साय-फाय -3 डी प्रिंटेड घर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसाद ताम्हनकर << [email protected]>>

काही दिवसांपूर्वीच रिव्हरहेड (न्यूयॉर्क) इथे एक घर विक्रीला उपलब्ध झाले आणि काही तासांतच ते बांधकाम आणि इंटरनेट विश्वात चर्चेचा विषय बनले. असे काय होते या अनोख्या घरात की, ते अवघ्या काही तासांत जगभर चर्चेचा विषय बनले? या घराची खासियत म्हणजे  हे घर 3 डी प्रिंटींग तंत्रज्ञानाने बांधण्यात आले आहे. अवघ्या दोन प्रिंटरच्या मदतीने  ‘Autonomous Robotic Construction System (ARCS)’ या तंत्रज्ञानाने या घराचे बांधकाम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एखाद्या गोदामात अथवा कारखान्यात या घराचे भाग प्रिंट करून ते साईटवर आणून न जोडता चक्क बांधकामाच्या जागेवरच या घराच्या भिंती, फुटिंग, फाऊंडेशन, इंटेरियर या सगळ्यांना प्रिंट करून बांधकामात वापरण्यात आले आहे. या घराची किंमत अवघी 3 लाख डॉलर्स एवढी असून ती तेवढय़ाच आकाराच्या मात्र पारंपरिक पद्धतीने बांधण्यात आलेल्या घराच्या अर्धी आहे हे विशेष. या   Autonomous Robotic Construction System (ARCS) तंत्रज्ञानाने उभारण्यात आलेले घर 1500 स्केअर फुटाचे असून त्यात 3 बेडरूम्स, दोन मोठय़ा बाथरुम्स, एक ओपन फ्लोअर आणि गॅरेज या सर्व सोयींनी सुसज्ज असे बांधण्यात आले आहे. नेहमीच्या बांधकामापेक्षा तीन पट कमी वेळात या घराचे काम पूर्ण झाले असून या बांधकामासाठी फक्त प्रिंटर चालवणाऱ्या दोन माणसांची आवश्यकता लागली आहे. यामुळे खर्चात प्रचंड कमतरता आणण्यात यश आले असून इतर बांधकामांच्या तुलनेत या घरांची किंमत अर्ध्याहून कमी असणार आहे.

हिंदुस्थानही या तंत्रज्ञानाने प्रवेश केलेला आहेच. काही काळापूर्वीच लार्सन अॅण्ड टुब्रो या प्रसिद्ध पंपनीने आपल्या कांचिपुरम फॅसिलिटीमध्ये 3 डी. प्रिटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने एक दोन मजली इमारत उभारली आहे. या इमारतीच्या फक्त होरिझंटल स्लॅब्स सोडल्यास इतर सर्व भाग 3 डी प्रिंटर तंत्रज्ञानाने उभारण्यात आलेला आहे. या घरासाठी खर्चदेखील नेहमीच्या बांधकाम खर्चाच्या तुलनेत अत्यंत किरकोळ आलेला आहे आणि अवघ्या दोन प्रिंटरच्याच मदतीने ही इमारतदेखील उभारण्यात आलेली आहे. देशातील सर्वांना हक्काचे घर देण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी 6 कोटी घरे बांधण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्या योजनेसाठी हे 3 डी प्रिंटिंग तंत्रज्ञान अत्यंत उपयोगी ठरणार आहे. हे 3 डी प्रिटिंग तंत्रज्ञान अत्यंत उपयोगी, कामाचा कालावधी अर्ध्यापेक्षा कमी वेळावर आणणारे आणि अत्यंत स्वस्त असल्याचे सिद्ध होत असले तरी या तंत्रज्ञानाबद्दल बांधकाम आणि कामगार क्षेत्रातील काही तज्ञांनी चिंतादेखील व्यक्त केली आहे. या तंत्रज्ञानाचा वाढता वापर बांधकाम क्षेत्रातील मजुरांची गरजच संपवून टाकेल अशी रास्त भीती ते व्यक्त करत आहेत. सध्या अशा तंत्रज्ञानावर आधारित घरांच्या उभारणीसाठी प्रिंटर चालवणारे दोन लोक आणि घराच्या खिडक्या, छत आणि इंटेरियरच्या कामासाठी मोजके लोक एवढय़ाच मानवी श्रमांची गरज पडत आहे. हळूहळू हे लोकदेखील कमी होऊन त्यांची जागादेखील आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित रोबोट घेतील अशी शक्यता आहे.