खाऊच्या गोष्टी : गरमागरम भजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

कुणाला जिंकून घ्यायचं असेल, तर त्याचा मार्ग पोटातून जातो, असं म्हटलं जातं. चमचमीत, स्वादिष्ट पदार्थ खवय्यांच्या जिभेला तृप्त करतात. प्रत्येक खवय्याच्या मनाच्या कप्प्यात काही खाद्यपदार्थांना विशेष जागा असते. असेच काही खास पदार्थ, त्यांच्या उगमाची कहाणी आणि कालांतराने त्याच्या रेसिपीत झालेले बदल यांची खमंग- लज्जतदार माहिती ‘खाऊच्या गोष्टी’ सदरातून…

देशभरातील एकूण एक प्रांतात लोकप्रिय असणाऱया भजीची ही तितकीच चटपटीत खमंग गोष्ट. सोशल मीडियावर आपण अनेक विनोद अनुभवत असतो. पावसाळा आला की कांदे-बटाटय़ांनी बेसनाच्या मिश्रणात स्वतःला लपेटून उकळत्या तेलात उडी मारणं त्यांचे आद्य कर्तव्य आहे वगैरे वाचून छान मनोरंजन होतं. पण त्या पलीकडे खरोखरंच पावसाळा आणि भजी यांचं नातं घट्ट आहे.

या भजीला देशभरात अनेक नावांनी संबोधलं जातं. गुजरातमध्ये भजीया, उत्तर हिंदुस्थानात पकोडे, आंध्र प्रदेश, कर्नाटकात पकोडी, पश्चिम बंगालमध्ये तुम्ही ही भजी कशी आणि कधी खाता त्यावरुन बोरा किंवा चॉप अशी या भजीची विविध संबोधनं आहेत.

हिंदुस्थानी भोजनाचे ‘पक्का स्वयंपाक’ 39; आणि ‘कच्चा’ असे दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते. कच्चा म्हणजे केवळ उकडलेला आणि पक्का म्हणजे व्यवस्थित शिजलेला. त्या पक्क्या स्वयंपाकात ‘पक्ववट’ असा शब्द प्राचीन काळी वापरला जाई. ‘पक्व’ म्हणजे शिजलेले आणि ‘वट’ म्हणजे गोल. त्यातूनच पक्ववट ते पकोडे असा प्रवास या आपल्या लाडक्या भजीने केला.

चण्यांचा आणि चण्याच्या पिठाचा उल्लेख हिंदुस्थानी जेवणात खूप पूर्वापारपासून होता. मोगल काळात कोणत्याही मांसाहारी ग्रेवीला घट्ट बनवण्यासाठी बदाम पूड वापरली जायची. सर्वसामान्यांना हे परवडणारे नव्हते. मग त्यावर उपाय म्हणून बेसनाचा वापर दाटपणासाठी होऊ लागला. त्यातूनच कुणा आचाऱयाला किंवा सुगरणीला बेसन पीठ तळल्यावर होणाऱ्या कुरकुरीतपणाचा शोध लागला. त्यानंतर शाकाहाराचं महत्त्व जपत भाज्या किंवा कंदांना बेसन पिठात लपेटत अधिक खमंग, कुरकुरीत करणारी ही भजी जन्माला आली.

भजी केवळ हिंदुस्थानातच लोकप्रिय आहे असं नाही. परदेशातही ‘इंडियन स्नॅक्स’ म्हणून ती कौतुकाने मिरवते. काही देशांनी इथल्या भजीला उचलून आपापल्या देशातील संस्कृतीप्रमाणे बदलल्याचेही दिसते. 16 व्या शतकात स्पॅनिश, पोर्तुगीज खलाशी जपानच्या मार्गावर असताना हिंदुस्थानात काही काळ विसावा घेत. अशा वेळी हिंदुस्थानी खानसाम्यांना बोटीत घेतलं जाई. त्यांच्याकडून अस्सल हिंदुस्थानी स्वादाचे पदाथ बनवून घेतले जात. असेच काही हिंदुस्थानी आचारी जपानमध्ये पोहचले असावेत. खाद्यसंस्कृतीचं आदानप्रदान झालं असावं आणि त्यातून जन्मला भजीसदृश जपानी टेम्पुरा.

एकूण काय! तर सगळय़ा जगभरात हिंदुस्थानी भजी प्रसिद्ध आहेत. झटपट तयार होणारा पदार्थ असल्याने नाक्यानाक्यावर भजीच्या गाडय़ा आपल्याला दिसतात. सध्याच्या प्रयोगशील जगात सगळय़ा प्रकारच्या भाज्यांची भजी बनते.

हॉटेलमधले हे आचारी एकदम हुशार. असे दरवाजातच मोठी कढाई घेऊन भजी तळायला बसणार. तो गंध नाकातून थेट जिभेला आव्हान कधी देतो आणि आपल्या मुखात भजी कधी विसावते कळतच नाही.

मस्त पावसाळी हवा असावी. गप्पांची मैफल रंगलेली असावी. गप्पा समेवर कधी येणार हे ओळखणारी चतुर सुगरण असावी. दाटलेल्या बेसनात स्वतःला गुंडाळून कांदा, बटाटे, मिरची, तेलात मस्त न्हाऊन कुरकुरीत होत आपल्या समोर यावेत आणि वाफाळलेल्या चहासोबत भजीचा एकेक तुकडा जिभेवर रेंगाळावा… मला सांगा सुख म्हणजे वेगळं काय असतं?

– पावसाचं नातं अनेक गोष्टींशी जोडलं गेलं आहे. पाऊस म्हणजे गारवा. पाऊस म्हणजे मातीचा गंध. पाऊस म्हणजे हिरवळ. पण अस्सल खवय्यांसाठी पाऊस म्हणजे गरमागरम चहा आणि भजी.