकल- रिसायकलमध्ये मानव फार मोठ्या प्रमाणात अधिक्षेप करत आहे. आता याला कोण थांबवणार?
आपण विकासाच्या मागे लागतोय की विनाशाच्या? मंदिर बांधणे, कुंभमेळा भरवणे, राजकीय रणधुमाळ्या यात आपण आपल्या सर्वनाशाचा पाया रचतोय याचे भान कुणालाच नाही.
आपली अध्यात्माची व्याख्या काय? धर्माची व्याख्या काय आहे? मानवीयतेची व्याख्या काय आहे? ती जर सर्वसमावेशक नसली तर उद्या हे सांगायला पण आपण जिवंत नसू हे सांगायला नॉट्रडॅमस नकोय!
आपण निसर्गाला वजा केलेय, प्राण्यांना, वृक्षांना वजा केलेय, जेव्हा की महासंत तुकाराम म्हणून गेलेत, ‘‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी.’’ त्यांनी वृक्षवल्लींना नातलग, आप्त म्हटले होते न् आता आम्ही विकासासाठी (?) त्यांना काटून छाटून नष्ट करतोय!
पहा, पहिल्यापासून रामदास तर पळालेच होते, पण तुकाराम, बुद्ध सर्वच तत्त्वज्ञ, संत, ऋषीमुनी विचार करायला, तपस्या करायला जंगलात जायचे! का? कारण बाकीच्या व्यवधानांपासून मोकळे होणार तरच ना विचार करता येणार! निसर्गाच्या सान्निध्यात, झाडांच्या हिरव्यागार मांडीवर बसून सकारात्मकच ऊर्जा येणार!
अगदी आजही काही न कळताही हिमालयात जाणारे महाभाग आहेत, जे अध्यात्म नावाच्या दुकानांवर जगतात. ती वेगळी गोष्ट. पण हिमालय, जंगल यात जावेसे वाटणे ही एक पूर्वपरंपरा आहे. आपले पूर्वज बोलावतात, पर्वतातून, पुराणातून, कथांतून, झऱ्या-नद्यांतून, धबधब्याच्या अमोघ आवेगी वर्षावातून, मुसळधार पावसातून ते बोलावतात, हाक मारतात आपल्याला. मग ज्यांच्या संवेदना जागृत असतात असे जातात. ज्यांना वेगळे स्वार्थ असतात असे जातच असतात, पण ती साद खोटी नसते, ती खरीच असते. एक खूप जुनी म्हण आहे… ‘हजारो शिपाई एका रणभेरीवर पावलं टाकत असतात तेव्हा एखाद्याचीच पावलं वेगळी पडतात. त्याचा अर्थ असा नाही, तो चुकलाय तर तो कदाचित वेगळीच रणदुदुंभी ऐकत असेल!’
…तर निसर्गाची हाक ही सनातन, आदिम अध्यात्माचीच हाक असते आणि ती तो हरक्षणी आपल्या बालकांना, मानवाला, प्राणिमात्राला, चराचराला घालत असतो. ऐकणारे क्वचितच. हेच दुःखय!



























































