गुरुपौर्णिमेचा संदेश

>> प्रा वि. ल. धारुरकर

महर्षी व्यासांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा केला जातो. गुरूचे ज्ञान किती अगाध असते आणि ते ज्ञान कोणकोणत्या पैलूंना स्पर्श करून शकते याचा प्रत्यय व्यासांनी आपल्या उभ्या आयुष्यात घडवला. ज्ञान, विज्ञान आणि संस्कृती यांच्या प्रकट रूपाचे भारताला नवे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करणे हाच खरा गुरुपौर्णिमेचा संदेश आहे. समाजाला दिशा देणाऱया गुरूंचे हे अगाध, तेजस्वी आणि ज्ञानवर्धक रूप पाहिले असता वर्तमान युगातसुद्धा अशा प्रज्ञाभास्कराची आणि गुरुजनांची राष्ट्रजीवनात गरज आहे.

महाकाव्य काळातील एक अत्यंत आदरणीय आणि सन्माननीय आणि प्रज्ञाभास्कर म्हणून महर्षी व्यासांचे वर्णन केले जाते. महाभारताची मांडणी, पुराणांची रचना आणि वेदांची पुनर्रचना करण्यात वेदव्यासांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे वेदव्यासांचे नाव घेतल्याशिवाय आणि त्यांचे योगदान अभ्यासल्याशिवाय भारतीय प्राच्य विद्यांचे आकलन करणे शक्य होणार नाही. पराशर मुनींचे ते पुत्र होते. परंपरेनुसार पराशर मुनी हे वसिष्ठ ऋषींचे पुत्र मानले जातात. ती ज्ञानपरंपरा ऋषिकुलातून विकसित झालेली असल्याचे दिसून येते. व्यास हे ‘कृष्णद्वैपायन’ या नावानेही ओळखले जातात. त्यांची दोन मंदिरे बनारसमध्ये आहेत. तसेच महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेवर एक सरस्वतीचे मंदिर असून तेथील गुहेमध्ये व्यासांनी काही रचना केल्या आणि महाभारताचा काही भाग रचला गेला, असे सांगितले जाते. त्यामुळेच या ठिकाणी जाऊन सरस्वतीपूजा केल्यानंतरच अध्ययन आणि अध्यापनाला सुरुवात करण्याची महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथे परंपरा होती.
व्यासांनी महाभारत लिहिले, अनुभवले. महाभारत आणि वेदांच्या रूपाने प्रकट झालेल्या ज्ञानाचा तेजस्वी असा द्वीप व्यासांनी प्रज्वलित ठेवला, त्याचा आदरही केला. त्याचे तेजस्वी स्वरूप व्यासांच्या प्रतिभेची साक्ष पटवते. त्यांनी संस्कृत साहित्याचा, नाटकाचा, काव्याचा भरभक्कम पाया घातला. त्यामुळे प्राचीन विद्या आणि संस्कृत साहित्य यांची भरभक्कम अशी बैठक घातली गेली. व्यासांना जगाचे जेवढे आकलन झाले तेवढे कुणालाही झाले नाही अशा प्रकारचे संस्कृत सुभाषित आहे. त्यांचे साहित्य विशाल, सर्वस्पर्शी आणि भारतीय संस्कृतीच्या मूल्यावर आधारलेले आहे. त्यामुळे व्यासांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

गुरूचे ज्ञान किती अगाध असते आणि ते ज्ञान कोणकोणत्या पैलूंना स्पर्श करू शकते, याचा प्रत्यय व्यासांनी आपल्या उभ्या आयुष्यात घडवला. त्यांच्या ज्ञानाचा साक्षात्कार भारतात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातसुद्धा राहिला. द्वापारयुगातील व्यास कलियुगातील भारतीय जीवनाची जडणघडण करण्यास तेवढेच सुसंगतपणे प्रभावी ठरले आहेत. त्यांच्या ज्ञानवैभवाभोवती निर्माण झालेल्या भारतीय संस्कृतीच्या महानतेचे स्वरूप विविध पैलूंनी लक्षात घेण्यासारखे आहे. ज्ञान, कर्म, उपासना या तिन्हीबरोबरच विज्ञान आणि विवेक याची जपणूकही व्यासांच्या साहित्यातून झालेली दिसते. महर्षी व्यास यांनी महाभारतासारखा संघर्ष पटल उत्तम प्रकारे मांडला आहे. पुराणांचे स्वरूप कसे असावे, त्यांचे वर्गीकरण कसे असावे, रचना कशी असावी याबाबत त्यांनी घालून दिलेली संहिता आणि संपादन केलेला पथदर्शी मार्ग पुढे अनेक ऋषीमुनींनी विकसित केला आणि प्राचीन भारतातील समग्र लोक इतिहास पुराणांच्या रूपाने अमर झाला. पुराणांची अशा प्रकारची शृखंला तयार करणे आणि ती मार्गदर्शक स्वरूपात मांडण्याचे श्रेय महर्षी व्यास यांनाच जाते.

महर्षी व्यास यांचा जन्मदिवस गुरूपौर्णिमा म्हणून साजरा करण्यामागे काही मौलिक वैशिष्टय़े आहेत. भारतीय महाकाव्यांच्या भोवती जे प्रतिमेचे वलय आहे, त्या वलयाचा खरा आधार महर्षी व्यासांच्या ज्ञानप्रक्रियेतून दिसून येतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी भारतात गुरूविषयी असलेल्या सद्भाव व्यक्त केला जातो. गुरू हे ऋषीतुल्य आहेत आणि ते वंदनीय, पूजनीय आहेत हा भाव भारतामध्ये ज्ञानाविषयी असलेल्या अभूतपूर्व सद्भावाविषयीची जाणीव करून देतो. गुरू हे ब्रह्मा, विष्णू, महेश असून ते साक्षात परब्रह्म आहेत ही भारतीय परंपरा आहे. गुरुपौर्णिमा ही गोष्ट पूर्ण चंद्राच्या आविष्काराशी निगडित आहे. तसेच बृहस्पतीच्या तेजस्वी रूपाचे ती द्योतक आहे.

व्यासांच्या ज्ञानानुभवाचे त्रिकालाबाधित स्वरूप आपणांस महाभारतातून दिसून येते. 1 लाख 80 हजार लोकांचा समावेश असणारा महाभारत हा सर्वात मोठा ग्रंथ आहे. व्यासांचा हा विक्रम आजवर कुठल्याही प्रतिभावंताला मोडता आलेला नाही. म्हणजे व्यास, त्यांचे महाभारत, त्यांनी पुराणांची रचना या गोष्टी भारतीय प्राच्य विद्येचा एक मूलगामी आधार बनलेले आहेत. ‘ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधून सापडत नाही’ अशी म्हण आपल्याकडे आहे, पण वसिष्ठ, पराशर, व्यास यांच्या परंपरा भारतीय ऋषीमुनींनी जाज्वल्य आहेत.

अणूचा विचार मांडणारे कणाद ऋषी असो किंवा ज्ञानसामर्थ्याने मूल्यांचा विजय, कौरव आणि पांडवांतील संघर्ष आणि भगवान श्रीकृष्णाने घेतलेली पांडवांची बाजू हे सांगणारे व्यास असोत, या परंपरांवरून हेच दिसते की, ज्ञान अंतिम आहे, श्रेष्ठ आहे. ज्ञानाची पूजा बांधल्यास जीवनातील सर्व प्रश्न सुटू शकतात. राष्ट्राच्या जीवनात अभ्युदयाचा काळ येऊ शकतो. कौरव आणि पांडवांची लढाई ही भौतिक प्राप्तीसाठी नव्हती, तर त्यात मूल्याचा समावेश होता. पांडवांची न्यायाची बाजू श्रीकृष्णाने घेतली आणि त्यांच्या बाजूने सुदर्शन चक्र चालविले आणि भांबावलेल्या अर्जुनाला संघर्षाचा एक नवा मंत्र दिला. त्यातूनच अंधारलेल्या युगातही समस्या सोडवण्यासाठी लढण्याची तयारी दाखवली पाहिजे, असे सांगणारा महाभारतातला अद्भुत विचार पुढे गीतेमध्ये प्रकट झाला आहे. तेव्हा महाभारत, श्रीगणेश, व्यासमुनी यांचे अभिवादन करत भारतीय समाज शतकानुशतके पथदर्शी ज्ञानाला सामोरे जात आहे. जो समाज ज्ञानसन्मुख असतो तो प्रगतीची उच्च शिखरे गाठू शकतो. त्यामुळे ज्ञान, विज्ञान आणि संस्कृती यांच्या प्रकट रूपाचे भारताला नवे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करणे हाच खरा गुरुपौर्णिमेचा संदेश आहे. समाजाला दिशा देणाऱया गुरूंचे हे अगाध, तेजस्वी आणि ज्ञानवर्धक रूप पाहिले असता वर्तमान युगातसुद्धा अशा प्रज्ञाभास्कराची आणि गुरुजनांची राष्ट्रजीवनात गरज आहे.

संगणकासारखे अचूक, नेमके आणि सूत्रबद्ध ज्ञान देणाऱया मूर्ती वेदांची परंपरा ही ज्ञान, विज्ञानावर आधारलेली आहे. ज्ञान, विज्ञान आणि संस्कृती या तिघांच्या एकत्रीकरणातून नवे राष्ट्र उभे राहते. भारताची वाटचाल ही ज्ञानाधारित, संस्कृतिभिमुख राष्ट्र म्हणून झाली आहे. त्याची बैठक महर्षी व्यासांनी घातली आहे. म्हणून महर्षी व्यास हे गुरूंचे गुरू, ऋषींचे ऋषी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रतीकात्मक पूजनातून निर्माण होणारा सामाजिक व सांस्कृतिक संबंध हा सर्व समाजाची ज्ञानपातळी उंचावणारा, राष्ट्राला प्रगतीच्या नव्या दिशा दाखवणारा आहे.

ज्ञान देणे आणि ज्ञान मिळवणे हे जर श्रेष्ठ महर्षीचे काम असेल तर आधुनिक युगात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यावे लागेल. व्यासांनी महाभारत लिहिले तसे डॉ. आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहून देशाच्या वाटचालीला एक पथदीप दाखवला. डॉ. आंबेडकर म्हणतात, ध्येयमंदिराकडे जाताना वाटेत वादळे येतील तेव्हा हातातील नंदादीप तेवत ठेवत ध्येयमंदिर गाठण्याचा प्रयत्न करा. वेदव्यासांनीही असाच प्रयत्न केला.

नव्या युगात नवे व्यास हवेत, नवी उपनिषदे, पुराणे हवीत म्हणून नव्या ज्ञानयुगात नवे सिद्धांत तयार करून भारताला सुजलाम सुफलाम आणि वैभवशाली राष्ट्र बनवण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. राष्ट्राला वैभवाच्या शिखरावर पोहोचवणे हाच खरा व्यासांच्या ज्ञान प्रक्रियेचा सुवर्णयोग ठरेल.
(लेखक ज्येष्ठ विचारवंत आहेत.)