जिगरथंडा फालुदा !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

परकीय प्रांतातून आलेले आणि या मातीत रुजलेले अनेक पदार्थ आहेत. त्यातील एक पदार्थ म्हणजे फालुदा. फालुद्याचं मूळ फालुदेह नामक पर्शियन पदार्थात आहे. ‘पालुदान’ या शब्दापासून फालुदेह आणि नंतर फालुदा हा शब्द जन्माला आला. विविध समारंभांना, खास मेजवान्यांमध्ये हा पदार्थ पर्शियन मंडळी आवडीने खात. विशेष करून जमशेदी नवरोजच्या दिवशी फालुदा हमखास बनवला जाई. ख्रिस्तपूर्व 400 काळापासून या पदार्थाचा उल्लेख होत आलेला आहे.

मुघलांनी पर्शियावर केलेल्या आक्रमणातून फालुदा ही पाककृती मुघलांना कळली आणि तिथून मुघलांमार्फत ती हिंदुस्थानात पोहोचली. पर्शियात रोज सिरप, शेवया, सब्जा, दूध अशा साध्या रुपात खाल्ला जाणारा हा पदार्थ मुघलांनी त्यांच्या पद्धतीने शाही बनवला. आपल्याकडे सध्या मिळणाऱया फालुद्यातील बदाम पिस्ते ही मुघलांची देणगी. सुरुवातीला कुल्फी आणि फालुदा हे मिश्रण आवडीने खाल्ले जायचे. आजही कुल्फीचा वापर होतो. पण आईस्क्रीमच्या आगमनानंतर कुल्फीचे महत्व थोडं कमी झालं.

मुख्य करून हिंदुस्थान, पाकिस्तान बांग्लादेश हे देश फालुद्यासाठी जगप्रसिद्ध आहेत. पण अन्य देशांतही फालुदा आवडीने खाल्ला जातो. फक्त त्याचं स्वरूप वेगळं असतं. म्यानमारमध्ये फालुद्यात फळं, फ्रूट जेली, अंडय़ाचे पुडिंग वापरले जाते. फिलीपिन्स मंडळी त्यांच्या पारंपरिक ‘हालो हालो’ नामक गोड पदार्थांसोबत फालुदा खातात. मलेशिया आणि सिंगापूर इथे फालुदा जेली, फळं यांच्यासह सेंडल नावाने खाल्ला जातो. मॉरिशसमध्ये हाच फालुदा अलौंदा नावाने खाल्ला जातो ज्यात बबल टी, स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला सिरपचा वापर असतो. या व्यतिरिक्त स्थानिक पातळीवर फालुद्याची वेगवेगळी रुपे पाहता येतात. त्यापैकी सगळ्यात फेमस मदुराईचा जिगरथंडा. पण या जिगरथंडाची खासियत त्यातल्या बदाम पिसीनमध्ये आहे. बदामाच्या झाडाचा डिंक किंवा चिक म्हणजे बदाम पिसीन.

या बदाम पिसीनचे तीन-चार खडे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले जातात. साधारण एका ग्लाससाठी एक खडा असं प्रमाण. सकाळी त्या तीन ते चार खडय़ापासून बाऊलभर जेलीसदृश पदार्थ तयार होतो. ‘जिगरथंडा’मध्ये हा जेलीसदृश पदार्थ अत्यावश्यक असतो. मदुराईतला हा फेमस जिगरथंडा दुकानात ग्लासात तयारच असतो. फक्त आपल्याला हवं असलेलं आईस्क्रीम आणि सरबत टाकून ते दिलं जातं. काळजाला गारेगार करणारा हा जिगरथंडा म्हणजे फालुद्याचं एकदम भारी रुपडं. अशा या गोड फालुद्याचं नातं ‘इज्जतका फालुदा’ शी कसं जुळलं याचं राहून राहून आश्चर्य वाटतं. पण फालुद्यातल्या कुस्करलेल्या शेवयांशी या इज्जतका फालुद्याचा संबंध आहे. अब्रूचा चुराडा या अर्थाने हा शब्द वापरला जातो.

 वास्तविक एखाद्या पदार्थातील वेगवेगळ्या पदार्थांची सरमिसळ आपल्या जिभेला गोंधळात टाकणारी असते. मात्र फालुद्याचं तसं नाही. त्यातल्या शेवया, जेली, आईस्क्रीम, सब्जा यांच्या अलग अलग चवीची मजा घेतानाच एकत्रितपणे त्याचा आस्वाद कलेजे मे थंडक तयार करतो. समोर अखंड ठासून भरलेला फालुद्याचा ग्लास आल्यावर,बापरे! हे सगळं कसं संपणार? याची चिंता वाटू लागते. आईस्क्रीम चाखत, आतलं मिश्रण स्ट्रॉने ओढत, चमच्याने शेवया ओरपत, मध्येच दातात येणाऱया सब्जाला अनुभवत, ग्लासातील जेली शोधत फालुद्याचा तळ कधी गाठतो कळतच नाही. कामगिरी फत्ते केल्याच्या थाटात आपण उठतो तेव्हा उरलेला असतो एक जिगरथंडा गारेगार अनुभव!