
>> ममता क्षेमकल्याणी
आजचे तरुण हे केवळ भौतिक सुखाला महत्त्व देतात आणि त्यांच्या सामाजिक जाणिवा बोथट आहेत, अशी ओरड नेहमीच ऐकायला मिळते. मात्र, आपल्याला मिळालेल्या सुखवस्तू आयुष्याला बाजूला सारून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, वंचितांच्या शिक्षणासाठी स्नेहाचे वन निर्माण करणारे अशोक देशमाने यांचे जीवन इतरांना निश्चितच प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या स्नेहवनविषयी….
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मंगरूळ या छोट्याशा खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अशोक देशमाने यांचे शिक्षण इतरांच्या मदतीने पूर्ण झाले. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सॉफ्टवेअर इंजिनीअर झालेल्या अशोक यांना पुण्यातील एका कंपनीत दर महिना पाच आकडी पगाराची नोकरीदेखील मिळाली. कालपरत्वे या पगारात वाढ होऊन तो महिन्याला सहा आकडी व्हायलादेखील फारसा वेळ लागला नसता, मात्र शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा, गरिबीचं जीवन, खेड्यापाड्यांतील अडचणी, शिक्षणाचा हात अर्ध्यावर सोडणारी मुलं आणि अर्धपोटी जेवणारे गावकरी या सगळ्यांच्या आठवणीने शहरात राहूनदेखील अशोक यांचे मन कायम गावाकडे धाव घ्यायचे. स्वामी विवेकानंद आणि बाबा आमटे यांच्या विचारकार्याने प्रेरित होऊन सुरुवातीला स्वतःच्या पगारातील दहा टक्के भाग ते इतरांच्या मदतीसाठी काढून ठेवायचे. शनिवारी आणि रविवारी मिळणाऱ्या सुट्टीचा सदुपयोग म्हणून गरीब घरातील मुलांना शिकवायला सुरुवात केली. दरम्यान, 2012 ते 2015 अशी सलग चार वर्षे मराठवाड्यात खूपच दुष्काळ पडला, पण पुण्या-मुंबईत या दुष्काळाची क्वचित फक्त चर्चा होते आणि ठरलेल्या तारखेला पगाराची रक्कम प्रत्येकाच्या खात्यात जमा होऊन जो तो आपल्या आनंदी जीवनात रममाण होतो, या वास्तवाने अशोक जास्तच अस्वस्थ झाले. ही परिस्थिती बदलण्यासाठी दुसरं कोणीतरी पुढे येईल याची वाट न पाहता अशोक यांनी ‘स्नेहवन’ हा सामाजिक प्रकल्प 2015 मध्ये पुणे येथे सुरू केला. सुरुवातीला नोकरीत रात्रपाळी करून दिवसभर संस्थेचे काम करायचे अशी कसरत त्यांनी जवळपास नऊ महिने केली, पण अखेर 2016 मध्ये नोकरी सोडून पुढचं संपूर्ण आयुष्य ‘स्नेहवन’ या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, ऊसतोड कामगार, शेतमजूर यांच्या मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी वाहून घेण्याचा वसा त्यांनी घेतला. 18 मुलांपासून सुरू झालेलं हे रोपटं आज 50 मुलांना आपल्या मायेच्या सावलीत वाढवत आहे. या निवासी 50 मुलांबरोबर परिसरातील सुमारे 110 मुले संस्थेतील कौशल्य विकास उपक्रमांचा लाभ घेत आहेत.
सुरुवातीला अशोक यांच्या पालकांनी हे काम सुरू करण्यासंदर्भात केलेला विरोध हळूहळू मावळला आणि आई-वडील दोघांनीही या कार्यात अशोकच्या मदतीसाठी स्वतःला समर्पित केले आहे. ‘आयुष्यभर कोणतीही तक्रार करणार नाही’, या अटीवर अर्चना यांनी अशोक यांच्याशी विवाह करून ‘स्नेहवन’च्या मुलांना आईची माया देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मुलांचा संपूर्ण स्वयंपाक करणे, मुलांचा अभ्यास घेणे, आजारपण या सगळ्या गोष्टी त्या आई होऊन आनंदाने निभावतात. त्यांची तीन वर्षांची कन्या आनंदीदेखील ‘स्नेहवन’च्या सर्व भावंडांत खऱ्या अर्थाने एकरूप झाली आहे.
सुरुवातीला पुण्यातील भोसरी येथे एका भाड्याच्या घरातील संसारात तीस मुलांचा सांभाळ करणारे अशोक आणि अर्चना यांच्या ध्येयवेडय़ा प्रवासाला डॉ. रवींद्र आणि स्मिता कुलकर्णी या दांपत्याने मोलाची साथ दिली. त्यांनी खेड तालुक्यातील त्यांची दोन एकर जागा स्नेहवनला दान केली असून आज तिथे ‘स्नेहवन’चे अनेक प्रकल्प सुरू आहेत. येथे त्यांनी स्वामी विवेकानंद ज्ञानालय, कामधेनू गोशाला, ग्रंथालय, संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी अनेक अडचणींतून मार्ग काढत, संकटांचा सामना करत हा ज्ञानयज्ञ सुरू आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांच्या 50 मुलांचा निवास, भोजन, शिक्षण, संगोपन व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी ‘स्नेहवन’मध्ये घेतली जाते. ‘स्नेहवन’मध्ये सुसज्ज असे संगणक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले असून ज्यात 150 मुलामुलींना मोफत संगणक प्रशिक्षण दिले जाते. वाचन संस्कृती टिकून राहावी यासाठी दहा हजार पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय, जे सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे. ‘स्नेहवन’तर्फे कामधेनू गोशाळा उभारण्यात आली असून देशी गीर गाईंचे संगोपन आणि गोसेवा केली जाते. सध्या सहा गाई आणि वासरे येथे आहेत. ‘स्नेहवन’मधील मुलांनी शिक्षण घेताना केवळ स्वतःच्या मर्यादित रोजगाराचा विचार करू नये, तर त्यांच्या शिक्षणाचा इतरांना उपयोग होईल यासाठी त्यांना विविध कौशल्ये शिकवली जातात. यासाठी स्नेहवनने कौशल्य विकास केंद्र निर्माण केले आहे. मुलांनी शिक्षण घेऊन उद्योजक बनावे, इतरांसाठी रोजगार निर्माण करावेत असे अशोक यांना वाटते. बालपणापासून मुलांच्या मनावर उद्योगाचे धडे बिंबवण्यासाठी त्यांना शेतीशी निगडित उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते. तेल, डाळी, पापड, लोणची अशा शेतीपूरक उद्योगाला चालना देण्यासाठी हे केंद्र कार्यान्वित आहे.
‘स्नेहवन’ ही संस्था संपूर्ण सौर ऊर्जेवर चालते. संस्थेसाठी लागणारी संपूर्ण वीज सौर ऊर्जेतून तयार केली आहे, तर स्वयंपाकासाठी लागणारा संपूर्ण गॅस ‘स्नेहवन’मधील मुलेच बनवतात. दिवसाला तीन हजार लिटर गॅस तयार होतो. औपचारिक शिक्षणाबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देऊन त्यांना एक आदर्श तरुण बनविण्यासाठी ‘स्नेहवन’ काम करते. योगा, संगीत, कुकिंग, शेती, डेअरी फार्मिंग असे अनेक प्रकारचे प्रशिक्षण येथे दिले जाते. त्याचबरोबर अकाऊंटिंग, प्रशासन, व्यवस्थापन यांचे धडेदेखील मुलांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दिले जाते.
याचबरोबर ‘स्नेहवन’ने ज्ञानछत्र या उपक्रमाच्या माध्यमातून आळंदीजवळील ठाकरवाडी या आदिवासी पाड्यावरील मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी हे मोठे पाऊल आहे. तसेच त्यांना दर महिन्याला रेशनही दिले जाते. भोसरीतील भीक मागणाऱया, भंगार जमा करणाऱ्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून त्यांची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी वंचित ग्राम उपक्रमांतर्गत घेतली जाते, तर ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी साखर शाळादेखील कार्यरत आहे. वंचित घटकातील बांधवांसाठी मोफत फिरता दवाखाना हे ‘स्नेहवन’च्या कार्याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणावे लागेल. कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय खडतर परिस्थितीतून हा ज्ञानयज्ञ चालू आहे. गेल्या साधारण दोन वर्षांत कोरोना काळामुळे संस्थेकडे येणारा मदतीचा ओघ जवळपास पूर्णपणे थांबला आहे. अशा परिस्थितीत या कार्यासाठी आपल्या मदतीचा एक हात निश्चितच मोलाचा ठरू शकतो.
संपर्क अशोक देशमाने ‘स्नेहवन’
www.snehwan.in [email protected]





























































