दखल – खुदकन हसवणारे बाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निलय रमाकांत वैद्य

सुरेश खरे! मराठी सारस्वतांमधलं खणखणीत नाणं. वय वर्षे 83. खरेंनी सांस्कृतिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे मुशाफिरी केली. 2005 साली त्यांनी अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. त्यांचं ‘हसरे बाण’ हे पुस्तक हाती घेताना सगळय़ात पहिलं सुरेश खरेंविषयी आदरभाव मनात येतात. ‘हसरे बाण’ वाचताना पानोपानी वाचक खुदकन हसतात. कधी मनातल्या मनात गुदगुल्या होतात, तर कधी खरेंचा ‘कोणाचं नुकसान होणार नसेल तर थोडंसं खोटं बोलायला काय हरकत आहे?’ हा प्रश्न वाचून पुस्तकाचा प्रांजळपणा अधोरेखित होतो.

सुरेश खरेंनी दिग्गज पत्रकार विजय कुवळेकर यांच्या विनंतीला मान देऊन ‘झी मराठी दिशा’ साप्ताहिकासाठी स्तंभलेखन केलं. त्या लेखांचं संकलन ‘हसरे बाण’मध्ये वाचायला मिळतं. रस्सा आणि वरणभात, भस्म आणि घोडेस्वार, माकडांचे पूर्वज, मंत्रालयातले उंदीर, प्रेम मात्र पुण्यावर, फेकाफेक बातम्या, धंद्याचं नाटक, गौरीचं डोहाळजेवण ही काही स्फुटांची शीर्षकं. ती वाचून वाचक आकर्षित होतो. जशी लेखांची शीर्षकं तसे लेख. खुसखुशीत आणि वाचनीय. लेखकाने या पुस्तकात खूप हलकं फुलकं लेखन केलंय.

‘आयडिया’ नामक पहिल्या लेखात एका सौ.ला स्वतःची लायब्ररी काढायची आयडिया सुचते. त्यासाठी ती नवरदेवाकडे पैशाची मागणी करते. तो नवरा ती आयडिया कशी हाणून पाडतो याचं वर्णन इथे केलं आहे. ‘फेकाफेक बातम्या?’ या लेखात खेकडय़ांचे पुनर्वसन, राज्यांत पक्षांतराची लाट, मराठी भाषेच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील या बातम्यांचा समावेश आहे. ‘प्रेम मात्र पुण्यावर’ या लेखात पुण्यातले वाडे, सांस्कृतिक जाण, विद्येचं माहेरघर, पुणेरी पाटय़ा याचा धावता आढावा घेतला आहे. या विषयावरचा सविस्तर लेख वाचायला मजा येईल असं वारंवार वाटतं. खरं तर बाण हे युद्धाचं आयुध. बाण शत्रूचे प्राण घेतात. रक्तबंबाळ करतात. पण सुरेश खरेंचे हे बाण वाचकाला खुदकन हसवतात. म्हणून ते हवेहवेसे वाटतात.
हसरे बाण

लेखक ः सुरेश खरे
प्रकाशक ः आनंद लिमये, इंकिंग इनोव्हेशन
पृष्ठs ः 161, मूल्य ः रुपये 250/-