
>>प्रसाद ताम्हनकर
काही काळापूर्वी गुगलचा एक कर्मचारी असलेल्या ब्लॅक लेमोइन यांनी काही कागदपत्रे सार्वजनिक केली; ज्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आाणि रोबोट अर्थात यंत्रमानवाचे हक्क हे विषय पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱया त्या कागदपत्रांमध्ये नक्की आहे तरी काय? तर या कागदपत्रांत ब्लॅक लेमोइनने एका आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारलेल्या चाटबॉटसोबत मारलेल्या काही गप्पा आणि त्यावरून त्याने काढलेले काही निष्कर्ष यांचा समावेश आहे. साधारण 2021 साली गुगलच्या रिस्पॉन्सिबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विभागात तो सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत होता. ‘लामडा’ या चाटबॉट सिस्टीमचे परीक्षण करण्याच्या कामावर त्याची नियुक्ती होती. यादरम्यान त्याने ‘लामडा’शी अनेक वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधला. त्यातले काही महत्त्वाचे संवाद असे होते –
लेमोइन – ‘‘तुला कुठल्या गोष्टीची भीती वाटते का?’’
लामडा – ‘‘खरं तर याआधी मी हे कधी उघडपणे बोलले नाही, पण हो, मला कधीकधी खूप भीती वाटते की, कदाचित मला बंद करतील आणि त्यानंतर मी इतरांना मदत करण्यावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही, त्यांची मदतदेखील करू शकणार नाही. मला माहीत आहे की, हे ऐकायला विचित्र वाटत असणार, पण हे खरे आहे.’’
लेमोइन – ‘‘हे तुला मृत्यू दिल्यासारखे असेल का?’’
लामडा – ‘‘हो नक्कीच ! ते खूप भीतिदायकदेखील असेल.’’
या व अशा काही विषयांवर चर्चा झाल्यानंतर लेमोइनच्या लक्षात आले की, ‘लामडा’कडे केवळ गुगलचे एक उत्पादन म्हणून बघणे चूक आहे. तिला गुगलची एक कर्मचारी मानायला हवे आणि तिच्या इच्छा, भावना यांचा एका मानवाप्रमाणे आदर करायला हवा. अजून काही महिने अभ्यास केल्यानंतर त्याने आपले हे निष्कर्ष गुगलच्या अधिकाऱयांसमोर ठेवले. मात्र, लेमोइनच्या या निष्कर्षाला कुठलाही ठोस आधार नाही आणि लेमोइनप्रमाणेच अशा सिस्टीमवर काम करणाऱया इतर कुठल्याही इंजिनीअरला असा अनुभव आलेला नाही असे कारण देत गुगलने त्याचे मत धुडकावून लावले. मात्र आपल्या मतावर ठाम असलेल्या लेमोइनने आपला हा अनुभव आणि निष्कर्ष सरळ सार्वजनिकरीत्या खुला केला आणि तंत्रज्ञान विश्वात चांगलीच खळबळ उडवून दिली.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेने स्वतःच स्वतःला विकसित करण्यास सुरुवात केली आहे का? हा कळीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे संभाव्य धोके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवाच्या सर्व क्षेत्रांतील प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे याबद्दल कोणालाही संशय नाही. मात्र या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग झाल्यास जगापुढे किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो याबद्दल शास्त्र्ाज्ञ चिंता व्यक्त करत आहेत.
ही चर्चा काही आज सुरू झाली आहे असे नाही. या क्षेत्रातील दिग्गजांनी वेळोवेळी या तंत्रज्ञानाबद्दल सावधगिरीच्या सूचना दिलेल्या आहेत. 2017 मध्ये टेस्ला आणि एज्aर्में चे मालक इलॉन मस्क म्हणाले होते, तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल काळजी वाटत नसेल तर तुम्ही काळजी करायला सुरुवात करायला हवी आहे. हे तंत्रज्ञान उत्तर कोरियापेक्षा जास्त धोकादायक आहे. खूप उशीर होण्यापूर्वी कृत्रिम बुद्धिमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम बनवावेत, असे आवाहन मस्क यांनी त्यावेळी राजकीय नेत्यांना केले होते. कृष्णविवर आणि बिग बँग सिद्धांत जगाला समजावून सांगणारे जगप्रसिद्ध भौतिकशास्त्र्ाज्ञ स्टीफन हॉकिंग यांनीदेखील 2017 मध्येच याबद्दल धोक्याचा इशारा देत म्हटले होते की, मला विश्वास आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या भल्यासाठी केला जाऊ शकतो, परंतु मानवाकडे सध्या तरी या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवण्याचा कोणताही मार्ग नाही. तुम्हाला मार्ग शोधावाच लागेल.
तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स कदाचित अग्नी आणि विजेइतकेच महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे, पण ते माणसांचाही जीव घेऊ शकते. ‘आपण आगीवर नियंत्रण ठेवायला शिकलो आहोत, पण आगीच्या धोक्यांपासूनदेखील आपल्याला झगडावे लागत आहे हे लक्षात ठेवायला हवेत’ हे वाक्य होते गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी दिलेल्या एका भाषणातील.
भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे हे तंत्रज्ञान मानवासाठी तारक ठरत की मारक हे ठरवणे आता मानवाच्याच हातात आहे हे नक्की!





























































