कोर्लई किल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगल गोगटे

अलिबाग ते रेवदंडा हा लहानसा रस्ता. दोन्ही बाजूंनी घरं आणि हिरव्या वाड्या यांची रांगोळी असलेला आहे. रेवदंडय़ातून जाताना तिथल्या जुन्या किल्ल्याच्या भिंती ओलांडून गेलं की रेवदंडा खाडीवरचा (पुंडलिका नदी) पूल दिसतो. तिथपासून त्या पुढचा बराच रस्ता एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला डोंगर असा सुंदर आहे.

येथून पुढे जाताना साधारण 2-3 कि.मी.वर उजव्या हाताला एक डोंगर दिसतो. हा रायगड जिह्याच्या मुरूड तालुक्यात येतो. त्यावरील तटबंदीमुळे तो काहीसा वेगळा वाटतो. पूर्वी तो पोर्तुगीजांच्या चौल वसाहतीत होता. त्याला तेव्हा मोरो अथवा पॅसल कर्लू म्हणत. पोर्तुगीजमध्ये याला ‘फोर्टलेझा द मोरो दे चौल’ असं संबोधित असत. नीट पाहिल्यावर लक्षात येतं की, हा तटबंदीचा युरोपीयन पद्धतीचा किल्ला आहे जो चौलच्या किल्ल्याला सखा म्हणून लाभला. पोर्तुगीज वसाहतींचे त्यांचे बांधकाम विशेष याच्या बांधणीतही दिसून येते. आता मात्र याची खूप पडझड झाली आहे. ‘मोरो द चौल’ या बेटावर हा किल्ला बांधला गेला, ज्यामुळे रेवदंडा खाडीची सुरक्षा केली जाते. कोर्लई ते दमण हे पोर्तुगीजांचं राज्य सांभाळण्याच्या दृष्टीनेही ही जागा महत्त्वाची होती.

पोर्तुगीजांच्या वसाहतीच्या वा राहण्याच्या खुणा म्हणून येथील खेड्यातील लोक (सुमारे 1000) जे लुसो – इंडियन क्रिओल आहेत ते क्रिस्टी (वा कोर्लई क्रिओल पोर्तुगीज) भाषा बोलतात. ही त्यांची अजूनही खासियत आहे. या कारणाने अनेक भाषा तज्ञ इथे भेट देतात. या लोकांचा रोमन पॅथॉलिक धर्माशी जवळचा संबंध आहे. या भाषेचा संबंध सुमारे सन 1500 च्या जवळ पोचतो.

कोर्लई किल्ला पोर्तुगीजांनी 1521 मध्ये नगर राजवटीच्या परवानगीने बांधला व नंतर बुऱहान निजामच्या मृत्यूपश्चात झालेल्या गोंधळाचा फायदा घेत तो ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, परंतु नगरच्या राजवटीने त्यांचे उत्तम लढवय्ये पाठवून त्याला विरोध केला. त्यानंतर युद्धविराम झाला. किल्ल्याचा ताबा नगर राजवटीने घेतला आणि बेटावरची तटबंदी बांधणं बंद झालं. बेटावर शेवटी राहिला तो फक्त एक लाकडी क्रॉस.

1594 मध्ये एका पोर्तुगीज कप्तानाने 1500 सैनिक आणि 1500 स्थानिक लोक बरोबर घेऊन किल्ल्याचा ताबा घेतला. नगर राजवटीच्या लोकांनी मुख्य दरवाजात मेलेला हत्ती टाकून आणि आतल्या दरवाजात मेलेला घोडा टाकून त्यांना अडवायचा प्रयत्न केला, पण शेवटी त्यांना शरण जावं लागलं. पोर्तुगिजांनी किल्ला सर केला खरा, परंतु तिथे रक्षक म्हणून ठेवायला त्यांच्याकडे पुरेसे सैनिक नसल्याने त्यांनी किल्ल्याची तोडमोड केली. यातून फक्त एक टॉवर आणि तोफा वाचले.

या विध्वंसाआधी काही प्रवाशांनी या किल्ल्याचं ‘जगातील कोणत्याही किल्ल्याइतका भव्य आणि मजबूत किल्ला’ असं वर्णन केल्याचं आढळतं. फक्त जमिनीवरूनच या किल्ल्यावर हल्ला होऊ शकत होता तर तिथे एक खोल खड्डा होता आणि जरूर तेव्हा खाली वर करता येण्यासारख्या झुलत्या पुलाच्या सोयीनेच तो ओलांडता येत होता. मुख्य प्रवेश दरवाजा एका कांस्य सिंहाने तर मोठा टॉवर एका कांस्य गरूडाने संरक्षित केला होता. आत 7000 घोडे आणि साधारण तेवढीच माणसं होती.

आजही कोर्लई किल्ला पाहण्यासाठी आपल्याला कोर्लई गावातून व तिथल्या कोळीवाडय़ातून जावे लागतं. दक्षिण बाजूने हा जमिनीशी सांधला गेला आहे व दक्षिणोत्तर सुमारे हजार फूट पसरलेला आहे. किल्ल्यात एक गोड्या पाण्याची विहीर आहे. तसेच एक मंदिर व चर्चही आहे. पायथ्याशी समुद्रास खेटून एक जुनं दीपगृह आहे.

क्रिस्टी भाषा ऐकण्यासाठी, पोर्तुगीज राज्याच्या (जे ब्रिटिशांच्या आधी 150 वर्षांपासून इथे होते) खुणा पाहण्यासाठी व सुंदर समुद्र अनुभवण्यासाठी, वाट किंचितशी वाकडी करावी लागते एवढंच.

[email protected]