
>> मोहन गोसावी
कोल्हापूर येथे 14 ते 16 जानेवारी या कालावधीत पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन आयोजित होत आहे. संमेलनाचे अध्यक्षीय पद केंद्रीय कंपनी लवादाचे सदस्य न्यायमूर्ती ह.भ.प. मदन महाराज गोसावी भूषविणार आहेत. आजवर अखिल भारतीय साहित्य संमेलन ग्रामीण साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन, कामगार साहित्य संमेलन, लोकसाहित्य संमेलन अशी अनेक संमेलने सातत्याने आयोजित होत असतात. पण केवळ महाराष्ट्र अथवा देश नव्हे, तर संपूर्ण जगातील विविध धर्म, पंथ, उपपंथ यांच्या संप्रदायांचा वेध घेणारे तसेच सर्व धर्माच्या संतांच्या विचारांचा वेध घेणारे हे संमेलन आहे. पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे हे आहेत.
शक्ती देवतेच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे शक्ती पीठ म्हणजे करवीरनगरीची श्री महालक्ष्मी अंबाबाई. या अंबाबाईच्या आशीर्वादाने आणि लोककल्याणकारी जाणता राजा छत्रपती शाहू महाराज यांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापूर या नगरीमध्ये पाहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन आयोजित होत आहे. हे पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन एका वेगळ्या पार्श्वभूमीवर आयोजित होत आहे. संपूर्ण जगताला कोरोना आणि त्याच्या अनेक अवतारांनी ग्रासले आहे. समाजमन अस्वस्थ आहे, असुरक्षित आहे, दोलायमान आहे, चिंतातुर आहे. या चिंताग्रस्त वातावरणात शाश्वत, चिरंजीव संत विचारच तारणहार ठरणार आहेत. आजचे वर्तमान अस्वस्थ आहे हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. कोरोनाने आपल्याला अस्वस्थता दिली, असुरक्षितता दिली आणि सोबतच मनुष्य धर्माची जाणीवही दिली म्हणून आपण या काळात सामाजिक विलगीकरणाचे नियम पाळूनही मनाने एकत्र आलो. ‘एकमेकांस सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ ही जाणीव कोरोनाने वाढीस लावली. त्यामुळे हजारो, लाखो हात अन्नदान, रक्तदान, औषधदान या गोष्टींसाठी पुढे आले. यासाठी कीर्तन सप्ताह, प्रवचन, यज्ञाची गरज भासली नाही, कारण कीर्तन, प्रवचनाचे संस्कार आपल्या अंगी पिढय़ान्पिढय़ा बाणलेले आहेत. अहो! आपण सारे कामधेनूची खिल्लारे आहोत. ज्ञानोबा, नामदेव, तुकोबा, एकनाथ, गोरोबा, चोखोबा, मुक्ताई, जनाई असे अनेक संत या आपल्या कामधेनू आहेत. त्यामुळे या संतांचा विचार आपणास दीपस्तंभासारखा प्रेरक ठरणार आहे.
‘तरले तरती हा भरवसा,
नाम धारकाचा ठसा
नामसंकीर्तन साधन पै सोपे,
जळतील पापे जन्मांतरीचे’
ही श्रद्धाच आपल्याला तारून नेणार आहे. माझी जिवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी अशी वारकऱ्यांची भावना असते. विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या वारकऱ्यांची गुढी पंढरपूरचे चैतन्य घेऊन आता कोल्हापूरला उभारली जाणार आहे. अवस्थ वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून वावरताना आम्हाला विश्वशांतीसाठी पूर्वासुरींची शिकवण मार्गदर्शक ठरते आहे. ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज किंवा ‘वसुधैव कुटुंबकम्’ची शिकवण देणारी आमची समृद्ध परंपरा हे आमचे सांस्कृतिक संचित आहे.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः
सर्वे भद्राणि पश्यन्तु,
मा कश्चित दुःख भाग्भवेत
ही विश्वशांती समृद्धीची प्रार्थना बृहदारण्यक उपनिषदे आहे. ही उपनिषद अनादी कालातील असून श्रुती -स्मृती या माध्यमातून निर्माण झालेली आहेत. प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञानावर आधारित अशी आहेत. उपनिषदे ही संमत हिंदुस्थानी तत्त्वज्ञानाचे मूलस्रोत आहेत. समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी ऋषींनी यांची निर्मिती केली आहे. त्यावर आधारित योगेश्वर श्री कृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवत्गीता सांगितली. वैदिक धर्माचे हे मूलगामी तत्त्वज्ञान आणि विश्वातील इतर धर्म, संप्रदाय, तत्त्वज्ञान यातील समानतेचा धागा शोधायचा. यापाठीमागे असणारे मानवकल्याणाचे सूत्र शोधून काढण्यासाठी विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे प्रयोजन केले आहे.
‘बरे झाले देवा निघाले दिवाळे,
बरे या दुष्काळ ए पीडा केली’
असे संत तुकारामांनी एका बाजूला सांगितले तर दुसऱ्या बाजूला अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक अशी भूमिका संतांनी घेतली. संत एकांती बसले सर्व सिद्धांत शोधिले संतांनी एकांतवास विजनवास पत्करला. येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगाईत येता… असे संत तुकारामांनी म्हटले आहे. तर ‘जे खळांची व्यंकटी सांडो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ असे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे. केवळ महाराष्ट्रातील संत, पंथ संप्रदाय यांचाच नव्हे तर जगातील प्रातिनिधिक आध्यात्मिक तत्त्वप्रणालींचा विचार कोल्हापूर येथे आयोजित होणाऱ्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनात होणार आहे.
सामाजिक विद्वेषाला तिलांजली द्यायची असेल तर संत विचारासारखा दुसरा सकारात्मक विचार नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ अशी शिकवण संतांनी दिली. सगुण उपासना, निर्गुण उपासना, एकेश्वरवाद अनेक ईश्वरवाद द्वैत मत, अद्वैत मत अशी विविधता हिंदू धर्मात आहे. कोल्हापूर येथे आयोजित होणाऱ्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनात या सर्व मतांचा धांडोळा घेतला जाणार आहे. हरी भजनी हे ढवळीले जग असे या संमेलनाचे स्वरूप असून काला वाटू एकमेकां वैष्णवनिका सकलिक अशी नम्र भूमिका आमची आहे. काला म्हणजे महाप्रसाद. हा महाप्रसाद कृष्णाने यमुनातिरी गोपाळांना वाटला. हीच गोपाळ काल्याची परंपरा आपण पंढरपूरला सुरू ठेवली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक कीर्तन नाम सप्ताहांमध्ये काल्याच्या कीर्तनाची परंपरा आहे. काला हा दही-पोह्यांचा सात्त्विक अन्नाचा असतो. काला अन्नाच्या रूपाने सांकेतिक असला तरी केवळ अभिधामूलकअर्थ म्हणून त्याकडे पाहिले जात नाही. तर काला म्हणजे विविध विचारांचा संकर. विविध पंथांचा संकर, विविध तत्त्वज्ञानात्मक मतांचा संकर, हिंदुस्थानी संस्कृती आणि या संस्कृतीच्या कल्पवृक्षाच्या छायेत वाढलेले हिंदू तत्त्वज्ञान हे विश्वव्यापक आहे, सर्वसमावेशक आहे. सहिष्णुता हा या तत्त्वज्ञानाचा मूलाधार आहे. हिंदुस्थानी संस्कृतीतील वैदिक प्रणाली आणि या वैदिक प्रणालीमधील आशयसूत्र याचे विलक्षण साम्य जागतिक पातळीवरील तत्त्ववेत्यांच्या विचारांशी दाखविणारे आहे. तत्त्वज्ञानातील, अध्यात्मातील एखादा विचार जितका स्थानीय असतो तितकाच तो वैश्विक असतो. किंबहुना स्थानीय आणि वैश्विक यांच्या हिंदोळ्यावर तो सतत झुलत असतो. संत तुकाराम म्हणतात, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगाईत. तुकाराम आणि शेक्सपिअर एकमेकांना भेटले नसले तरीही त्यांच्यातील व्यक्तिभावना ही विश्वभावना झाली ही ताकद विश्वात्मक संत विचाराची आहे. वैश्विक तत्त्वज्ञानाची आहे.
संत साहित्याचे
ज्येष्ठ अभ्यासक
प्रा. डॉ. सदानंद मोरे




























































