ठसा – पं. प्रभाकर जोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेधा पालकर

व्हायोलिन वाद्यातून सर्व प्रकारचे भाव निर्माण करता येतात. मधूर, रौद्र, भय असे नवरस वाजवता येतात असे सांगणारे आणि व्हायोलिनवर सुरांना मनसोक्त खेळविणारे ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक पं. प्रभाकर जोग यांचे निधन चटका लावून गेले. त्यांच्या गाणारं व्हायोलिनमधून ते अजरामर आहेत. प्रभाकर जोग यांचे वडील साखर कारखान्यांच्या तंत्रज्ञानातील जाणकार होते. आई-वडिलांपैकी कोणी कलेच्या प्रांतात नव्हते, मात्र वडिलांना संगीत नाटकांची पहिल्यापासून आवड होती. बालगंधर्व यांचे नाटक पुण्यात आले की, वडील सायकलवरून बारा किलोमीटरची रपेट करून पुण्यात येत असत. रात्रभर नाटक पाहून परतीची सायकलवारी करून पुन्हा दुसऱया दिवशी कामावर हजर राहत. संगीतकलेची ही आवड प्रभाकर जोग यांच्यातही उतरली. त्यांनी गजाननराव जोशी आणि नाराणराव मारुलीकर यांच्याकडून वयाच्या पाचव्या वर्षापासून गायन शिकायला सुरुवात केली. प्रभाकर जोग यांची मोठय़ा आकारमानाच्या व्हायोलिनशी चाललेली झटापट पाहून त्यांच्या आजीने त्यांना अडीचशे रुपयांचे एक छोटे व्हायोलिन आणून दिले. प्रभाकर जोग या वाद्यावर हळूहळू प्रभुत्व मिळवत गेले. प्रभाकर जोग यांचे भाऊ वामनराव जोग हे आकाशवाणीवर व्हायोलिनवादक म्हणून नोकरी करत आणि घरी व्हायोलिनचे वर्ग घेत. वयाच्या बाराव्या वर्षी प्रभाकर जोग यांनी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाडय़ांमधून त्यांनी सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मैदानापलीकडे राहणाऱया सुधीर फडके यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोग यांना भेटायला बोलावले. पुढे ते सुधीर फडके यांचे सहाय्यक झाले. ‘गीतरामायण’च्या सुमारे 500 कार्यक्रमांना प्रभाकर जोग यांची साथ होती. स्नेहल भाटकर यांच्याकडे जोग यांनी ‘गुरुदेवदत्त’ या 1951 च्या चित्रपटात व्हायोलिन वादन केले. स्वरलिपी लेखनकलेत पारंगत असलेले प्रभाकर जोग त्यानंतर संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, पं. हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम आणि यशवंत देव यांच्याबरोबर काम करू लागले. 1952 साली प्रभाकर जोग हिंदी चित्रपसृष्टीत साँग व्हायोलिनिस्ट् म्हणून दाखल झाले. रोशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राहुल देव बर्मन या संगीत दिग्दर्शकांकडून त्यांना बोलावणी येऊ लागली. प्रभाकर जोग यांनी मराठी चित्रपट, ग्रामोफोन कंपन्या, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्यासाठी संगीताच्या सुरावटी रचल्या. प्रभाकर जोगांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात. त्यामुळे त्यांचे व्हायोलिन ‘गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जात असे. प्रभाकर जोग यांनी गाण्याला भावप्रधान करताना व्हायोलिनचा सुंदर वापर केला. ‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून जोग हे स्वतंत्र गीतकार म्हणून महाराष्ट्राला परिचित झाले. ‘जावई माझा भला’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. त्यांनी एकूण 22 चित्रपटांना संगीत दिले. ‘गाणारे व्हायोलिन’ आणि ‘गाता रहे मेरा व्हायोलिन’ या त्यांच्या व्हायोलिन गीतांच्या व्हीसीडी रसिकांच्या पसंतीस उतरल्या. ‘स्वर आले दुरूनी’,’तेच स्वप्न लोचनात’,’बाजार फुलांचा भरला’,’हे चांदणे फुलांनी’,’सोनियाचा पाळणा’, ‘सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का’,’आला वसंत ऋतू आला’ ही जोग यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली. व्हायोलिनला ‘किंग ऑफ ऑर्केस्ट्रा’ असे म्हणतात हे सांगताना प्रभाकर जोग यांनी खूप छान सांगितलं होतं, ते म्हणाले, या वाद्यातून सर्व प्रकारचे भाव निर्माण करता येतात. मधुर, रौद्र, भय इत्यादी नवरस वाजवता येतात. शाळेत एसएससी होईपर्यंत मी भावगीतांच्या अनेक मैफलींना व्हायोलिन वाजवून साथसंगत केली. नावडीकरांबरोबरच मालती पांडे, कालिंदी केसकर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजांचे संस्कार माझ्या वादनावर झाले. यासाठी आपण वाजवतो ते गाणं केवळ सुरात वाजवून भागत नाही. ते गाणं अधिक प्रभावी होण्यासाठी त्यातले शब्द व गाण्यातले भाव या दोन्हींचा त्यात मिलाफ असायला हवा. यासाठी त्या गाण्याची नोटेशन व्यवस्थित करताना ती पाठही असली तर ही किमया साध्य होऊ शकते. पु. ल. देशपांडे यांनी माझे ‘पराधीन आहे जगती’ हे गीतरामायणातील गाणे ऐकून त्यावर भाष्य केले तेव्हा याची प्रचीती आली. पुलं तेव्हा म्हणाले होते की, ‘माणूस एखादे वेळी पराधीन होऊन जातो, पण त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन, की तो नुसताच पराधीन नसतो, तर स्वराधीनही असतो!’ मी वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासूनच व्हायोलिन शिकण्याचा प्रयत्न करत होतो. बंधूकडे रियाजातून मला व्हायोलिन वादनात पुढे अधिक गती प्राप्त होत गेली. त्यावेळच्या भावगीत गायनाच्या काळात मग मी बबनराव नावडीकर यांना व्हायोलिनवर साथसंगत करू लागलो. ‘गाणारं व्हायोलिन’ हे बिरूद मिळण्याचे यश माझ्या संगीतविषयक विचारांमधून तसेच त्यासाठी घेतलेल्या कष्टांमुळेच साध्य झाले. प्रभाकर जोग यांच्या निधनाने व्हायोलिनचे सूरच जणू मुके झाले आहेत.