ललित – करिअप्पा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश उदगीरकर

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

‘सामान्य खासगी नोकरीत असताना तिची कसलीही शाश्वती नसताना ताठ मानेने, बेपर्वा, कुणाचाही मुलाहिजा न राखता आपले काम शांतपणे, पण चोख करणारा’ या व्याख्येत बसणारा फटकळ माणूस म्हणजे करिअप्पा ! माझ्या कॉलेज जीवनात मी आमच्या हॉटेलमध्ये काम करायचो. हॉटेलच्या तीन मालकांपैकी मी एक ! नोकरसंख्या दहा बारा, त्यातला दाक्षिणात्य पदार्थ बनवणारा करिअप्पा. हॉटेलचे किचन आयताकृती होते. बऱयापैकी मोठे होते. त्यातला एक चतुर्थांश भाग करिअप्पाच्या अधिपत्याखाली होता. तिथली मोठी भट्टी, त्यावरचा प्रचंड तवा, चटण्या, मसाले यांचे वाटण करण्यासाठी तव्याशी स्पर्धा करणारा अवाढव्य खलबत्ता. बत्त्याला लाकडी मूठ असायची. एका शेल्फात तिखट,मीठ,हळद, मसाले यांचे डबे नीटसपणे मांडलेले असत. किचनच्या तेवढय़ा भागात लखलखीत स्वच्छता ठेवलेली असायची. तेवढय़ा भागात कुणालाही प्रवेश निषिद्ध असायचा. अगदी मालकांनाही ! भल्या पहाटे करिअप्पा स्वच्छ स्नान करून पंचावर येऊन कामाला लागायचा तो रात्रीपर्यंत !

उंची पाच फुटांवर…चार ते पाच इंच. वर्ण काळा कुळकुळीत, सडसडीत चण, गालाची हाडे दिसण्यापर्यंत त्वचा ताणून बसलेली. अंगात कायम गुंडाळलेली लुंगी, बिनबाह्याचे बनियन, खांद्यावर पंचा…बस ! तेही अत्यंत स्वच्छ. डोक्यावर तुरळक केस भरपूर तेल लावून चोपून बसवलेले. अत्यंत अबोल, पण तोंड उघडले की, लाल मिरच्यांची कडकडीत पह्डणी दिल्यासारखे तिखट बोलणे! याला मालक लोकच दबकून असायचे, तिथे बाकीच्यांची काय प्राज्ञा ? तेलुगू लेहजात हिंदी बोलायचा, पण एक खासीयत होती, याच्या हाताला विलक्षण चव होती. गिऱहाईकांचा अचूक अंदाज असायचा. याच्या हातचा पदार्थ वाया गेलेला आम्ही कधी पाहिला नाही. पहाटे उठून तो त्या खलबत्त्यात चटणी तयार करायचा. त्याचे हडकुळे, पण काटक हात सफाईने चालायचे. त्या चटणीचा वास मला फार आवडायचा. सांबारचा वास जो दरवळायचा त्याला तोड नसायची. शुभ्र स्पंजी इडल्या आणि बाळसेदार मोठय़ा आकाराचे कुरकुरीत वडे तोच करू जाणे. आमच्यापैकी कुणी त्याला बोलण्याच्या फंदात पडत नसले तरी मी कधी कधी त्याच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करायचो.

‘क्युं ? आज कोलेस नै क्या ? कोलेस जाव!’
‘आज छुट्टी है, करू क्या?’ तो मूडमध्ये असला की, माझ्याकडे बघायचा आणि हसत परवानगी द्यायचा. मी खलबत्त्यावर बसायचो. माझ्याने तो बत्ता हलता हलायचा नाही. तो जवळ यायचा.
‘करिअप्पा, दोसा बनाऊ क्या ?’
‘बनाव !’

तो वाटी सहज फिरवून पातळ, कडक खरपूस दोसा तयार करायचा. त्याची दोशाची भाजी, सांबर, इडली, वडा, उपमा, शिरा हे पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. आमच्या शेजारीच धो-धो चालणारे उडुपी हॉटेल होते. त्याचे मालक आठवडय़ाला एकदा सहज म्हणून आमच्या हॉटेलमध्ये येत आणि पोटभर नाश्ता करून जात! आम्हाला आश्चर्य वाटायचं, पण एकदा त्यांनीच खुलासा केला, ‘आपका सांबार और चटनी खाये तो मुझे मेरे घर की, मुलूक की याद आती है!’

करिअप्पा म्हणजे आमच्या हॉटेलचे भूषण होते. अख्ख्या लातुरात त्याला तोड नव्हती. त्याला आपल्याकडे ओढण्याचे इतर हॉटेल मालकांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. ‘मई सिर्फ यहा काम करताइ और करूंगा! जिस दिन मालक जानेको बोलेगा उस दिन सिदा मुलूक जायगा!’ असं तो ठणकावून सांगायचा. एरवी आम्हा मालक लोकांसमोर तुसडेपणाने बोलणाऱया, वागणाऱया करिअप्पामध्ये त्याने त्याच्यापरीने जपून ठेवलेला आपलेपणा अशा वेळी प्रकट व्हायचा. आमचे ज्येष्ठ बंधू प्रभाकरराव म्हणजे मुख्य मालक! पण तेही वर्षाकाठी दोन-चार वाक्यांपलीकडे त्याच्याशी बोलत नसत. त्यातल्या त्यात त्याच्याशी जवळीक साधणारा मीच होतो! पहिल्यांदा माझ्याशी फटकारून बोलणारा करिअप्पा नंतर नंतर माझ्याशी बोलताना नरम पडत गेला! मी किचनमध्ये गेलो की, ‘चलो, उत्तप्पा डालो’ म्हणून ऑर्डर सोडायला लागला!

असा हा करिअप्पा! हाताला देवदुर्लभ चव असूनही त्याला त्याचा गर्व नव्हता. ‘ नेकी कर दर्या मे डाल’ अशा अलिप्त वृत्तीने तो वावरला. त्याचे व्यक्तिमत्त्व आमच्या हॉटेलपुरतेच बंदिस्त होऊन राहिले. लुंगी, बनियन, खांद्यावरचा पंचा याशिवाय त्याला दुसऱया कपडय़ात कुणी पाहिले नाही. त्याच्या खासगी जीवनाची कुणालाच माहिती नसावी याचे आश्चर्य वाटते. सुखदुःख वाटून घ्यायला याला कुणी जवळचा मित्र असल्याचे कधी दिसले नाही. आपले काम भले आणि आपण भले अशा निर्लेप वृत्तीने, ताठ मानेने हा जगत राहिला. हॉटेलमध्ये जसा आला तसा केव्हातरी निघूनही गेला. आता याला कितीतरी वर्षे लोटली, पण अजूनही हा अबोल कर्मयोगी आठवणींमध्ये येऊन आपले अस्तित्व अबाधित ठेवून जातो हे मात्र खरं!

– [email protected]