
>> नितीन कुलकर्णी
क्रीडा क्षेत्रात जर आपल्याला पुढे जायचे असेल आणि पदके जिंकायची असतील तर खेळासाठी अनुकूल वातावरण तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक ‘रोडमॅप’ तयार करण्याची वेळ आता आली आहे. हिंदुस्थानी क्रिकेटच्या पलीकडे खेळांचा विचारच करत नाहीत असे दिसून येते. हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात पालकांबरोबरच शाळा-महाविद्यालयांची भूमिकाही महत्त्वाची ठरेल. प्रत्येक राज्याने केवळ एका क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रित केले तरी परिस्थिती बदलेल.
छोटय़ा गावांमधून आणि छोटय़ा शहरांमधून आलेल्या क्रीडापटूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत भरघोस यश संपादन करून देशाला सन्मान मिळवून दिला आहे. या यशामागे त्यांनी स्वतः केलेल्या कष्टाचा वाटा सर्वांत अधिक महत्त्वपूर्ण आहे. क्रीडा क्षेत्रात सुविधा भरपूर मिळत असल्यामुळे श्रीमंत देशातील खेळाडू पदके पटकावतात अशी सर्वमान्य धारणा आहे, परंतु याच्या अगदी उलट छोटय़ा शहरांमधून आणि खेडय़ांमधून आलेले, कमकुवत आर्थिक पार्श्वभूमी असलेले खेळाडू आपली क्षमता सिद्ध करत आहेत.
ऑलिम्पिकमध्ये केवळ भाग घेण्याची संधी मिळणे हेच एखाद्या खेळाडूच्या दृष्टीने मोठे यश असते. पदक जिंकणे तर एखादे स्वप्न सत्यात उतरल्याप्रमाणेच असते. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून हिंदुस्थानची मान उंचावली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारा तो एकमेव हिंदुस्थानी खेळाडू आहे. या पदकाबरोबरच हिंदुस्थानने या ऑलिम्पिकमध्ये पटकावलेल्या पदकांची संख्या सातवर पोहोचली. कोणत्याही एका ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानने जिंकलेल्या सर्वाधिक पदकांचा हा नवा उच्चांक आहे.
व्यक्तिगत स्पर्धांमध्ये हिंदुस्थानसाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारा नीरज दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अभिनव बिंद्राने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. हरयाणाच्या पानिपत जिह्यातील एका छोटय़ाशा गावचा रहिवासी असलेला नीरज लष्करात सुभेदार आहे. त्याने 2016 मध्ये पोलंड येथे ज्युनियर खेळाडूंच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आणि 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
हिंदुस्थानी महिला हॉकी संघ कास्यपदक पटकावण्यात यशस्वी ठरला नसला तरी ब्रिटनसारख्या बलाढय़ संघाशी हिंदुस्थानी महिला खेळाडूंनी ज्या त्वेषाने लढत दिली ती जिगर प्रशंसनीय आहे. मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकून वेटलिफ्टिंग स्पर्धेत हिंदुस्थानला 21 वर्षांनंतर या क्रीडा प्रकारात पदक मिळवून दिले. वेटलिफ्टिंगमध्ये पदक पटकावणारी ती दुसरी महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी 2000 च्या सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत कर्णम मल्लेश्वरीने कास्यपदक पटकावले होते. वेटलिफ्टिंग हा ताकदीचा खेळ आहे. त्यासाठी भरपूर पौष्टिक आहाराची गरज असते. चानूचे जीवन मात्र खूपच संघर्षमय होते.
उदाहरणार्थ, महिला हॉकी संघात डिफेंडर निक्की प्रधान आणि मिडफिल्डर सलीमा टेटे या दोन झारखंडमधून आलेल्या मुली खेळल्या. या दोघींना हिंदुस्थानी संघात स्थान पटकावण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. निक्की प्रधान ही खुंटी या आदिवासीबहुल जिह्यातील आहे. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी मजबूत नाही. सलीमा टेटे सिमडेगा जिह्यातील असून तिलाही खडतर प्रवास करावा लागला आहे. पैलवान रवी दहिया हरयाणाच्या सोनिपत जिह्यातील नाहरी गावामधील आहे. थाळीफेक या क्रीडा प्रकारातील खेळाडू कमलप्रीत ही पंजाबमधील मुक्तसर जिह्याच्या एका गावातील आहे.
मुष्टियोद्धा लवलीना आसामच्या गोलाघाट जनपद येथील बरो मुखिया या गावातील आहे. वेगवान चालण्याच्या स्पर्धेत भाग घेतलेली मेरठ येथील प्रियंका गोस्वामी हिचे वडील यूपी रोडवेजमध्ये चालक होते. प्राप्त माहितीनुसार प्रियंका बराच काळ एक वेळचे जेवण गुरुद्वारातील लंगरमध्ये करीत असे. पंजाबातील लुधियाना जिह्यातील एका छोटय़ाशा गावातील मुष्टियोद्धा सिमरनजीत कौर हिची आई उदरनिर्वाहासाठी छोटी-मोठी कामे करत असे आणि वडील एक किरकोळ नोकरी करीत असत. असे असूनसुद्धा सिमरनजीतने कठोर मेहनत घेऊन ऑलिम्पिक संघात स्थान मिळवले.
क्रीडा क्षेत्रात जर आपल्याला पुढे जायचे असेल आणि पदके जिंकायची असतील तर खेळासाठी अनुकूल वातावरण तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक ‘रोडमॅप’ तयार करण्याची वेळ आता आली आहे. खेळाच्या नावावर आपण पायाभूत संरचना उभी करतो, परंतु तिची देखभाल योग्य प्रकारे केली जात नाही. अधिकांश राज्यांमध्ये खेळाडूंच्या प्रशिक्षणाची पुरेशी व्यवस्था नसते आणि राज्यस्तरीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजनही वारंवार होत नाही.
हिंदुस्थानी महिला आणि पुरुष हॉकी संघांचेच उदाहरण पाहा. आपले संघ सामन्याच्या पूर्वार्धात खूप चांगला खेळ करतात; परंतु उत्तरार्धात जेव्हा दम टिकविण्याची गरज असते तिथे युरोपीय खेळाडूंच्या तुलनेत आपले खेळाडू मागे पडतात. हॉकी हा हिंदुस्थानचा राष्ट्रीय खेळ आहे तसेच हॉकी आणि कुस्ती ही हिंदुस्थानची ओळख मानली जाते. परंतु हॉकीमध्ये पदक पटकावण्यासाठी देशाला 41 वर्षे लागली.
या संपूर्ण प्रक्रियेत सामान्य देशवासीयांची भूमिकाही महत्त्वाची ठरते. आईवडिलांनी आपल्या मुलांना खेळाबद्दल प्रोत्साहन दिले पाहिजे. अन्यथा मुले मोबाईलमध्ये रममाण राहतील आणि आईवडील त्याचेच रडगाणे गात राहतील. खेळांसाठी मुलांना प्रोत्साहित करण्यात शाळा आणि महाविद्यालयांची भूमिकाही महत्त्वाची आहे. आपल्याकडे शाळा-महाविद्यालयांत खेळाचा तास तर असतो, पण त्यात खेळ होतच नाहीत. हा तास एक संकट समजून टाळला जातो.
हिंदी भाषिक राज्यांमध्ये तर खूपच वाईट परिस्थिती आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेले उत्तर प्रदेशसारखे राज्य असो अथवा बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड असो… एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येच्या देशातून ऑलिम्पिकसाठी खेळाडूच निर्माण होत नाहीत. हरयाणातून कुस्ती या क्रीडा प्रकारात अनेक खेळाडू येत आहेत हे खरे. झारखंडमध्ये तिरंदाजी, हॉकी आणि फुटबॉल हे खेळ खेळले जातात. परंतु ऑलिम्पिकच्या महिला हॉकी संघात या राज्यातील केवळ दोनच खेळाडू होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंची कोणतीही हिस्सेदारी अनेक क्रीडा प्रकारांत नाही. देशाच्या लोकसंख्येपैकी अर्ध्या टक्क्याहून कमी लोकसंख्या असलेल्या मणिपूर या राज्याने आतापर्यंत किमान बारा ऑलिम्पिक स्तरावरील खेळाडू तयार केले आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मणिपूरमधील मेरी कोम (मुष्टियुद्ध), सुशीला चानू (हॉकी), एस. नीलकांता (हॉकी), मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), देवेंद्र सिंह (बॉक्सिंग) आणि एल. सुशीला देवी (ज्युदो) या सहा खेळाडूंनी भाग घेतला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्येही मणिपूरचे खेळाडू दमदार खेळाचे दर्शन घडवितात.
ओडिशा सरकारने हॉकीला प्रोत्साहन देण्यात मोठे योगदान दिले आहे. 2023 मध्ये होत असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही ओडिशाच भूषविणार आहे. स्थानिक प्रतिभांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ऍस्ट्रोटर्फ मैदान तयार करण्याबरोबरच राऊरकेलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडियमसुद्धा आकार घेत आहे.
जर प्रत्येक राज्याने किमान एका खेळाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले तरी देशातील खेळांच्या दर्जात लक्षणीय सुधारणा होऊ शकते. परंतु आपली हिंदुस्थानींची मुख्य समस्या अशी आहे की, क्रिकेटच्या पलीकडे आपण अन्य खेळांना अजिबात स्थान देत नाही. क्रिकेटमध्ये हिंदुस्थानी संघाला मिळत असलेल्या यशाचा आपल्याला अभिमान आहे हेही खरेच. क्रिकेटच्या विरोधात बोलण्याचा इथे अजिबात हेतू नाही, परंतु अन्य क्रीडा प्रकारांत आपण पाय रोवू शकत नाही याचे शल्यही आपल्याला असलेच पाहिजे. सध्या इंग्लंडविरुद्ध हिंदुस्थानची क्रिकेट कसोटी मालिका सुरू आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहणारे, ऐकणारे एवढेच नव्हे तर खेळाचे विश्लेषण करणारे लोकही आपल्याला आपल्या भोवताली मोठय़ा संख्येने भेटतात, परंतु अन्य खेळांमधील जाणकार अगदी मोजक्या संख्येनेच आढळतील. याच कारणामुळे सव्वा अब्जपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला ऑलिम्पिक स्पर्धेत केवळ सात पदकांवर समाधान मानावे लागते.
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत.)





























































