
>> रणजित श्रीगोड
16 एप्रिल 1853 रोजी हिंदुस्थानात पहिली रेल्वे मुंबई-ठाणे रेल्वे मार्गावर सुरू झाली ती इंग्रजांनी नव्हे तर त्याचे खरे जनक मुरबाडचे उद्योजक नाना जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे यांचे योगदान आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात रेल्वे मार्गाने जाण्यासाठी पुणे मार्गे खंडाळा कर्जत घाटातून व मनमाड नाशिक मार्गे कसारा या घाटातून जावे लागते. आजची परिस्थिती लक्षात घेतली तर ते दोन्ही घाट मार्ग अपुरे पडत आहेत. त्यामुळे कल्याण-मुरबाड-नगर तिसऱया माळशेज घाटमार्गे नव्या रेल्वे मार्गाची निर्मिती ही एक काळाची गरज बनली आहे. ठाणे, पुणे, नगर जिह्याच्या विकासाला संजीवनी देणारा कल्याण-मुरबाड-माळशेज मार्गे नगर हा रेल्वे मार्ग तयार व्हावा ही मागणी जुनीच आहे. मुंबईला जोडणारा हा रेल्वे मार्ग जवळचा ठरणार आहे. ब्रिटिश राजवटीत सरकारने या रेल्वे मार्गाचा सर्व्हेदेखील केला होता. त्यांनादेखील या नवीन रेल्वे मार्गाचे महत्त्व पटले होते. 2004 मध्ये कल्याणचे तत्कालीन खासदार प्रकाश परांजपे यांनी वैयक्तिक लक्ष घालून औद्योगिक विकासाला व माल वाहतुकीला कसा योग्य आहे हे रेल्वे मंत्रालयाला पटवून दिले होते, परंतु याच काळात त्यांचे निधन झाल्याने पुढे फार रेटा निर्माण झाला नाही. पुढे दिनेशचंद्र हुलावळे यांनी माळशेज घाट रेल्वे कृती समितीची स्थापना करून नगर, पारनेर, टाकळी ढोकेश्वर, ओतूर, जुन्नर, मुरबाड, कल्याण, मुंबई असा पायी प्रवास करून निर्धार मेळावे घेऊन जनजागृती केली.
1966 पासून प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासन दरबारी मिळालेले आश्वासन लक्षांत घेता हिंदुस्थानी रेल्वेच्या अति महत्त्वाच्या ‘पिंकबुक’मध्ये या योजनेच्या प्रोजेक्टचा समावेशदेखील असल्याची माहिती पुढे आली आहे. 14 वर्षे सातत्याच्या संघर्षातून 2006 मध्ये सर्वेक्षण झाले. 204 कि.मी. अंतर रेल्वे मार्गाला सन 2009 मध्ये 967 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आले होते. यामध्ये 24 रेल्वे स्टेशन, 17 बोगदे, 19 कि.मी.चा हिंदुस्थानी रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा बोगदा असणार होता. हिंदुस्थानी रेल्वेच्या नकाशावर हा एक ऐतिहासिक नवीन रेल्वे मार्ग ठरणार असल्याने विकासाचे नवे पर्व सुरू होणार असल्याचे चित्र निर्माण झाले. मुंबई, पुणे व नगर असा त्रिवेणी संगम तयार होऊन हा तिसरा रेल्वे घाट मार्ग राज्याच्या कल्याणाचा विषय ठरेल व पुढे हा रेल्वे मार्ग नगर ते बीड या नवीन रेल्वे मार्गाचे काम जोरात सुरू असल्याने बीड, परळी रेल्वे मार्गाला जोडता येईल. पुढे हैदराबाद-विशाखापट्टमला जोडला जाऊ शकतो. पूर्व किनार पट्टीवर असणारे विशाखापट्टम आणि पश्चिम किनार पट्टीवर असणारे मुंबई यांना थेट जोडणारा रेल्वे मार्ग सुखकर होईल. सध्या पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाचे महत्त्व लक्षात घेता या रेल्वे मार्गावरून बायबास (कॉर्डलाइन) रेल्वे मार्ग तयार केल्यास हैदराबाद, विशाखापट्टमला फायदेशीर ठरेल आणि कोकण घाटामधील जोडणारा माळशेज दऱयाघाट, नाणेघाट राज्याचे विकासाचे महाप्रवेशद्वार सुरू होईल. सन 2019 च्या सर्व्हेनुसार कल्याण-मुरबाड 28 कि.मी. अंतराच्या या नवीन रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने 722 कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्य सरकारचा 50 टक्के सहभाग असून 31 मार्च 2023 पर्यंत हा रेल्वे मार्ग पूर्ण होण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. उल्हासनगर, विठ्ठलवाडी, आपटी, पोटगाव आणि मुरबाड ही रेल्वे स्टेशने असतील. हा रेल्वे मार्ग रेल्वेला फायदेशीर व उपयुक्त राहील असा विश्वास रेल्वेच्या तज्ञ अधिकाऱयांचे मत आहे. याकरिता राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याने राजकीय दबाब गट व वज्रमूठ आवळणे जरुरीचे आहे. ज्या मार्गाला या नवीन रेल्वे मार्गाचा उपयोग होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने 50 टक्के आर्थिक सहभाग देण्याची तयारी दर्शविली तर या नव्या रेल्वे मार्गाच्या निर्मितीचे स्वप्न पाहावयास मिळेल असा विश्वास वाटतो. हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ हे मुरबाडचे असल्याने त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी हिंदुस्थानी रेल्वेत उभ्या राहतील. या मार्गाची निर्मिती हीच खऱया अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरेल! ऐतिहासिक कल्याण-मुरबाड तिसऱया माळशेज घाट नगर, नगर ते बीड परळी व पुढे हैदराबाद विशाखापट्टम हा सुखकर प्रवास गतिमान होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.
(लेखक महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष आहेत)



























































