ठसा – डॉ. बा. दा. जोशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. बा. दा. जोशी हे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासातील प्रदीर्घ काळ उमरखेड येथे व्यतित केला. विदर्भ मराठवाडय़ाच्या सीमारेषेवर असलेली उमरखेड नगरी साहित्य, संस्कृती, राजकारण आणि आध्यात्मिक परंपरेने खूप समृद्ध होती आणि तसा लौकिक पंचक्रोशीत होता. पैठण येथील संतकवी श्री उत्तम श्लोक यांच्या साहित्याचे अभ्यासक असलेले, त्यांच्या साहित्यावर पीएच.डी. संपादन केलेले जोशी माहूरगड येथील विष्णूदासाच्या साहित्याचेही अभ्यासक होते. उमरखेड येथील गोपिका बाई सीताराम गावंडे महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य होते. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक तर ते होतेच, त्यांनी तेथे उत्तम श्लोक यांच्या नावाने वाङ्मय मंडळ स्थापन केले. त्यांच्या पुढाकारातून तेथे विदर्भ साहित्य संघाची शाखाही स्थापन झाली. अमरावती विद्यापीठाच्या प्राध्यापक परिषदेचे एक अधिवेशन पुसद येथे झाले होते. त्याचे अध्यक्षपद बा.दां.नी भूषविले. एवढेच नव्हे तर साकळे विद्यालय व रेणुकामाता विद्यालयाचे संचालकपद त्यांनी भूषविले. उमरखेड तालुक्यातील कृष्णपूर नावाच्या ग्रामीण भागात एका सामान्य कुटुंबात 9 जून 1943 रोजी जन्म झालेल्या जोशी यांची सुरुवातीच्या काळात परिस्थिती बेताचीच होती. शिक्षण घेण्यासाठी परिस्थिती प्रतिकूल होती. मात्र संकटाला तोंड देत आणि प्राप्त परिस्थितीवर मात करीत त्यांनी शिक्षणाची स्वप्ने बघितली. प्रखर बुद्धिमत्ता आणि शिक्षणाची ओढ यातून ते पुढील प्रवास करीत राहिले. प्रवासाच्या सोबत अंतरमनात असलेली आध्यात्माची आवड यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले, अशा परिस्थितीत कुठे वार लावून जेवण, कुठे शारीरिक कष्ट करून काम मिळवले आणि त्यातून त्यांनी आपले निर्धारित उद्दिष्ट गाठण्यास प्रारंभ केला. 1966 मध्ये एम.ए. प्रथम श्रेणीत संपादन केल्यानंतर त्यांना पहिली नोकरी कंधारच्या शिवाजी महाविद्यालयात मिळाली. वर्षभरानंतर पुसद येथील जनता शिक्षण मंडळाचे महाविद्यालय उमरखेड येथे स्थापन झाले, तेथे ते रुजू झाले. याच महाविद्यालयात बाळकृष्ण दासराव जोशी या उमद्या, तरुण अभ्यासकाला पोषक वातावरण मिळाले. आपल्या संत साहित्य अभ्यासातून व्यासंगातून कार्यप्रवास जोमाने सुरू ठेवला आणि या महाविद्यालयाचा लौकिक सर्वदूर पोहोचवला. शिक्षक किंवा प्राध्यापकाचे काम हे फक्त चार भिंतींपुरतेच मर्यादित नसते, तर ते सर्वव्यापी झाले पाहिजे, ही जोशी यांची भूमिका होती, या भूमिकेतून त्यांनी विदर्भ-मराठवाडय़ात व्यापक प्रमाणात प्रबोधन केले, खरे तर त्यांचे कार्य हे दोन्ही प्रदेशासाठी भूषणावह ठरले. उमरखेड येथील श्री उत्तम श्लोक वाङ्मय मंडळाचे सचिव दीपक देशमुख यांनी बा. दा. जोशी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत ‘डॉ. बा. दा. जोशी ः एक व्यासंगी भ्रमणयात्री’ हा लेख अभ्यासपूर्ण लिहिला आहे. त्यात त्यांनी जोशी यांच्या एकूणच प्रवासावर विस्ताराने भाष्य केले आहे. त्यात ते म्हणतात, ‘वाचन, मनन आणि चिंतन या तिन्ही बाबींना आवश्यक असणारे अनेक गुण वैशिष्टय़े बा. दां.च्या व्यक्तिमत्त्वात होती. महाविद्यालयीन कामकाज आरोपाचा नंतर न थकता, न कंटाळता आपला वेळ प्रसंगी पदरमोड करून वाङ्मयीन धार्मिक व सामाजिक जनांसाठी कारणी लावत असत.’’ जोशी यांची सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, वाङ्मयीन, आर्थिक अशा विविध विषयांवरची व्याख्याने विविध ठिकाणी झाली आहेत. म्हणूनच त्यांची ओळख व्यासंगी व्याख्याता अशी सांगितली जाते. डॉ. जोशी हे पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक होते. अमरावती विद्यापीठ, नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ असो की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, तेथे त्यांनी पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या अभ्यासाला दिशा दाखवली. विविध वृत्तपत्रांत विपुल प्रमाणात लेखन तर त्यांनी केलेच. ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा नांदेड येथील ग्राहक पंचायतचे प्रबोधन प्रमुख म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अध्यापनाच्या क्षेत्रात 37 वर्षे, सेवानिवृत्तीनंतर 10 वर्षे पदव्युत्तर, नंतर एम. फिलसाठी पाच वर्षे असा सलग 55 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांनी उमरखेडसारख्या ग्रामीण भागात घेतला व असंख्य विद्यार्थी घडवले. त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील दीपस्तंभ बनले. जवळपास तीस-पस्तीस पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सातत्याने, नित्यनिरंतर करणे ही सहज सोपी बाब अजिबात नाही. नगर, हैदराबाद, पुणे, नागपूर, परभणी, धुळे असा संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी ज्ञानदानाने पिंजून काढला आणि यातूनच ते जिवाभावाचे नाते जोडत गेले. बा. दा. जोशी यांचे श्री क्षेत्र माहूर सर्वदर्शन हे पुस्तक प्रकाशित झाले असून त्याचा सन्मान माहूर येथील संतकवी विष्णू महाराज साहित्य गौरव पुरस्काराने झाला. विद्यार्थी घडवणारा शिक्षक, भ्रमणयात्री, अभ्यासू वक्ता आणि संतसाहित्याचे अभ्यासक अशी जोशी यांची ओळख सर्वदूर होती.