साहित्य जगत- व्यक्त-अव्यक्तच्या सीमा रेषेवर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रविप्रकाश कुलकर्णी

प्रत्येकाला काहीतरी व्यक्त करायचं असतं. विशेषत कलावंतांना. अशा वेळी तो स्वतच्या प्रकृतिधर्मानुसार माध्यम निवडतो. लेखक असेल तर तो शब्दांत व्यक्त करतो. चित्रकार असेल तर चित्रातून व्यक्त होतो. गायक असेल तर शब्द-सुरांची मदत घेऊन तो स्वतची दुनिया निर्माण करत असतो. थोडक्यात, प्रकट होण्याची माध्यमे वेगवेगळी असतील, पण उद्दिष्ट एकच! काहीतरी सांगण्याची ऊर्मी हे नक्की. काही वेळा एवढंच पुरेसं नसतं किंवा आहे त्यापेक्षाही अधिक काही सांगावंसं वाटतं. अशा वेळी तो आहे त्या माध्यमाऐवजी दुसऱया माध्यमाकडे वळतो. जसं की, लेखक लेखनाबरोबरच सोबत स्वतच काढलेली चित्रं देतो किंवा चित्रकार आपल्याला काय म्हणायचं आहे ते शब्दांत व्यक्त होतो. कधी कधी मग ती कहाणीच्या मागची कहाणी असते किंवा पडद्यामागची गोष्ट असते. जी कलास्वादामध्ये भरच टाकणारी असू शकते. ज्याचं वर्णन आहे त्यापेक्षा अधिक काही असं करू शकतो.

हा अनुभव घ्यायचा असेल तर गमभन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेलं विद्याधर म्हैसकर यांचं ताजं पुस्तक, ‘रेषांतर’ पाहावं आणि अर्थात वाचावंही. विद्याधर म्हैसकर हे चित्रदर्शी लेखक आहेत. म्हणजे त्यांचं लेखन वाचताना तुमच्या समोर मनात एक चित्र उभं राहतं, पण त्यांना तेवढय़ाने समाधान होत नाही म्हणून ते त्यासोबत स्वत काढलेली चित्रं, रेखाचित्रं देतात. या त्यांच्या संयुक्त प्रयोगातून वाचकाच्या मनात आणखी एक चित्र उभं राहतं. हे लेखक म्हणून आणि चित्रकार म्हणून त्यांना मिळालेलं यश आहे. हा अनुभव त्यांची पूर्वीची पुस्तकं…‘पक्षीगण उठले’, ‘विहंग विहार’ वाचताना तर येतोच, शिवाय या सगळ्याचा मथितार्थ म्हणजे त्यांनीच सांगून टाकलाय… रेघांचिये संगे! अर्थात हे सगळं ‘रेघांचिये संगे’ या नावाच्या पुस्तकात त्यांनी सांगितलेलं आहेच. त्या वाटेवरचंच त्यांचं नवं पुस्तक ‘रेषांतर’ आहे असं म्हणता येईल.

रेखाटन करणे हा म्हैसकरांच्या स्वभावाचाच स्थायीभाव आहे. ते सांगतात, “अनुभव असा आहे की, चालता चालता मी थबकतो. माझं थांबणं माझ्या अंतर्मनाच्या इशाऱयानुसार असतं. ते म्हणतं, ‘थांब थांब’…त्याबरोबर मी थांबतो. चालण्याच्या नादात दोन पावलं पुढे गेलेला असतो. पुन्हा मागे येतो. नेमक्या जागी उभा राहतो. ‘आता बघ’ अशी सूचना मिळताच नजर टाकतो. त्याच क्षणी घुंगट घेऊन बसलेला चित्रार्थö मग ती व्यक्ती असो वस्तू किंवा वास्तू असो- तो प्रकट होतो. तो एक धक्काच असतो… सुखद समाधानाचा, दुःखद वेदनेचा. तो विसरता येत नाही. रेखाटन होऊन जाते. हा अनुभव मला हवासा वाटतो. मी बोलत राहतो, चित्रकथा सांगत जातो. त्यात मग कोणत्या गोष्टी येतात?” त्यांच्याच शब्दांत, “जीवन क्षणभंगूर असलं तरी वाटय़ाला आलेले क्षण अनंत असतात. त्यातील कितीतरी हरवतात, घरंगळून जातात. हाती थोडकेच लागतात. पकडून ठेवलेल्या क्षणचित्रांना मी शब्दरूप दिलं आहे. त्यातील व्यक्ती, मुके प्राणी आणि घटना, प्रसंग साधे असले तरी त्यांनी माझ्या चरित्रात स्थान पटकावलं आहे.”

कित्येकदा तर चित्र तसं बघितलं तर साधंसुधं दिसतं. उदाहरणार्थ, एका चित्रात जोडे आणि खुरपं दरवाजाबाहेर पडलेलं दिसतं. कुणालाही वाटेल, त्यात काय आहे वेगळं असं? पण त्याच्या सोबतचा मजकूर पहा. लेखक लिहितो, ‘थांबा, तिथंच थांबा. आत येऊ नका.’ असं म्हटल्यावर कोण आत येईल? ज्यांनी तुमच्यासाठी तुमच्या बरोबरीने दगडधोंडय़ांत, काटय़ाकुटय़ांत साथ दिली, तुमच्यासाठी चिवट हरळीची खोल शिरलेली मुळं खणून खुरपून काढली, त्याच साथीदाराला उन्हात राबराब राबल्यावर विश्रांतीसाठी घरात आपण येऊन बसायचं अन् त्या दोघांनी बाहेरच पायरीवर भर उन्हात पोळत उभं राहायचं? बरोबर आहे का? हे केवळ रेषांतर नाही, तर म्हैसकरांची तरल कविताच आहे. ती जोडे आणि खुरपं प्रतीकं बनतात आणि खऱया कष्टकऱयांना आपण दाराबाहेरच कसं तिष्ठत ठेवतो याची आठवण होते.

असंच पाठमोऱया बसलेल्या यशोदेच्या सैलसर अंबाडय़ाची भुरळ पडून लेखक चित्रकार म्हणतो, “थांब यशोदा, आहे तशीच क्षणभर.” पुढे ते वर्णन करतात, “त्याच क्षणी सारं लक्षात येऊन लज्जित स्मित तिच्या चेहऱयावर निश्चितच उमटलं असणार. ते मला कसं दिसणार? तिच्याच मागे मी बसलेलो. उठलो. रेखाटनाची वही घेतली. आता पुढे काय घडणार हे तिला कळलंच.” पुढे लेखक म्हणतात, “मी मागे सरकू शकत नव्हतो. माझी पाठ भिंतीला टेकलेली. पुढे होण्याचा प्रश्नच नव्हता. वही आधीच तिच्या पाठीला गुदगुल्या करत होती. रेखाटन करायला थोडं तरी अंतर हवं ना? पण नाही. दूर कुठे जाणार?” पुढे लेखक म्हणतो, “तिच्यात आणि माझ्यात अंतर कधीच पडलं नव्हतं” …आणि लगेच जणू लेखकाला पोचपावती मिळते. तो लिहितो, “ती विस्मयचकित होऊन गेली. रेखाटन बघून म्हणाली, खरंच, माझ्यात आणि चित्रात काहीच अंतर नाहीये.”

अशी कितीतरी बारीक-सारीक निरीक्षणे ‘रेषांतर’मध्ये दिसतात. या पुस्तकाच्या मलपृष्ठावर एक चित्र आहे आणि त्याखाली लेखकाने म्हटलं आहे, “केवळ एक रेषीय चित्र काढलं त्या वेळी काहीतरी वेगळं जाणवलेलं म्हणून केलेलं रेखाटन आज मात्र काही वेगळा अर्थ सांगतंय. असं वाटतं रेषांतर झालंय. ही व्यक्ती आहे माझी पत्नी. जी आज हयात नाही. या चित्रातील एका-एका पोकळीने आता माझं जीवन व्यापलंय.”

पोकळीतही कसा अर्थ पाहता येतो हेच जणू लेखकाला सांगायचं आहे.