विशेष : रामेश्वरनाथ काव आणि डोवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रतीक राजूरकर

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या महत्त्वाच्या पदावर कार्यरत अजित डोवाल यांची प्रतिमा जनमानसात अधिक उजळावी यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत. पंदहारला उपस्थिती, पाकिस्तानात सात वर्षे हेरगिरी, सर्जिकल स्ट्राईक, बलुचिस्तानचे संभाव्य स्वातंत्र्य  वगळता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार  म्हणून अजित डोवाल  तसे अपयशी ठरले असेच म्हणावे लागेल. उलट रॉच्या निर्मितीनंतर अवघ्या पाच वर्षांत पाकिस्तानची फाळणी व सिक्कीमचा हिंदुस्थानात समावेश इंदिरा गांधी व काव यांनी करून दाखवला. तसे कुठलेच यश डोवाल यांना दाखवता आलेले नाही.

गुप्तचर यंत्रणा ही कुठल्याही राष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाची अशी यंत्रणा आहे. देशातील अंतर्बाह्य संभवित संकटे हेरून नागरिकांची सुरक्षा हे गुप्तचर यंत्रणांचे आद्य कर्तव्य. सध्याची गुप्तचर यंत्रणा ही देशाची बाह्य सुरक्षा वाऱ्यावर सोडून देशांतर्गत नागरिकांच्याच स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे कार्य पार पाडताना दिसते आहे. काँग्रेसच्या काळात अशी प्रकरणे झालीच नाहीत असे ठामपणे कुणीही म्हणणार नाही. मात्र आम्ही इतरांपेक्षा वेगळे असल्याचे छातीठोकपणे सांगणारे केवळ आत्मस्तुतीत मग्न आहेत. इंदिरा गांधींच्या राजवटीतील गुप्तचर यंत्रणा आणि 2014 नंतरची गुप्तचर यंत्रणा यात बरेच मोठे अंतर आहे असे ठामपणे म्हणता येईल. नुकताच श्रीनगरजवळ पोलिसांवर झालेला हल्ला हा गुप्तचर यंत्रणांच्या    अपयशाच्या यादीत अधिकच भर घालणारा ठरला आहे.

कालांतराने गुप्तचर यंत्रणा या अधिक प्रगल्भ व आधुनिक होणे अपेक्षित आहे. परंतु इंदिरा गांधींच्या राजवटीत गुप्तचर यंत्रणा या अधिक प्रभावशाली होत्या. विज्ञान, तंत्रज्ञान, शस्त्रशास्त्रात झालेली प्रगती ही गुप्तचर यंत्रणेच्या यशात अधिक परिणामकारक दिसणे गरजेचे असताना पेगॅसससारख्या प्रकरणांनी गुप्तचर यंत्रणा बाह्य शत्रूंपासून सुरक्षितता निर्माण करण्याऐवजी राजकीय हितशत्रूंवर पाळत ठेवणाऱया यंत्रणा असल्याचे प्रतीत होताहेत. हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणा अधिकाधिक व्यापक होण्याऐवजी त्यांचे होत असलेले अवमूल्यन अधिक चिंताजनक ठरते.

बाह्यस्तरावर गुप्तचर यंत्रणेच्या गेल्या साडेसात वर्षांतील अपयशाची यादीसुद्धा मोठी आहे. पठाणकोट व उरी येथील सैनिकी स्थळांवरील अतिरेकी हल्ला, पुलवामा, चीनची हिंदुस्थानच्या सीमेलगत होत असलेली घुसखोरी यांसारख्या घटनांनी विद्यमान हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणेचे अपयश दुर्दैवाने समोर आले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या महत्त्वाच्या पदावर कार्यरत अजित    डोवाल यांची प्रतिमा जनमानसात अधिक उजळावी यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत.

अजित डोवालांच्या बाबतीत एक आभासी प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न 2014 सालापासून सुरू झाला. समाज माध्यमात    अजित डोवालांचे आकर्षक नाव देऊन फॅन पेज सुरू करण्यात आले. त्या संकेतस्थळांवर अजित डोवाल यांच्या कार्याबाबत काहीच माहिती नसून केवळ भाजपचा प्रचार केला जातो. अजित डोवाल हे सात वर्षे पाकिस्तानात गुप्तचर म्हणून कार्यरत होते. डोवालांची नियोजनपूर्वक प्रतिमा उभी करताना ते पाकिस्तानात हेर म्हणून वास्तव्यास असताना त्यांचे टोचलेले कान यामुळे पाकिस्तानातील हिंदूने ते मुसलमान नसल्याचे ओळखल्याचे सांगण्यात येते. वास्तविक गुप्तहेरांच्या क्षेत्रात अतिशय सूक्ष्म काळजी घेऊन मोहिमेवर पाठवले जाते. वेरा एटकिन्स (Vera Atkins) नामक ब्रिटिश गुप्तचर अधिकारी ही दुसऱया महायुद्धात फ्रान्सला गुप्तहेर पाठवण्याची जबाबदारी सांभाळत होती. एका गुप्तहेराला फ्रान्सला पाठवण्याचे वेराने निश्चित केले, परंतु त्या गुप्तहेराचे दात हे इंग्लंड येथील दंतवैद्याकडून बसवण्यात आले होते. फ्रान्स येथील दंतवैद्यांची पद्धत वेगळी असल्याने त्या गुप्तचराला फ्रान्स दंतवैद्यासारखे दातांवर उपचार करण्यास वेराने सांगितले. गुप्तचर यंत्रणेतून निवृत्ती पत्करल्यावर वेराने एका मुलाखतीत आपल्या गुप्तचर यंत्रणेतील आठवणींना उजाळा दिला. यावरून गुप्तचर यंत्रणा किती सूक्ष्म सावधगिरी बाळगतात याचा अंदाज येतो. मात्र याबाबत डोवालांची असामान्य अशी आभासी प्रतिमा निर्माण करणाऱयांचे कान कुणी टोचावेत असे अधिकारवाणीने सांगणारे दुर्दैवाने आज कुणी नाही.

अजित डोवालांचा जन्मदिवस आणि रॉचे निर्माते रामेश्वरनाथ काव यांची पुण्यतिथीची तारीख एकच आहे. काव यांचा पराक्रम, उपलब्धीची इतिहासाने नोंद घेतली आहे. काव यांच्या पुण्यतिथीला त्यांची साधी आठवण आज भाजप तर दूरच, परंतु काँग्रेसकडून केली जात नाही. ज्या रामेश्वरनाथ काव यांनी इंदिरा गांधींना आंतरराष्ट्रीय पातळीवर एक सशक्त महिला नेता म्हणून सन्मान मिळवून दिला तेच काव आज विस्मृतीत गेले. बांगलादेशची निर्मिती, सिक्कीमचा हिंदुस्थानी गणराज्यात समावेश करण्यात काव यांचे योगदान अविस्मरणीय आहे. जागतिक स्तरावर पहिल्या दहा गुप्तचर अधिकाऱयांत काव यांचे नाव अग्रस्थानी आहे. अशा रामेश्वरनाथ काव यांना आपली आभासी प्रतिमा निर्माण करण्याची अथवा होऊ देण्याची कधीही गरज वाटली नाही हेच त्यांचे मोठेपण आहे. म्हणायला काव यांच्यावरील ‘जेंटलमन स्पायमास्टर’ या गोखलेंच्या पुस्तकाला डोवालांची प्रस्तावना लाभली हे डोवालांचे भाग्य. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणेवर जी पुस्तके लिहिली गेली त्या सर्व पुस्तकांत काव यांचा गुप्तचर यंत्रणेतील प्रत्येक अधिकाऱयाने आवर्जून आदरपूर्वक उल्लेख केलेला आढळतो.

कंदहारला त्यांची उपस्थिती, पाकिस्तानात सात वर्षे हेरगिरी, सर्जिकल स्ट्राईक, बलुचिस्तानचे संभाव्य स्वातंत्र्य वगळता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तसे अपयशी ठरले असेच म्हणावे लागेल. उलट रॉच्या निर्मितीनंतर अवघ्या पाच वर्षांत पाकिस्तानची फाळणी व सिक्कीमचा हिंदुस्थानात समावेश इंदिरा गांधी व काव यांनी करून दाखवला. तसे कुठलेच यश डोवाल यांना दाखवता आलेले नाही. तूर्तास डोवाल यांची साडेसात वर्षांतील उपलब्धी जयराम रमेश यांनी 2020 साली दिल्ली उच्च न्यायालयातील मानहानीच्या खटल्यात पुत्र विवेक डोवाल यांची मागितलेली माफी व शौर्य डोवाल यांचा सुरू असलेला पक्षीय प्रचार इतकीच आहे!

– [email protected]