भटकंती – रामराज्यातील मंतरलेले क्षण

निमिष पाटगावकर  << [email protected] >>

माझ्या हातावर प्रवासयोग दर्शविणारी रेषा आहे का, मला माहीत नाही, पण गेल्या तीस वर्षांमध्ये मला जी भटकंती करायला मिळाली ती बघता ही रेषा नक्कीच असावी. या सर्व भटकंतीत हेही प्रकर्षाने जाणवले की, काही ठिकाणी जायचा योग यावा लागतो. यातलेच एक ठिकाण म्हणजे श्रीरामजन्मभूमी अयोध्या. जेव्हा सर्व जग 22 तारखेला राममय झाले होते तेव्हा हा सर्व सोहळा बघताना दोन महिन्यांपूर्वीच मी बघितलेली अयोध्या नगरी डोळ्यांसमोर उभी राहिली. निमित्त होते हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातल्या लखनऊला होणाऱ्या विश्वचषकाच्या सामन्याचे. हा सामना झाल्यावर लखनऊहून माझे परतीचे विमान दुसऱ्या दिवशी संध्याकाळी होते तेव्हा हाती असलेला हा दिवस कसा सत्कारणी लावायचा होता. लखनऊहून अयोध्याचे गुगलवर अंतर बघितले आणि ‘चलो अयोध्या’ करायचे ठरवले.

कुठच्याही हिंदू व्यक्तीला अयोध्येचे एक वेगळेच आकर्षण असते. लखनऊ फिरायला एक टॅक्सी मी केली होती. त्यालाच विचारले, “अयोध्या चलोगे?” अयोध्येला माझे सारथ्य करायला साजेसे असे रघुनंदन पाठक माझ्या टॅक्सी चालकाचे नाव होते. हिंदुस्थानात जी हमरस्ते  क्रांती झाली आहे, ती बघण्यासारखी आहे. अयोध्येपर्यंत उत्तम हायवे होता. जेव्हा आम्ही अयोध्येत पोहोचलो तेव्हा गाडीपाशी एक टुरिस्ट गाईड आला. मला गाईड आवडतात. कारण बहुतेक गाईड इतक्या कमी पैशांत मनोभावे त्यांचे काम करत असतात. एखाददुसरा अवलिया निघतो, पण तो अपवादच! अयोध्येत त्या पंपोशीत सात हजार मंदिरे आहेत तेव्हा नक्की काय पाहायचेपेक्षा न हरवता पुन्हा गाडीकडे कसे यायचे? हा मोठा प्रश्न होता.

रामदर्शनाच्या आधी रामसेवकाचे दर्शन घ्यायला हनुमान गढीच्या पायऱ्या चढून मारुतीरायापाशी गेलो. प्रभू रामचंद्र रावणवध करून अयोध्येला परतल्यावर हनुमान अयोध्येचे रक्षक म्हणून इथे वास्तव्याला होते. माझा गाईड आता रंगात येऊन मला रामायणाच्या काळात घेऊन चालला होता. बाजूला एक सुंदर महाल होता. त्याला राजद्वार महाल म्हणतात. त्या गाईडने मला सांगितले, या राजद्वार महालातून समोर या रस्त्यावरून राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न राजा दशरथाला भेटायला जात असत. मला ते सर्व डोळ्यांसमोर दिसायला लागले. या काल्पनिक दृश्यातून मी दशरथ महालात गेलो. दशरथ महालात गेल्यावर पहिले जाणवते ते या राजेशाही महालाचा राजा कसा राजेशाही थाटात राहत असेल! इथे रामाच्या आयुष्यातील तीन टप्प्यांच्या मूर्ती आहेत. लग्न करून आलेला राम, बालपणीचे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि वनवासातून आलेला राम. हा वनवास संपवून आलेला राम काळाराम रंगवला आहे.

इथून पुढचा टप्पा होता कनक भवन. त्रेतायुगात हे पूर्ण सोन्याचे भवन दशरथाने कैकयीसाठी बांधले होते.  कैकयीला आपण दुष्टपणाचे लेबल लावले आहे, पण जेव्हा नवी सून सीतामाई घरी आली तेव्हा उत्तर प्रदेशच्या प्रथेनुसार मूंह दिखाई म्हणून कैकयीने आपला हा सोन्याचा महाल सीतेला भेटच देऊन टाकला. इथे राम-सीता वास करतात असे अजूनही मानतात. इथे ज्या मूर्ती आहेत त्या फक्त राम-सीतेच्या. थोडक्यात, हा फार प्रायव्हेट महाल आहे जिथे हनुमान, लक्ष्मण वगैरे नेहमीच्या बरोबरच्या यशस्वी कलाकारांना प्रवेश नाही. माझा गाईड सांगत होता, आता साडेअकराला महाराजांचे भोजन झाल्यावर बंद होईल, तो चार वाजता उघडेल. रात्री नऊ वाजता हा बंद होतो. कारण प्रभू रामचंद्र इथे विश्रामाला येतात. इथे भरताने आणलेल्या रामाच्या पादुका ठेवल्या आहेत त्या चौथऱ्यावर डोके ठेवताना एक वेगळीच भावना सर्वांगातून वाहते. भर दुपारीही अतिशय शीतल आणि समाधानकारक स्पर्श त्या पादुकांत होता. एक मंद सुगंध असलेल्या त्या पादुकांची जागा वर्णन करायच्या पलीकडची आहे. ‘रामजन्मभूमी’ या शब्दाबरोबर श्रद्धा, संघर्ष, आनंद आणि अनेक भावना जोडल्या आहेत. आता प्राणप्रतिष्ठा झालेल्या रामलल्लाच्या मंदिराचे काम तेव्हा जोरात चालू होते. रामलल्ला राहत असलेल्या तात्पुरत्या जागेत विराजमान झालेल्या रामाचे दर्शन घेतले. तिथल्या रामजन्मभूमी न्यासासाठी देणगी द्यायला गेलो तर समोर कॉम्प्युटरवर रिसीट देणाऱ्या बाई पुण्याच्या मराठी निघाल्या. मला आश्चर्य वाटले, सरकारी बदलीपोटी पुण्यासारख्या शहरातून इथे येऊन राहायचे याचे. त्या पुण्याच्या बाईंना रोज रामाला भेटायचे भाग्य मिळत असले तरी नोकरीसाठी पुण्याहून अयोध्येला बदली हा त्यांना वनवास तर नसेल? हा विचार मला उगाच अस्वस्थ करून गेला. कुणी वनवास संपवून अयोध्येत येतो तर कुणी वनवासासाठी!

सीता की रसोई म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इथला भंडारा किंवा लंगर आहे. घर नसलेले किंवा घरातून घालवून दिलेले अनेक निराधार अयोध्येला येतात. ते राहतात त्या बॅरॅक्स मी नंतर बघितल्या आणि आयुष्याची अखेर रामाच्या चरणी होत असली तरी त्या तुटपुंज्या जागेत राहणे, सीता की रसोईत रोज जेवायला अवलंबून राहणे म्हणजे त्यांचाही आजन्म वनवासच आहे.

’शरयू तीरावरी अयोध्या मनूनिर्मित नगरी’ बघत बघत मी हळूहळू वास्तवात येत घडय़ाळाकडे बघितले. या रामराज्याची काही तासांची भेट आयुष्याला पुरेशी अशी होती.