शिवमंदिरांच्या राज्यात – मोहनावती नगरीचा दशरथेश्वर

>> नीती मेहेंदळे

दशरथ राजा म्हणजे प्रभू रामाचे पिताश्री. दशरथाच्या संबंधित कथा ऐकलेल्या…म्हणजे युद्धात रथाचे चाक फसलेले आणि मग कैकयीने ते धरून ठेवलेले…म्हणून तिला दशरथाने दिलेले ते दोन वर वगैरे. पाठोपाठ घडलेले रामायण, पण मला दशरथ आठवतो तो श्रावणबाळाच्या गोष्टीतला. मृगयेसाठी वडाच्या झाडावर दबा धरून बसलेला. तेवढय़ात जवळच्या पाणवठय़ावर काही चाहूल लागते. अंध आईवडिलांची तहान भागवण्यासाठी नदीपाशी आलेला श्रावणबाळ नदीत कमंडलू बुडवतो आणि त्या आवाजाच्या रोखाने सरसरत आलेला तो लक्षवेधी बाण, त्या बाणाने गतप्राण झालेला कोवळा युवक श्रावणबाळ, राजाला शोकग्रस्त आईवडिलांची लागलेली शापवाणी…हे सगळे आमच्या गावात घडले असा लोकापवाद आहे. ते गाव चक्क आपल्या महाराष्ट्रात आहे आणि ते आहे मराठवाडय़ात नांदेड जिह्यात. मुखेड मूळची मोहनावती नगरी. स्थानिक लोक सांगतात की, मुखेड गावातून लोकांचा चटकन पाय निघत नाही…म्हणजे त्या गावाची माणसावर जशी काही मोहिनीच पडते. थोडा अतिशयोक्तीचा भाग असला तरी त्यांचे हे म्हणणे मूळ नावाची उकल करून दाखवणारे आहे हे नक्की. मोहनावती नदीकाठी ही नगरी होती, असेही गावात सांगितले जाते. गोष्टीत पुढे दशरथाने श्रावणाचे मंदिर बांधले, शिवाय एक मोठे शिवालय बांधले. तेच आजचे दशरथेश्वर मंदिर असे गावात सांगितले जाते. सूर्यफुलाचे पीक अधिक घेतले जाते हे मुखेडचे अजून एक वैशिष्टय़. बालाघाटच्या डोंगररांगेनजीक असलेले मुखेडभोवतीचे डोंगर समुद्रसपाटीपासून साधारण 750-800 मीटर उंचीवर आहेत. सध्याच्या भूगोलाप्रमाणे मन्याड आणि लेंडी अशा दोन नद्या मुखेड परिसरातून वाहतात.

आपला मराठवाडा प्रांत हेमाडपंती मंदिरांनी संपन्न आहे. डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या मुखेडमध्ये या धाटणीची चार मंदिरे बांधलेली आढळतात. मुख्य मंदिर दशरथेश्वर. या शिवमंदिराला तीन बाजूंनी प्रवेशद्वारे असून ते तीन फुटांच्या उंच जोत्यावर बांधलेले आहे. मुख्य प्रवेशद्वारावर गजलक्ष्मीचे शिल्प दिसते. द्वारशाखेच्या दोन्ही बाजूंना गंगायमुनेची शिल्पे असून मंदिर बाह्यांगाच्या मंडोवरावर उत्तम शिल्पकला आढळते. विशेष नमूद करण्यासारखे म्हणजे गणेश, ज्येष्ठलक्ष्मी, सरस्वती, शंकरपार्वती, सुरसुंद्रय़ा अप्रतिम झाले आहेत. नृत्य करणाऱया सप्तमातृकांचे दुर्मिळ शिल्प पण मंदिर परिसरात आढळते. मूळ शिवलिंग गाभाऱयात काहीसे उंच जोत्यावर आहे आणि अशा प्रकारचे बांधलेले मंदिर मराठवाडय़ात दुर्मिळ आहे. हे शिवालय बरेचसे पडझड झालेल्या अवस्थेत होते, पण त्याचे जे काही पुनरुज्जीवन केले गेले आहे ते पुरातत्त्व खात्याचे नियम धाब्यावर ठेवून केलेले आणि विजोड दिसते आहे.

साधारण बाराव्या शतकाच्या आसपास चालुक्य काळात विक्रमादित्य राजाच्या कारकीर्दीत हे शिवालय उभारले गेले असे समजते. मंदिराच्या उजव्या बाजूस भलीमोठी पुरातन बारव असून ती 59 फूट खोल आणि 50 फूट रुंद आहे. आता तिचीही बरीच पडझड झाली असून तिचे डागडुजीकरण सरधोपट पद्धतीने सिमेंटच्या पायऱया लावून केलेले दिसते. या शिवमंदिराच्या धाटणीची अजून तीन मंदिरे गावात आढळतात. पैकी वीरभद्र मंदिर हे लिंगायत पंथाने मध्ययुगात बांधले आहे. या मंदिराची अवस्था तर अधिकच बिकट आहे. हे मुखेडचे ग्रामदैवत असून या मंदिरात अनेक भग्न सुटय़ा मूर्ती मांडून ठेवलेल्या दिसतात. वीरभद्राच्या जन्माची आख्यायिका तर बहुश्रुतच आहे. पार्वतीने (सती) आपल्या पित्याने दक्ष राजाने यज्ञासाठी आपल्या जावयाला शंकराला आमंत्रित केले नसल्याचे समजल्यावर यज्ञकुंडात उडी मारून निषेध दर्शवला होता. ती बातमी शंकराच्या कानावर गेली आणि त्याने रागाने आपल्या जटेतून एक केस उपटून जमिनीवर आपटला, ज्यातून वीरभद्र जन्माला आला. त्याला शिवाचा अवतार मानतात. शिवरात्री आणि श्रावण महिन्यात शिवमंदिरासोबत या मंदिरातही विशेष पूजा व उत्सव असतो. दुसरे बालाजी मंदिर हे वैष्णव पंथाने बांधलेले दिसते. गणाचार्य मठाचे मंदिरही याच पद्धतीने बांधले गेले आहे. शैव, वैष्णव असा पंथ संगम गावात दिसून येतो. गावात अलीकडच्या काळात बांधलेले मोठे शनिमंदिर पण आहे.

गावाच्या परिसरात वाळूमिश्रित चुनखडीचे साठे आहेत तसेच विटांसाठी लागणारी माती पण येथे सापडते. मथितार्थ असा की, यासाठी लागणाऱया उत्खननामुळे मुखेडमधल्या या पुरातन वास्तूंना इजा पोहोचू नये याची दखल घेतली जावी. पुरातन वास्तू हा आपला वारसा असून त्यांचा जीर्णोद्धार, पुनरुज्जीवन करण्याचे शास्त्र्ा वेगळे असते आणि त्याचे व्यवस्थापन पुरातत्त्व खात्याच्या अधिकाराखालीच करावे लागते याची नोंद घेणे अत्यावश्यक आहे हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. हिंदुस्थानी शिल्पकला जगभरात नावाजली गेलेली आहे, ती मुद्दाम पाहायला जागतिक पर्यटक येत असतात आणि पुनर्रचनेच्या नावाखाली त्याची अशी विटंबना होत असताना ती सजग असणे आणि थांबवणे यात सरकारसोबत आपण नागरिकांनीसुद्धा लक्ष घालणे आता गरजेचे आहे.

 [email protected]