प्रासंगिक – श्री शुभराय महाराजांचे संस्मरण

>> प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे

सोलापूरचे भाग्य असे की, शाहिरी काव्यातील अग्रणी कविराय रामजोशी आणि भक्ती काव्यातील शिरोमणी संतकवी श्रीशुभराय महाराज हे दोघेही समकालीन असून त्यांनी कर्तृत्व गाजवून सामाजिक, आध्यात्मिक अशा क्षेत्रांत दिगंत कीर्ती मिळविली. दोघेही वेदसंपन्न व ज्ञानी असूनही शाहीर रामजोशींची लेखणी लावणीकाव्याने नटली, तर शुभरायांची लेखणी भक्तिकाव्यात रंगली. दोघांच्या भेटीची हकीकत मोठी विलक्षण आहे. शुभरायांच्या भक्तिकाव्यातील उपदेशातून ‘परिवर्तन’ घडवून आणण्याची शक्ती असल्याने त्यांनी शाहिरांच्या कवित्वाला भक्तिगंगेचा स्पर्श करवला. प्रसंग काय घडला? आणि चमत्कार काय घडला? याला सोलापूरचा काव्येतिहासच साक्ष देणारा आहे. त्याविषयांचाच एक मागोवा इथे विनम्रपणाने घेतला आहे. दोघांचेही कर्तृत्व त्यातून उजळून निघाले आहे. दोघेही 17 व्या, 18 व्या दशकातील आहेत.

कीर्तनास मठातून नकार
शाहिरी कवितेतील ‘कोहिनूर’ असे बिरुद लावले गेलेले कविराय रामजोशी आणि आध्यात्मिक कक्षेतील थोर साक्षात्कारी संत म्हणून विख्यात झालेले श्री शुभरायमहाराज यांची भेट घडून येण्याचे कारण असे घडले की, कविराय रामजोशी जरी शाहिरी काव्यात शृंगार रंगविणारे लावणीकार होते, तरी ते वेदज्ञानदेखील जाणत होते. शास्त्र्ाs-पुराण यांचाही त्यांचा अभ्यास होता. ‘एके दिवशी सोलापूरवासी ग्रामस्थांनी रामजोशींच्या कीर्तनासाठी मठाची जागा मागावी व तेथे कीर्तन घडवावे असे त्यांनी जाहीर करून टाकल्याने लोक मठात जमू लागले. त्यावेळी शुभरायमहाराज भागवताची पोथी सांगत होते. जमलेल्या लोकांनी रामजोशींच्या कीर्तनाचा प्रस्ताव मांडला तेव्हा महाराजांनी त्याकडे दुर्लक्ष केले. रामजोशी यांचे कीर्तन ठेवणे तेथील काही भक्तांना रुचले नाही. महाराजांचे निकटचे शिष्य बाबा जाईल यांनी कीर्तनास नकार देऊन मठाचे दार बंद करून घेतले.

कविराय रामजोशी हे बाणेदार शाहीर होते. ते साहजिकच दुखावले गेले. त्यांनी मठात आपण कीर्तन करणारच हे लोकांना सांगितले. ‘आता फड आपला मठास लागून असलेल्या मोकळय़ा जागेत होणार असे ठरवून तिथे बैठकी घातल्या. तोवर मठात धुपारती झाली. तेवढय़ात इकडे डफावर थाप पडली. श्रोत्यांची तर झोपच उडाली. कीर्तन ऐकण्यासाठी लोक कर्णी पंचप्राण आणून बसले. कीर्तन सुरू झाले. मठाची दारे बंदच केली गेली होती. तेव्हा रामजोशी अधिक संतापले. खरे तर कीर्तनात प्रार्थना कवनेही म्हणून झाले होते. रामजोशींचा संताप अनावर झाल्याने त्यांनी मठास उद्देशून एक कवन रचले. वेदांताचा विषय होता, पण तो सोडून कवनात टीका केली. म्हणाले, ‘हटातटाने पटा रंगवूनि। जटा धरिशी का शिरी। मठाची उठाठेव का करी।।’ हे कवन ऐकून श्रीशुभराय स्थिरावले. म्हणाले, ‘धन्य बुवांचे कीर्तन, अनुपम त्यांची प्रतिभा.’ त्यांनी ओळखले की, शाहिरांची प्रतिभा अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. पण तिला थोडा अहंकाराचा स्पर्श झाला आहे. जर अहंकार सोडला तर रामजोशी हे खरोखरच ‘पुरुषोत्तम’ म्हणविले जातील. इतकेच नव्हे तर पुढे महाराज म्हणाले, ‘रामजोशी आमुचा सखा’. त्यांनी त्वरित रामजोशींना मठात बोलावले. उपदेशाच्या चार गोष्टी सांगितल्या. श्रीशुभरायदेखील कलागुण जाणणारेच होते. त्यांनी शाहिरांना आपल्याजवळील आसनावर बसविले.

कविद्वय उराऊरी भेटले
दोघेही श्रेष्ठ कविद्वय उराउरी भेटले. श्रीमहाराजांनी त्यांच्या हातावर ‘प्रसाद’ ठेवला. त्यांच्याशी अत्यंत आत्मियतेने त्यांनी संवाद केला. म्हणाले, ‘अरे मराठीच्या पुरुषोत्तमा। आजच्या कवना नाही उपमा। तुवा रचियेले सर्वोत्तमा।। तवं रचना ही प्रासादिक।।’ त्यांना उपदेश करताना श्रीशुभरायमहाराज म्हणाले, ‘अरे, तू मठाशी जशी अढी धरलीस तशी अढी तू अहंकाराशी धर. त्याच्याशी झगडा कर. तोच अहंकार तुझ्या परमार्थाला आड येत आहे. अहंकार हा केव्हाही वाईटच! तुझी कलाकृती (रचना) अनुपमेव असून दुसऱयाचे न्यून (उणेदुणे) काढण्यासाठी तिचा उपयोग करू नकोस. त्यात काहीही अर्थ नाही.’ हा उपदेश ऐकून रामजोशी हे भक्तिकाव्याकडे वळले. त्यांचे मन भक्तिकाव्यासाठी उद्युक्त झाले. त्यांची बैठक अध्यात्मप्रवण झाली. त्यांनी

एक पद रचले आहे. ते असे –
नरजन्मामध्ये घेई करून। घेई नरा
नारायणा सार्थक मानव कुडी।।’
आणखी एक कविता (भक्तिकाव्य) तर लोकांनाच सावध करणारी अशी आहे –
‘दो दिवसाची तनु ही साची।
सुरतरसाची करूनि मजा ।
भाई सावध व्हा। भाई सावध व्हा।।’

अशी रचना केल्यानंतर रामजोशींनी डफ गुडघ्यावर ठेवून फोडून टाकला. तेव्हापासून ते परमार्थी झाले. पुढे रामजोशी यांनी तीर्थयात्राही केली. नंतर ते सोलापुरी आले, तेव्हा महाराज म्हणाले, ‘मराठी शारदेच्या दरबारात तुमचे स्थान अत्यंत विलोभनीय असे आहे. संतकवी, पंतकवी, तंतकवी जसे ज्ञानेश्वर, मोरोपंत आणि तंतकवी म्हणून शाहीर रामजोशी हे नाव अजरामर राहील.

आपली प्रतिक्रिया द्या