>> डॉ. प्रतिभा फाटक
स्त्री सक्षम असणं म्हणजे कुटुंब सक्षम असणं. कारण ती असते कुटुंबाचा कणा. यासाठी ना तिचं शिक्षण आड येत ना तिची पात्रता. तिने तिचं अस्तित्व मान्य करणंच पुरेसं असतं. असं अस्तित्व गवसलेल्या अनेक स्त्रिया आपल्या आजूबाजूला दिसतील. शहरात, निमशहरी भागात ते अगदी गावशिवारात. संभाजीनगर, फुलंब्रीच्या अशा कृषीकन्यांनी नुकतीच संभाजीनगरजवळील एमआयडीसीतील पंधरा कोटीची एक अत्याधुनिक अन्नमाल प्रक्रिया कंपनी चालवायला घेण्याचा करार केला. उन्नतीसाठी झगडणाऱया या महिलांची यशोगाथा.
महिला शेतकरी उत्पादक कंपनी WE-We For Empowerment या कंपनीच्या संचालक – सामान्य शेतकरी महिलांनी संभाजीनगरजवळील शेंद्रा एमआयडीसीतील पंधरा कोटीची एक अत्याधुनिक अन्नमाल प्रक्रिया कंपनी चालवायला घेण्याचा करार नुकताच केला. शेतकरी महिलांनी अशा प्रकारे कंपनी चालवायला घेण्याचा हा उपक्रम चकित करणारा नक्कीच म्हणावा लागेल. या ध्येयवेडय़ा दहाजणी या आहेत संभाजीनगर जिह्यातील डोंगराळ, खडकाळ भागात सतत दुष्काळाला तोंड देणाऱया, वातावरण बदलाच्या संकटाला झेलणाऱया, दोन ते तीन एकर जमिनीचा तुकडा बाळगणाऱया, एखाद् दुसरीचा अपवाद सोडला तर दहावीच्या आत शिक्षण घेतलेल्या सामान्य शेतकरी महिला!
कृषीकन्यांच्या या प्रवासाची सुरुवात झाली ती सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, संभाजीनगर या संस्थेसोबत. 1993 पासून संस्था या परिसरात कार्यरत आहे. संस्थेने आरोग्यासोबतच्या प्रश्नांना उत्तरे शोधताना नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन, जलसंधारण, कृषीविस्तार उपक्रम, पशुधन आरोग्य, स्वावलंबन व महिला सक्षमीकरणाचे उपक्रम सुरू केले. हे उपक्रम राबवत असताना एक गोष्ट सातत्याने पुढे येत होती. शेतकऱयांनी पिकवलेल्या भाज्या सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत मुबलक प्रमाणात त्यांना खाण्यासाठी उपलब्ध असतात, पण विक्रीसाठी न्यायलादेखील परवडणार नाही अशी किंमत बाजारात मिळते. नाशवंत असल्यामुळे हा वाया जाणारा माल जनावरांना खायला घातला जातो किंवा शेतातच सडतो. फेब्रुवारी, मार्चनंतर सप्टेंबरपर्यंतच्या पाच सहा महिन्यांत मात्र अनेकांच्या घरी डाळी बेसन, सांडगे, कुरडई याचाच भाजी म्हणून उपयोग होतो. परिणामी आरोग्यास आवश्यक असे पोषण मिळत नाही.
2015-16 साली या परिसरात वाळवण यंत्राचा वेगळा उपक्रम राबवला गेला आणि अनेक महिलांना काम आणि आरोग्यदायी पोषण याचा मार्ग मिळाला. आमच्या या महिला आनंदाने भरभरून आपले अनुभव सांगतात. हातमाळीची लैला अफसर शहाला घरखर्चासाठी हातभार लावता आला. वाळवलेल्या भाजीच्या विक्रीतून नवऱयाने घेतलेल्या गाडीचे तीन हफ्ते फेडता आल्याचं शकुंतला घायट सांगते. तर गीता पडूळचा अनुभव वेगळाच. ती सांगते, ‘भाज्यांसोबत मोड आलेली कडधान्यं, कांदा, आलं वाळवल्याने कांदा महाग झाला तरी नुकसान झाले नाही. वाळवलेल्या भाज्यांतून पैसेही मिळाले आणि वर्षभर खायलाही मिळाल्या.’
संभाजीनगर, फुलंब्री तालुक्यातील या सात-आठ गावांतील तब्बल दीड-दोनशे जणीच्या अशा प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतील. ही किमया साधली वाळवण यंत्राने. सायन्स फॉर सोसायटीच्या वैभव तिडके याने बनवलेल्या या वाळवण यंत्राचा (सोलार कंडक्शन ड्रायर) या भागातील अनेक महिलांना लाभ झाला. हे वाळवण यंत्र प्रत्यक्ष व्यवहारोपयोगी बनवून गरजू महिला या यंत्राचा वापर करतील, यासाठी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संस्थेने यात सहभाग घेतला. ज्यांच्याकडे थोडीफार शेती आहे व स्वतः पावसाळ्यापुरता भाजीपाला घेतात अशा 200 महिलांना हे यंत्र दिले गेल्याने वाळवण यंत्राची उपयोगिताही तपासता आली. अशा प्रकारे चारशे महिला या उपक्रमात सहभागी झाल्या. प्रत्येक गावातून एक प्रमुख असे ऊर्जामित्र निवडण्यात आले. प्रत्येक गावात भाज्या वाळवण्याच्या पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले. ऊर्जामित्राची भूमिका महत्त्वाची होती. महिलांनी वाळवायला सुरुवात तर केली, पण त्याचे सातत्य राहावे, त्याचा आहारात उपयोग वाढावा, त्यापासून चार पैसे मिळावेत यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. यासोबतच महिलांच्या आहाराचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात ज्यांच्याकडे सौर वाळवण यंत्रे आहेत त्यांच्या आहारातील पोषण घटक विविधतेचे प्रमाण जास्त आढळून आले.
महिला वाळवण यंत्राचा उपयोग करायला तर शिकल्या होत्या, पण आता खरी गरज होती त्या मालाच्या विक्रीतून त्यांना चार पैसे मिळण्याची. यासाठी सायन्स फॉर सोसायटीनी मुंबईच्या ग्राहकपेठेशी संपर्क केला व अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. महिलांच्या हातात घरबसल्या पैसे आले. पोषक आहार मिळाला आणि महत्त्वाचं म्हणजे या महिला सक्षम झाल्या.
तिथून पुढे मागच्या तीन वर्षांत या महिला कधी मागे हटल्या नाहीत. उलट यातील तीन जणीनी एकत्र येऊन स्वतःच्या अर्धा एकर जागेवर ऊर्जामित्र नावाने JLG- joint liability group स्थापन करून एकत्रित हा उद्योग हाताळला. आलं, हळद, बीटरूट, कांदा, लसूण अशी दरवर्षी या उद्योगात भर पडत गेली. आपल्यासारख्या इतर शेतकरी महिलांना पण यात सहभागी करून घ्यावे व विस्तारीत होऊन इतरांना पण या सबलीकरणाच्या प्रक्रियेत आणावे अशी इच्छा ऊर्जा मित्रांच्या मनात तरळू लागली. दरम्यान सायन्स फॉर सोसायटीने औरंगाबाद शेंद्रा एमआयडीसीत पण आपली अन्नमाल प्रक्रिया कंपनी उभारली. इकडे ज्यांनी ऊर्जामित्र म्हणून काम पहिले अशा सहाजणी व उद्योग म्हणून रस घेणाऱया इतर चार जणी अशा दहा जणींची शेतकरी उत्पादक कंपनीकडे वाटचाल सुरू झाली. संस्थेच्या सहकार्याने आणि नाबार्ड पुरस्कृत WE – We For Empowerment ही महिला शेतकरी उत्पादक कंपनी सप्टेंबर 2020 मध्ये नोंदणीकृत झाली. त्यातील वेगवेगळी प्रशिक्षणं या महिलांनी पूर्ण केली. हाच उद्योग पुढे चालवण्याचा निर्धार झाला. यांच्या 278 सभासदांकडे सध्या हे सौर वाळवण यंत्र आहे. प्रत्येक संचालक मंडळानी आपल्या गावात एक टोमॅटो वाळवण युनिट उभे करण्याचे निश्चित केले आहे. यातील दोन युनिट सध्या सुरू आहेत. दिवसाला सध्या दोनशे किलोवरून एक टन प्रतिदिवस इतके उत्पादन वाढविण्याचा त्यांचा प्रयास आहे. असे 10 युनिट ही कंपनी उभारणार आहेत. पाचशे महिला भागधारक व्यावसायिकांना कंपनीला हा उद्योग सुरू करून द्यायचा आहे.
या महिलांचा कामाचा आवाका व उत्साह पाहून सायन्स फॉर सोसायटीने डिसेंबर 2020 मध्ये शेतकरी उत्पादक कंपनीसमोर औरंगाबाद शेंद्रा एमआयडीसीतील कंपनी चालवण्याचा प्रस्ताव ठेवला. संचालक मंडळाने कंपनीला भेट देत जबाबदारी निश्चित करून घेतली आणि एकमताने ही कंपनी चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
ही तर “WE” ची सुरुवात आहे, अजून खूप पल्ला गाठायचा आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी व वातावरणातील बदलांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी उद्योजक, शासन, स्वयंसेवी संस्था आणि समाज यांनी एकत्र येऊन काम केल्यास या पाऊलवाटा विकासाच्या मळवाटा नक्की बनतील हा विश्वास या प्रयोगामुळे सार्थ ठरला. या प्रयोगामुळे काय साध्य झालं असा विचार ‘महिला दिना’च्या पार्श्वभूमीवर केला तर या महिलांनी जणू त्यांच्या अमर्याद अवकाशालाच स्पर्श केल्याचं आपल्याला दिसून येईल. अवकाशाचा हा परीघ असाच विस्तारत जावो, याच महिला दिनानिमित्त अपेक्षा.
(लेखिका सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या संस्थापक, विश्वस्त आहेत.)





























































