रंगनाट्य – स्त्रीविषयक जाणिवांचा अस्वस्थानुभव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राज चिंचणकर

सामाजिक चौकटीच्या कक्षा रुंदावणारे नाटक स्त्रीविषयक जाणिवांचे संदर्भ घेऊन साधारण तीन दशकांपूर्वी लेखक प्रशांत दळवी यांच्या लेखणीतून कागदावर उतरले. या नाटकाचे अनेक प्रयोग झाले आणि नाटकाला मोठा रसिकाश्रयही लाभला. हीच नाटय़संहिता विषयाचा गाभा तोच ठेवून तीस वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा अवतरत असतानाही त्यातली कथा आणि व्यथा कालबाह्य झाल्यासारखी अजिबात जाणवत नाही. खरे तर हे समाजव्यवस्थेचे अपयश आहे, असा निष्कर्ष काढता येऊ शकेल इथपर्यंत ही संहिता रंगमंचावर स्पष्टपणे बोलत राहते.

प्रशांत दळवी यांच्या ‘चारचौघी’ या नाटकाच्या नव्याने रंगभूमीवर दाखल होण्याच्या निमित्ताने हा विषय पुन्हा एकदा वर्तमानात अवतीर्ण झाला आहे. या नाटकात मांडलेला विषय काळाच्या पटावर तपासून पाहताना आजही तितकाच ताजा वाटतो. त्यायोगे लेखकाने द्रष्टेपणाने काळाच्या पुढचे नाटक लिहून ठेवले होते का? असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. तीन दशके उलटली तरीही यातल्या स्त्रीविषयक जाणिवा आणि संदर्भ आजच्या समाजव्यवस्थेला तसेच लागू होतात, ही दुर्दैवाची गोष्ट! . ‘चारचौघी’ हे नाटक आजही त्यातल्या व्यथा आणि संदर्भांसहित काळाच्या त्याच पावलांवर पावले टाकत सादर होत आहे. सादरकर्ते चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते श्रीपाद पद्माकर यांच्या ‘जिगिषा’ या नाटय़संस्थेने हे नाटक रंगभूमीवर आणून मायबाप रसिकांना, पर्यायाने समाजाला गहिरा अस्वस्थानुभव देत नव्याने विचारप्रवृत्त करण्यास भाग पाडले आहे.

एकपालकत्व अर्थात सिंगल पॅरेंट या सध्याच्या काळात सहजसोप्या झालेल्या संकल्पनेत चपखल बसणारी या नाटकातली आई त्या काळात संहितेत उभी करणे म्हणजे तिला बंडखोरपणा बहाल करण्यासारखे आहे, असे म्हणता येईल. ‘चारचौघी’ या नाटकातली ही आई तिच्या आवडत्या पुरुषासोबत नात्यात अडकून तीन मुलींना जन्म देते आणि समाजात ताकदीने उभी राहत या मुलींचे पालनपोषण करते. वास्तविक, तिथूनच या चारचौघींच्या प्रवासाचा आरंभबिंदू ठसत जातो. अर्थात तिच्या या निर्णयाची पडछाया तिच्या मुलींवर पडणे क्रमप्राप्तचे. उच्चशिक्षित विद्या, मधली वैजू, धाकटी विनी या प्रत्येकीच्या मनोविश्वातून या तिघी त्यांच्या आईसह रंगमंचाचे चार कोन भरून आणि भारून टाकतात.

आईच्या निर्णयाची प्रतिक्रिया कालांतराने विद्याच्या संसारावर थेट उमटली आहे. विद्याचा नवरा जेव्हा दुसऱया स्त्रीकडे आकर्षिला जातो, तेव्हा तर विद्याचा आईविषयक दृष्टिकोन संवादातून थेट बाहेर पडतो, परंतु कुठल्याही प्रसंगाला सक्षमतेने सामोरी जाणारी तिची आई विद्यालाही स्वतःची बाजू सडेतोड पटवून देते. वैजूची गोष्ट अजूनच वेगळी आहे. काहीही न कमावण्याचे तंत्र अंगी बाळगून असणारा तिचा नवरा श्रीकांत स्वतःच्या वतनदार घराण्याच्या विश्वातच दंग आहे. साहजिकच वैजूचे एकूणच जगणे आणि संसारही भरकटला आहे. विनीच्या सोबतीला प्रकाश आणि वीरेन हे तिच्या कॉलेजमधले दोन मित्र आहेत. यातल्या प्रकाशचा बुद्धिप्रामाण्यवाद आणि त्याचवेळी श्रीमंत अशा वीरेनचा बिनधास्तपणा, यांच्या ती प्रेमात आहे. या दोघांशीही तिला एकत्र राहायचे आहे. संहितेत असा हा वैविध्यपूर्ण चार खांबी तंबू भक्कम उभारला गेल्यावर त्यांच्यात घडणारे नाटय़ मनाला भिडणार नाही, अशी शक्यता गृहीतही धरता येत नाही.

लेखक प्रशांत दळवी यांना तीन दशकांनंतर पुन्हा रंगभूमीवर आलेल्या या नाटकात काहीही बदल करावासा वाटला नाही यातच त्यांच्या संहितेचे बांधकाम किती पक्के आहे याची कल्पना येते. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनाही तो काळ आणि व्यक्तिरेखांचे संदर्भ बदलावेसे वाटले नाहीत यातच आजच्या समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब पडल्याचे स्पष्ट होते. काळाच्या ओघात भोवतालचे सर्वकाही बदलले; परंतु माणसाची, पर्यायाने समाजपुरुषाची एखाद्या विचाराकडे किंवा विषयाकडे पाहण्याची दृष्टी तीच राहिल्याचे हे नाटक आपसूक बिंबवत राहते. नाटकाचे संवाद आणि दिग्दर्शकीय कौशल्याला आजची पिढीही सहज स्वीकारते हे या द्वयीचे यश आहे असे म्हणायला हरकत नाही.

संहितेला योग्य न्याय देतील अशा कलावंतांना हेरून चंद्रकांत कुलकर्णी यांनी या नाटकात आधीच बाजी मारली आहे. स्त्र्ााrविषयक जाणिवांना पुरेपूर आत्मसात करत दिग्दर्शकाने पात्रांच्या आकृतिबंधाचा पट मांडताना या चारचौघींच्या मनातली घुसमट आणि अस्वस्थता टोकदार पद्धतीने सिद्ध केली आहे. या नाटकातला विद्याच्या तोंडी असलेला पह्नवरचा लांबलचक संवाद रंगमंचाच्या अवकाशात फेर धरताना दिग्दर्शकाने तिलाही दोन्ही खोल्यांमध्ये वावरत ठेवत तिच्या मनातली आंदोलने अधोरेखित केली आहेत. या संवादाचा कळससाध्य गाठला जात असताना दूरध्वनीची वायर तुटण्यासारख्या योजकतेला दाद देणे क्रमप्राप्त आहे.

रोहिणी हट्टंगडी यांची आई त्या भूमिकेचा ठामपणा आत्मसात करून उभी राहिली आहे. मुलींना समाजात त्यांचे स्वतंत्र स्थान मिळवून देण्यापासून ते वेळोवेळी या मुलींकडून तिच्याकडे रोखले गेलेले बोट तितक्याच सडेतोडपणे उलटवण्यापर्यंतची त्यांच्या भूमिकेची किमया न विसरता येण्याजोगी आहे. मुक्ता बर्वेची यातली विद्या म्हणजे मुक्ताविष्काराचा कळस आहे. तिचा दूरध्वनीवरचा प्रसंग तर नाटकाचा हायलाईट आहेच; परंतु इतर पात्रांच्या सोबतीने वावरताना ही विद्या तिचे अस्तित्व रंगमंचावर सतत ठसवत राहते. मुक्ताने संवाद, स्वर आणि मुद्राभिनातून तिच्या अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे.

कादंबरी कदमने यातली वैजू साकारताना कुठलेही दडपण न घेतल्याचे स्पष्ट दिसते. काही प्रसंगांत तर तिची वैजू फारच भारी पडल्याचे दिसून येते. तिची एकूणच देहबोली लक्षात घेता तिच्यातल्या वैजूचे प्रकटीकरण ज्या आवेशाने येते, ते लक्षवेधी आहे. पर्ण पेठेची यातली विनी वरवर पाहता अवखळ या व्याख्येत बसत असली तरी तिच्यातला ठामपणा लक्षात आल्यावाचून राहत नाही. तिने घेतलेल्या निर्णयाबाबतही ती ज्या पद्धतीने पाय रोवून घट्ट उभी राहते, यातून तिचा निश्चयीपणा प्रकर्षाने समोर येतो.

नाटकाच्या शीर्षकाला प्रमाण मानले तर हे नाटय़ चारचौघींचेच आहे; परंतु या चौघींना साथ देणारे नाटकातले ‘ते तिघे’सुद्धा यात कमाल करतात. यात प्रकाशची भूमिका साकारणारा श्रेयस राजे त्याच्या धीरगंभीर आवाजातून नाटकाचा आशय अधिकच ठोस मांडत जातो. एक नट म्हणून त्याला मिळालेली ही देणगी त्याने आवर्जून जपायला हवी. मोकळाढाकळा श्रीकांत रंगवताना निनाद लिमये याने नाटकातला ताण हलका करण्याचे महत्त्वाचे कार्य बजावले आहे. या पात्रामुळे या नाटकात लाईट मूड जपला गेला आहे. नव्या पिढीचा प्रतिनिधी आणि आधुनिक विचारसरणी धारण करणाऱया वीरेनचे पात्र पार्थ केतकर याने आश्वासकपणे उभे केले आहे. ‘चारचौघीं’सोबतच ‘आम्ही तिघे’सुद्धा या नाटकात आहोत, हे या तिघांनी ठसवण्याची कामगिरी नीट पार पाडली आहे.

संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य एन्ट्री-एक्झिटच्या जागा, रंगसंगती आणि एकूणच बांधकामाच्या दृष्टीने नाटय़ाशयासाठी सूचक वाटते. रवी-रसिक यांची प्रकाशयोजना यातल्या नाटय़ाला पोषक अशी आहे. अशोक पत्की यांच्या लय-संगीताने नाटकातली वातावरणनिर्मिती अधिक प्रभावी केली आहे. प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव यांची वेशभूषा पात्रांना चपखल बसली आहे. उलेश खंदारे यांनी त्यांच्या रंगभूषेतून पात्रांचे मूड अधिकच खुलवले आहेत. थोडय़ाबहुत फरकाने काहीतरी मिळालंय तर काही गमावलंय अशा काहीशा वातावरणात विचारप्रवृत्त करून सोडणारी नाटकातल्या ‘चारचौघीं’ची शेवटची फ्रेम एकूणच हा सगळा अस्वस्थानुभव अधिकच गहिरा करून टाकते.

[email protected]